असं म्हणतात कि अल्ताफ राजाच्या नंतर दर्दी गाण्यांचा बेताज बादशहा म्हणजे आदेश श्रीवास्तव..!

बॉलिवूडमध्ये दर्दी गाण्यांचा एक वेगळा झोन आहे. नुसरत संपल्यावर गाडी अल्ताफ राजाकडे वळते आणि नंतर ती जगजीत सिंह आणि शेवटी अरिजित सिंगवर येऊन थांबते. पण

बॉलिवूडमध्ये दर्दी संगीताचा बादशहा म्हणून एक नाव आवर्जून घ्यावं लागतं ते म्हणजे आदेश श्रीवास्तव.

राजनीती सिनेमातील मोरा पिया मो से बोलत नाही हे गाणं प्रेमात पडलेल्या आणि ब्रेकअप झालेल्या तरुणांचं राष्ट्रगीत बनलं होतं किंबहुना ते अजूनही तितकंच फ्रेश आणि दर्दी आहे. जितके दर्दी गाणे आदेश श्रीवास्तवने बनवले तितकंच दर्दी त्याचं आयुष्यदेखील होतं. त्याचा प्रवास आपण जाणून घेऊया.

मध्यप्रदेशच्या जबलपूर मध्ये ४ सप्टेंबर १९६४ रोजी आदेश श्रीवास्तवचा जन्म झाला. वडील रेल्वेत नोकरीला तर आई शाळेत शिक्षिका होती. आदेशाला लहानपणापासून गाण्याचं वेड होतं. शाळा कॉलेजांमध्ये जिथं जिथं गाण्याची संधी मिळेल तिथे तिथे आदेश जाऊन गायचा. गाण्याचं वेड त्याला बॉलिवूडमध्ये घेऊन आलं आणि आदेशला पहिला ब्रेक मिळाला तो म्हणजे १९९२ साली आलेल्या कन्यादान या सिनेमातून. १९९४ साली आओ प्यार करे या सिनेमातून संगीतकार म्हणून त्याने पदार्पण केलं.

लवकरच आदेशने बॉलिवूड मध्ये आपलं टॅलेंट दाखवून दिलं. मल्टी टॅलेंटेड असल्या कारणाने आदेशाला इंटरनॅशनल पातळीवर आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. नुसतं बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूडच्या गायकांसोबत सुद्धा आदेशला गाण्याची संधी मिळाली. हॉलिवूडच्या गायकांसोबत त्याला बऱ्याचदा स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली. शकिरा, एकॉन सारख्या टॉपच्या गायकांसोबत त्याला गायला मिळालं.

मध्यंतरी तो सारेगमप या शो चा जज सुद्धा होता पण त्याने रियालिटी शोला लाथ मारली आणि सांगितलं की या शोमध्ये टॅलेंट कमी आणि नकलीपणा जास्त असतो. अस कृत्य करणारा तो पहिलाच गायक होता. आज आपल्याला रियालिटी शोची रियालिटी कळतेच म्हणा.

आदेश श्रीवास्तवला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे २००० साली. या वर्षी आलेल्या कुंवारा, जोर का गुलाम या सिनेमातली गाणी आदेशने कंपोज केलेली होती जी प्रचंड चालली. या सिनेमाला संगीत दिल्यामुळे आदेशला त्यावर्षीचा आयफा अवॉर्डसुद्धा देण्यात आला होता. यानंतर आदेशची गाडी सुसाट सुटली.

कभी खुशी कभी गम ( २००१ ), बागबान ( २००३ ) आणि राजनीती ( २०१० ) या सिनेमात आदेशने जबरदस्त संगीत दिलं आणि कायमचा हिट होऊन गेला. अजूनही या सिनेमाचे अल्बम बेस्ट म्युझिकल हिट म्हणून मानले जातात. आजही ही गाणी त्याच मुडने ऐकली जातात.

२०१० साल हे आदेश श्रीवास्तवला हादरवून सोडणारं ठरलं. २०१० साली त्याला कॅन्सर झाला आणि यामुळे तो एकटा पडला. या काळात त्याच्याकडे पैसेच नव्हते म्हणून त्याने आपली महागडी कार विकून टाकली. खरंतर आदेश हा गाड्यांचा चाहता होता पण अचानकपणे त्याला हा आजार जडला आणि सगळं ठप्प झालं.

अमेरिकेतून तो उपचार घेऊन आला पण १० दिवसांनी पुन्हा आजारी पडला. यानंतर तो महिनाभर हॉस्पिटलमध्ये होता. या काळात त्याला कुणीही भेटायला आलं नाही आणि शेवटी आदेश बॉलिवूड मधून निखळला. ५ सप्टेंबर २०१५ रोजी त्याच या आजाराने निधन झालं.

राजनीती सिनेमातील मोरा पिया मोसे बोलत नाही, बागबान सिनेमातील चली चली फिर चली चली,कभी खुशी कभी गम सिनेमातील शावा शावा,मेजर साब मधलं सोना सोना ही गाणी आजही आदेश श्रीवास्तव काय दर्जाचा आणि किती महान संगीतकार होता याची प्रचिती या गाण्यांवरून येते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.