आझादांनी ज्या भूतांना कॉलेजमधून पळवून लावले त्यांनाच पुढे क्रांतीकार्यात सामील करून घेतले.

भगवान दास माहौर म्हणजे आझादांचे खास मित्र. भगवानदास माहौर, सदाशिवराव मलकापूरकर आणि विश्वनाथ वैशमपायन या तीन मित्रांसोबत आझाद कायम वावरत असत. काकोरीच्या घटनेनंतर आझादांनी झांशीला आपले मुख्य ठिकाण बनवले होते. सुरुवातीचा त्यांचा मुक्काम मास्टर रुद्रनारायण यांच्या घरी असायचा.

काकोरीनंतर सर्व पोलीस-गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर चंद्रशेखर आझाद होते. संपूर्ण मध्य भारतात त्यांचा शोध मोठ्या जोराने घेतला जात होता. कितीतरी वेळेस त्यांच्या खोलीची तपासणी करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत ते पंजा लढवीत, त्यांना हरवत आणि त्यांच्याचकडून ‘चंद्रशेखर आझाद’ या व्यक्तीविषयी अनेक अफवा आश्चर्याचे भाव आणून ऐकत. पण पोलिसांना थोडसुद्धा संशय येत नसे, की आपण ज्याला ह्या सगळ्या गोष्टी ऐकवतोय, तोच चंद्रशेखर आझाद आहे.

पण काकोरीच्या घटनेत अनेक क्रांतिकारक पकडले गेले होते. संघटनेची वाढ करण्याची गरज होती. आझादांनी अनेक ठिकाणी आपले साथीदार पाठवून संघटनेत जास्तीत जास्त तरुण कसे सामील करून घेता येतील, याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

त्यातच भगवान दास माहौर यांना ग्वाल्हेरच्या ‘व्हिक्टोरिया कॉलेज’ मध्ये BA करण्यासाठी पाठवले. तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या क्रांतिकार्यात सामावून घेतले येईल, हा त्यांचा यामागे उद्देश होता. इसवी सन १९२८ मध्ये भगवानदास माहौर ग्वाल्हेर येथे स्थलांतरित झाले.

एके दिवशी आझाद त्यांच्या मित्राला, भगवानदासांना भेटण्यासाठी हॉस्टेलवर आले. व्हिक्टोरिया कॉलेजला २ हॉस्टेल होते. एक बॅचलरची डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि दुसरे इंटरच्या विद्यार्थ्यांचे. हॉस्टेलची एक पद्धत होती. एखाद्या विद्यार्थ्याकडे कुणी पाहूणा आला तर त्याला ‘भुतांचा प्रोग्रॅम’ करून घाबरवले जायचे. सगळेच अल्लड वयाचे. अठरा-वीस वर्षे म्हणजे काय? त्यात आपल्या घरच्यांपासून दूर, हॉस्टेलवर राहत असल्यामुळे अशा प्रकरची मस्ती करणे साहजिक होते.

विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थ्याकडे तो पाहुणा आला आहे, तो सुद्धा हिरीरीने या प्रोग्रॅम मध्ये सहभागी होत असे. आझाद भगवानदासांना भेटण्यासाठी आणि संघटनेच्या कामात काही प्रगती झाली आहे का, हे पाहण्यासाठी ग्वाल्हेरला त्यांच्या हॉस्टेलवर आले आणि दुसऱ्या हॉस्टेल मध्ये

‘भगवान के यहा कोई मेहमान आया है, आज रात का प्रोग्रॅम जोरशोर से होगा’ अशी बातमी पसरलीसुद्धा.

भगवानदास चिंतेत पडले. जर आझादांना सांगितले तर आपल्याच मित्रांसोबत आपण गद्दारी करू, हॉस्टेलच्या नियमांच्या विरोधात जाऊन केलेलं कृत्य ठरेल. आणि जर आझादांना सांगितलं नाही, तर काहीही घडू शकेल. आझादांच्या खिशात काडतुसांनी भरलेली बंदूक कायम तयार असे, न जाणो एखादा विद्यार्थी समोर आलाच, तर एका गोळीत त्याचा कार्यक्रम व्हायचा.

निष्पाप जीवाचे प्राण जातीलच, सोबतच आयुष्यभर आझादांच्या मनाला या घटनेच्या वेदना होत राहतील त्याचे काय? हॉस्टेलच्या सहकाऱ्यांना सांगायचे तरी कसे की हे आझाद आहेत.. आणि आझादांना सांगायचे तरी कसे, की हा सगळा खेळ आहे. भगवानदास मोठ्या धर्मसंकटात सापडले. कसेबसे शब्द जुळवत ते म्हणाले,

“पंडितजी, इथल्या विद्यार्थ्यांना एक घाण सवय आहे. कोणाच्याही कोटाच्या खिशात ते हात घालतात आणि मिळेल ती वस्तू घेऊन जातात. त्यामुळे तुम्ही तुमचे पिस्तुल खिशातून काढा आणि इथे ठेवून द्या.”

भगवानदासांच्या या सूचनेचा आझादांना प्रचंड राग आला. ते म्हणाले,

“म्हणजे मी निशस्त्रपणे पोलिसांच्या हाती सापडू? वेड लागलंय का तुला? ते काही नाही आत्ताच्या आता हॉस्टेल खाली कर आणि आपण किरायाच्या खोलीत जाऊन राहू. ही काय विचित्र पद्धत?”

“मला तुमचं म्हणणं मान्य आहे पंडितजी. पण या रात्री कोण खोली देईल? आजची रात्र इथे काढु, उद्या च्या उद्या हॉस्टेल सोडूया. पण आजची रात्र तरी आपल्याला हॉस्टेलच्या नियमाप्रमाणे राहावे लागेल.” भगवानदासांच्या या युक्तिवादाचा परिणाम झाला.

मोठ्या नाखुषीनेच आझादांनी आपले पिस्तुल काढून ठेवले. ते गर्मि चे दिवस होते. आझाद, भगवानदास आणि त्यांच्यासोबत इतर पाच-दहा जण मोकळ्या मैदानात झोपले होते. मध्यरात्र उलटून गेली आणि भुतांचा खेळ सुरू झाला.

एका झाडावरून आगीचे निखारे बरसू लागले. लांबून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज येऊ लागला, दूर हॉस्टेलच्या छतावर एक कंकाळ चालत जाताना दिसू लागले. पाण्याच्या टाकीवर भूत नाचू लागले. सर्वच जण घाबरले.

ते दृश्य पाहून आझाद भगवानदासांना म्हणाले,
“हे सगळं काय आहे?”

“आमच्या हॉस्टेल मध्ये भूत आहेत. त्यांचा असा त्रास आम्हाला होत राहतो.” भगवानदासंचया या उत्तरावर मोठ्याने हसत आझाद म्हणाले,

“अबे चल, क्या पिन पिन पिन पिन कर रहा है. ये जरूर कोई बदमाशी है, भूत-वूत कुछ नहीं होता. चल मेरे साथ.”

असं म्हणत आझादांनी आपल्या कोटाच्या खिशात दगड भरली. भगवान दास त्यांच्यासोबत निघाले. ज्या झाडावरून पेटते निखारे पडत होते, त्यासमोर आझाद जाऊन थांबले. जसे निखारे पडू लागले तसे आझादांनी दोन-चार दगड झाडाकडे जोरात भिरकावले. झाडामधून निखाऱ्यासदृश्य रसायन टाकणारा मुलगा उडी मारून पळून गेला. ते पाहून आझाद म्हणाले,

“बघितलंस, भूत-प्रेत असलं काही नसतं. आता मजा बघ..”

टाकीवर नाचणाऱ्या भुताच्या दिशेने आझादांनी जोरात दगड भिरकावले. एक दगड जसा त्याच्या कानाच्या बाजूने ‘सनकन..’ निघून गेला तसा टाकीवरचा भूत आडवाच झाला. त्याच्या डोक्यावरून, हाताच्या बाजूने चार-पाच दगड गेले. आता त्याला समजून चुकलं, की आपण इथून थोडंसुद्धा हललो, तर आपलं डोकं फुटलच.. तो तसाच न हलता पडून राहिला.

गच्चीवर चालणाऱ्या सापळ्यासोबत सुद्धा तेच घडलं.. सन-सन करत तीन-चार दगड त्याच्या दोन्ही कानाच्या बाजूने गेले तेव्हा कासवाच्या गतीने चालणारा सापळा वाऱ्याच्या वेगाने हॉस्टेलच्या गच्चीवरून पळून गेला. आता मात्र भगवानदास आणि इतरांनी आझादांना थांबवले. जोरजोराने हसत भगवानदासांनी सगळा प्रसंग समजावून सांगितल्यावर आझाद सुद्धा हसू लागले.

त्या बिचाऱ्या टाकीवर नाचणाऱ्या पांढऱ्या भुताची मात्र हालत खराब झाली होती. ते भूत जागेवरून उठू शकत नव्हते ना पायऱ्यांवरून खाली उतरू शकत होते. शेवटी आझादांनीच त्याला खाली उतरवले. त्या रात्री व्हिक्टोरिया कॉलेजवर फार मोठी मैफिल जमली. आझादांनी त्या मुलांच्या या प्रोग्रॅमचे तोंडभरून कौतुक केले. मुलांच्याही मनात आझादांविषयी आकर्षण आणि इज्जत वाढली. पुढे यातील बहुतांश मुलांना क्रांतीकार्यात आझादांनी सामील करून घेतले..

जेव्हा हा प्रसंग घडला, तेव्हा आझादांचे वय होते वीस-एकवीस वर्षे.. क्रांतिकार्यातील शिरोमणी समजल्या जाणाऱ्या, सर्वात ताकदवान आझादांच्याही आयुष्यात असे हलके-फुलके प्रसंग आले होते. त्यांच्याही तारुण्यात मित्रांसोबत अल्लडपणाचे दिवस आझादांनी जगले होते.. त्याचीच साक्ष म्हणजे ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेमधील हा ‘भुतांचा प्रोग्राम…’

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.