सरकारची वाट न बघता घराघरात जाऊन लोकांना वाचवणारा “ऑक्सिजन मॅन”

देशभरात कोरोनाची रेकोर्ड ब्रेक प्रकरणं नोंदविली जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाला बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. इतर राज्यांप्रमाणेच  बिहारमध्येही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीये, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यातही अनेक अडचणी येत आहेत. सरकारने देखील  अपुऱ्या पुरवठ्यामुळे आपले हात वर केले आहेत, अश्या परिस्थतीत पटनातील एक सामान्य व्यक्ती देवदूत बनून समोर आली आहे.

गौरव रॉय असे या ५२ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.

‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे गौरव रुग्णांना देतायेत जीवनदान.. 

गौरव रॉय पेशाने व्यावसायिक आहेत. मात्र, कोरोना काळात ते लोकांच्या मदतीसाठी समोर आले आहेत. ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीच्या घरी ते विनामूल्य ऑक्सिजन वितरीत  करतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना  ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखले जाते.

आयुष्यातील टर्निंग पॉइंटमधून घेतला अनुभव… 

गौरव रॉय यांची ऑक्सिजन मॅन’ बनण्याची कहाणी कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गौरव  पॉझिटिव्ह आले होते. यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तेव्हा पत्नीने त्यांना पीएमसीएचमध्ये  भरती केले.  मात्र, त्याठिकाणी ऑक्सिजन मिळणे कठीण होते. यांनतर पत्नीला खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरसाठी ५ तास वाट पहावी लागली.

हाच गौरव यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. त्या कोरोनाच्या लाटेतून पुनर्जन्म झाल्याची भावना मनात ठेवून त्यांनी दुसऱ्यांना ऑक्सिजन  सिलेंडर पुरविण्याचा संकल्प केला.

पत्नीसोबत मिळून सुरु केली ऑक्सिजन  बँक .. 

आपल्या आयुष्यातील या अनुभवानंतर गौरव यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करून ऑक्सिजन  बँकेची सुरुवात केली. त्यात त्यांच्या मित्रांनीही त्यांची मदत घेतली. आणि स्वखर्चातून ऑक्सिजन  बँक सुरु केली.  सुरुवातीला पत्नीने ३ सिलिंडर विकत घेतले तर मित्रांच्या मदतीने पाच ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था झाली, ज्यानंतर त्यांनी ही  मोहीम सुरू केली.

याद्वारे ते कोरोना संक्रमित रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर प्रदान करतात. जेव्हा सरकार व प्रशासनाकडून  कोणतीही सुविधा मिळत नाही आणि गौरव यांना याबबत माहिती मिळते, तेव्हा ते स्वत: त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन सिलिंडर घेऊन पोहोचतात.

आतापर्यंत ९०० लोकांचा वाचवला जीव

गौरव राय यांनी आपल्या या  मोफत ऑक्सिजन मोहिमेद्वारे पाटणामधील सुमारे ९०० लोकांचे प्राण वाचवले आहेत. जेव्हा जेव्हा गौरव यांना लोकांचा फोन येतो, तेव्हा ते स्वतः ऑक्सिजन  सिलिंडर घेऊन  गरजूंच्या घरी पोहोचवितात. पहाटे पाच वाजल्यापासून गौरव यांचे  हे काम सुरु होते. आपल्या जुन्या वॅगन आर कारच्या माध्यमातून वेळ काळ न  पाहता  रात्रीच्या १२ ला सुद्धा एकही पैसा न  घेता ऑक्सिजन सुविधा देतात.

‘आम्ही सरकारला नक्कीच प्रश्न विचारू’

ऑक्सिजन मॅन’  सरकारच्या सध्याच्या व्यवस्थेमुळे खूप नाराज आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा बिघडल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.  गौरव राय म्हणतात की, आमच्याकडे केवळ ऑक्सिजन  सिलिंडरसाठी ४०००  फोन कॉल  येतात. आम्हाला शक्य होईल तितके आम्ही प्रदान करीत आहोत.

त्याच वेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यापासून संपूर्ण यंत्रणेला लक्ष्य केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की,  सरकार झोपले आहे आणि जेव्हा  आम्ही समाजासाठी काहीतरी करीत आहोत, अश्यावेळी  आम्ही सरकारला नक्कीच जाब विचारू. ते म्हणाले कि,  एकीकडे ऑक्सिजनविना  लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे, तर दुसरीकडे सरकार नुसतेच दावे ठोकत आहे.

अनेक ऑक्सिजन मॅनची गरज 

सध्याच्या बिकट परिस्थितीत ऑक्सिजनसाठी रुग्णालयात  लांबलचक  रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी  प्रयत्न केले जात आहे. मात्र, सर्व बहुतेक लोकांपर्यंत ही सुविधा पोहोचत नाहीये.  ऑक्सिजनची  कमतरता पाहता देशभरात  गौरव सारख्या अनेक ऑक्सिजन मॅनची गरज आहे. अनेक रुग्णालय भरली आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्णांची भरती करणे कठीण होत आहे. लोक कसे तरी घरी ऑक्सिजन मागवून काम चालवीत आहेत, अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोक आणि संस्थांनी पुढे येऊन लोकांना मदत केली पाहिजे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.