अपघातात भक्ती बर्वे गेल्या मात्र त्यांनी पुलंची फुलराणी कायमची अजरामर केली…

मंजुळा : (रागानं ताडकन उठते. ज्या दिशेला ते दोघे गेले तिकडं पाहून ) 

असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक? हरामजादी? थांब

थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा !

मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर.

तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वाँडात घालीन शान.

तुजा  क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !

तुला शिकवीन चांगलाच धडा !

पुलं देशपांडे लिखित ती फुलराणी या नाटकातला हा मोनोलॉग अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी इतका जबरदस्त साकारला होता कि फुलराणी म्हणजे भक्ती बर्वे इतकं परफेक्ट समीकरण झालं होतं. पुलंनी लिहिलेल्या फुलराणीला पडद्यावर अक्षरशः जिवंत करण्याचं श्रेय जातं ते भक्ती बर्वे यांना. भक्ती बर्वे यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आपण जाणून घेऊया.
१० सप्टेंबर १९४८ रोजी सांगलीमध्ये भक्ती बर्वेंचा जन्म झाला. शाळेपासूनच त्यांना नाटकाची विलक्षण आवड होती. शाळेत असतानाच त्यांनी सुद्धा करमरकर यांच्या प्रोडक्शन हाऊससोबत अनेक बालनाट्यांमध्ये काम केलं. यासोबतच ऑल इन वन रेडिओवर निवेदिका म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. मुंबईत दूरदर्शनला बातम्यासुद्धा त्या देत असत.
अजब न्याय वर्तुळाचा या नाटकापासून त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला आणि इथून नंतर त्या कधीच मागे वळल्या नाहीत. या नाटकामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. अखेरचा सवाल, गांधी आणि आंबेडकर, आई रिटायर होतेय , रंग माझा वेगळा या नाटकांमध्ये भक्ती बर्वेंनी साकारलेल्या तडफदार भूमिका चांगल्याच गाजल्या. पण फुलराणी हे नाटक लोकांच्या मनात इतकं घट्ट बसलं होतं कि फुलराणी म्हणल्यावर सगळ्यात आधी भक्ती बर्वेंचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. हे नाटक हिंदी, गुजरातीतही भरपूर चाललं. हजारो प्रयोग या नाटकाचे झाले. 
फक्त मराठीच नाही तर भक्ती बर्वेंनी हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केलं होतं. १९८३ सालच्या जाने भी दो यारो या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. यात नसिरुद्दीन शहा, सतीश शहा, रवी बासवाणी सारख्या अभिनेत्यांसोबत भक्ती बर्वेंनी आपली अभिनय शैली दाखवून दिली. १९९८ सालच्या हजार चौरसिया कि माँ या सिनेमामध्येसुद्धा त्यांनी जबरदस्त काम केलं होतं.
१२ फेब्रुवारी २००१ हा मराठी नाट्यसृष्टीसाठी अत्यंत वाईट दिवस होता. वाईवरून मुंबईला परतत असताना भक्ती बर्वेंच्या गाडीला मोठा अपघात झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. भक्ती बर्वेंच्या निधनाने मराठी नाटकांवर शोककळा पसरली होती. अनेक लोकांच्या त्या आदर्श होत्या. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.
पुढे अनेक अभिनेत्रींनी ती फुलराणी हे नाटक केलं पण अस्सल फुलराणी असलेल्या भक्ती बर्वेंची सर इतर कोणालाच जमली नाही. 
मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी भक्ती बर्वेंना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
हे हि वाच भिडू :
Leave A Reply

Your email address will not be published.