‘या’ तीन नेत्यांच्या राजकारणामुळं नेताजींचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न अखेर स्वप्नचं राहिलं…

समाजवादी पक्षाचे कर्ताधर्ता नेताजी मुलायमसिंह यादव यांचं नाव दिग्गज नेत्यांमध्ये घेतलं जातं. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांच्या पुढील वाटचालीचा अंदाज बांधणे कठीण असायता. उत्तर प्रदेशात जेव्हा राजकीय समीकरण बिघडू लागले, तेव्हा मुलायम यांनी समाजवादी पक्षाची पायाभरणी केली आणि मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले.

फक्त राज्यातचं नाही तर केंद्रातही त्यांच्या नावाचा दबदबा होता. केंद्रातली अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलीतं. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, मुलायम सिंग हे पंतप्रधान सुद्धा बनणार होते.  मात्र ऐनवेळी गणित फिसकटलं.

तर सालं होत २०१२.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुमत मिळालं होत. युपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यांनी अखिलेश यादवला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवलं होतं. वडिलांनी मुलाला लॉन्च करून एक प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाचा मार्ग मोकळा केला होता.

एकेकाळी कुस्तीच्या आखाड्यात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मुलायम यांच्या या निर्णयाकडे  राजकीय कॉरिडॉरमध्ये एक नवा डाव म्हणून पाहिले जात होते. मुलायमसिंह यादव यांनी देशाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून केंद्रीय मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास तर केलाचं होता, पण आपल्या या राजकारणाच्या आखाड्यात बड्या- बड्या नेत्यांची सुट्टी सुद्धा केली होती. त्यामुळेच म्हणतात कि, मुलायम सिंगच्या मनातली गोष्ट समजून अवघड आहे.

पण मुलायम सिंग यांच्या मनात एका गोष्टीची खंत अजूनही बाकी आहे, ती म्हणजे मुलायम सिंग पंतप्रधान बनता बनता राहिले.

मुलायम यांचे धाकटे बंधू अभय राम यादव. यादवांचं जवळपास सगळ कुटुंब या राजकरणात सक्रीय आहे, मात्र  अभय राम हे राजकारणापासून दूर आपल्या मूळ गावात शेती करतात. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला.

त्यांनी सांगितलं कि,

‘मुलायमसिंह यादव पंतप्रधान होऊ शकले नाहीत, यामागे तीन नेत्यांचा हात होता. लालू , शरद यादव आणि रामविलास पासवान.

त्यांनी म्हंटल  कि, ‘मुलायम सिंग यादव पंतप्रधान बनायला तयार होते. सगळ्या पक्षांनी सुद्धा यावर सहमती दर्शवली होती. सकाळी शपथ घ्यायची होती  आणि रात्रीतून सगळा खेळ बदलला.

लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान आणि शरद यादव यांनी ऐनवेळी हे होऊ दिले नाही,  लालूप्रसाद यादव यांनीच आधी गोंधळ घातला होता आणि नंतर त्यांच्या मागे लागून इतर नेतेही गोंधळ घालू लागले. नाहीतर ते पंतप्रधान झालेचं होते. ‘

एवढंच नाही मुलायमसिंह यादव यांनी स्वतः एका मुलाखतीत या घटनेचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं, ‘आम्हाला सकाळी आठ वाजता पंतप्रधान म्हणून शपथ घेणार होतो. हजारो समर्थक आणि पत्रकार लोक माझ्या घरी पोहोचले होते. सर्वकाही व्यवस्थित झाल्यानंतर सुद्धा सगळं प्रकरण गडबडलं. पण मी पंतप्रधान होऊ शकलो नाही अशी कोणतीही वेदना मला कधीच जाणवली नाही.’

दरम्यान, मुलायम सिंग यादव यांच्याऐवजी देवेगौडा यांची वर्णी लागली. १९९६ मध्ये संयुक्त आघाडी सरकारमध्ये एचडी देवेगौडा पंतप्रधान झाले. राजकीय कॉरिडॉरमध्ये अशी चर्चा आहे की, देवेगौडा पंतप्रधान होण्यापूर्वी मुलायम यांच्या नावावर एकमत झाले होते. अनेक नेत्यांनी सहमती असूनही मुलायम यांच्या नावाला विरोध केला होता, त्यानंतर ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. मात्र, देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मुलायम यांना संरक्षण मंत्रीपद देण्यात आलं.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.