दारूसोबत पाणी नाही मिळालं म्हणून दैना झाली आता हा भिडू रिक्षातून लोकांना मोफत पाणी वाटतोय..

भारताचा क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वेंगिपूरपु वेंकटसाईं लक्ष्मण म्हणजेचं व्ही. व्ही.एस. लक्ष्मणने आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास घेतलायं. मात्र, सध्या तो कॉमेंट्रीच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडला गेलाय. सोशल मीडियावरही तो नेहमीच सक्रिय असतो. क्रिकेट सोबतच तो इतर अनेक गोष्टींकडे तो आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधत असतो.

आज दुपारीही त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केलीये. ज्यात एक वॉटर रिक्षा पाहायला मिळतेय. ज्यात त्याने या व्यक्तीच्या कामाचे कौतुक केलंय.

तर, लक्ष्मणने पोस्ट केलेला फोटो आहे मोहोमद्द आबाद यांचा. ज्यांनी आपल्या उपजीविकेचं साधन असणाऱ्या रिक्षाला एक चालती- फिरती पाणपोई बनवलीये. 

मोहोमद्द आबाद हे मूळचे राजस्थानच्या चुरु भागातील सुजानगडचे रहिवासी. हा भाग देशातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक मानला जातो. इथं उन्हाळ्यातलं तापमान ५० अंशांपेक्षा  जास्त असतं, तसंच पाण्याची मर्यादित उपलब्धता. त्यामुळे तिथल्या लोकांचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमचाचं.

लोकांची हीच समस्या लक्षात घेऊन मोहम्मद आबाद यांनी आपल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या ऑटोरिक्षाला थंडगार पाण्याची टाकी बनवलीये. रिक्षात बसवलेल्या या पाण्याचा टाकीच्या मदतीने ते दिवसभरात २००० लिटरपेक्षा जास्त थंड पाणी वाटतात. सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते त्याच्या ‘पाण्याच्या झोपडी’च्या मदतीनं लोकांची थंड पाण्याची तहान भागवतात.

रिक्षातले पाणी थंड राहावे, यासाठी त्यांनी रिक्षावरचं लोखंडी छत हटवून तिथं पालाचं छत बनवलंय.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यानी म्हंटल कि, ‘जर माझ्या वेळेतले अतिरिक्त १० मिनिट एखाद्या गरजूला एक ग्लास पाणी मिळवण्यास मदत करू शकतात, तर मी स्वत: ला भाग्यवान समजतो.’

गेल्या पाच वर्षांपासून मोहमद्द पाण्याचे वाटपाचं काम करतायेत. ज्याच्या मदतीनं जवळपास ३००० लोक या ‘वॉटर हट’ मधून पाणी पितायेत.  शासकीय रुग्णालय, शासकीय कार्यालय, न्यायालय, भाजी मार्केट, रेल्वे आणि बस स्थानकांसारख्या ठिकाणी ते पाणी पुरवतात.

मोहम्मद यांचा भाऊ रस्ता अपघातात मरण पावल्याने त्याच्या स्मरणार्थ त्यांनी ही सेवा सुरू केलीये.

दरम्यान, त्यांनी आपल्या मुलाखतीत आपल्या सोबत घडलेला एक किस्सा देखील सांगितला. त्यांनी म्हंटले कि, मी आणि त्यांचा एक मित्र एका रात्री जंगलाजवळ दारूच्या नशेत होतो. आमच्याकडचं सगळं पाणी संपल होत. आणि आसपास कोणती मानववस्ती किंवा दुकानही नव्हतं. माझ्यासाठी हा वेक-अप कॉल होता आणि मी त्या दिवसापासून मद्यपान बंद केले. अशा घटनांमुळे आपण एखाद्या गोष्टीचे महत्त्व जाणू शकतो. आणि अश्या प्रकारे मी माझी पाण्याची झोपडी सुरू करण्याचं ठरवलं.

आबाद स्वतःच्या खिशातून आरओ प्लांटचे पाणी भरतात. यांना दररोज २००० लिटर पाणी खरेदी करण्यासाठी २ हजार रुपये खर्च येतो  म्हणजेचं महिन्याचा खर्च होतो ६०,००० रुपये. पण तरीही खर्चाचा विचार न करता गेल्या अनेक वर्षांपासून फुकट पाणी वाटपाचे काम करतायेत. त्यांच्या या प्रयत्नांना त्यांचा कुटुंबीयांचाही पाठिंबा आहे.

त्यांची तिन्ही मुलं चांगल्या नोकरीला आहेत. त्यामुळे घरच्या खर्चात त्यांची मुलं हातभार लावतात. अनेकदा त्यांना देणग्या देखील मिळतात. तर बरीच जण आपल्याकडून होईल तेवढ्या पैशाची मदत करतात.

पाणी वाटपाबरोबरच आबाद  गेल्या वर्षभरापासून कोरोना जन जागृतीचं देखील काम करतात. शहरातील रहिवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आबादकडे रिक्षाच्यावर लाउडस्पीकर आहे, ज्यात ते कोरोना व्हायरसबद्दल गाणी आणि संदेश वाजवतात.

आबाद यांनी ठरवलंय कि, ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करत राहतील.

हे ही वाचं भिडू  :

Leave A Reply

Your email address will not be published.