छत्तीसगडमध्ये काँग्रेसची पंजाबसारखीच स्थिती होतीय पण तिथल्या मुख्यमंत्र्यांचं गणित अजब आहे…

काँग्रेसची घरची भांडण काय संपायची नाव घेत नाहीत. पंजाब काँग्रेसमधली भांडणं चव्हाटयावर आल्यानंतर आता गेल्या कित्येक दिवसांपासून छत्तीसगड काँग्रेसमध्ये वाद सुरु आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि टी.एस.सिंहदेव यांच्यात मुख्यमंत्री पदावरून सुरु झालेला हा वाद इतका पेटलाय कि, २० आमदार थेट दिल्लीला पोहोचले आहेत. दिल्लीत या आमदारांना पक्षश्रेष्टींची भेट घ्यायची आहे.

पण जेव्हा पत्रकारांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, आमदारांचे जाणे-येणे सुरूच असते. देशात प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. कुठेही जा-ये करू शकतात. पण जेव्हा त्यांना पंजाब सारखी अवस्था होईल का याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी समजावलेलं अंकगणित चक्कीत जाळ करणार आहे.

नेमकं काय म्हणाले भूपेश बघेल?

छत्तीसगडची अवस्था पंजाबसारखी तर होणार नाही ना? असा प्रश्न जेव्हा बघेल यांना विचारला तेव्हा मुख्यमंत्री अंकगणित समजवायला लागले. ते म्हणाले,

छत्तीसगड, छत्तीसगड राहणार आहे, त्याचं पंजाब होणार नाही. काळजी नसावी. या दोन राज्यात केवळ एकच सामानता आहे कि, पंजाब देखील अंकापासून बनलेलं राज्य आहे. पाच नद्यांचे पंजाब आणि हे छत्तीसगड. हे दोन्ही राज्य अंकांनी बनलेली आहेत. आणि देशातील कोणत्याही राज्याच्या नावात अंक नाहीत. पंजाब आणि छत्तीसगड दोन्ही राज्यांमध्ये राज्यात केवळ हेच एक सारखेपण आहे.

बघेल यांच्या याच उत्तरवरून सध्या छत्तीसगडच्या अनेक राजकारण्यांना हसू आवरेना झालंय. या उत्तरावरून त्यांना बरेच ट्रोल देखील केलं जात आहे. तसेच सोशल मीडियावरून त्यांना राज्यातील सत्ता जाण्यापूर्वी सावध होण्याचे सल्ले दिले जात आहेत.

या सगळ्या उत्तर देताना काँग्रेसचे आमदार राम कुमार यादव म्हणाले कि सरकार आपला ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. छत्तीसगडचे आमदार शनिवारी दिल्लीच्या राजघाटावर पोहचले, तिथं त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

त्यानंतर बोलताना यादव म्हणाले,

छत्तीसगडमध्ये बघेल आणि टीएस सिंह देव यांच्यासहित काँग्रेसचे सर्व ७० आमदार एकत्रित आहेत. सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. मुख्यमंत्री राज्यातील जनतेसाठी काम करत आहेत. आणि यात टीएस सिंह देव देखील आपलं योगदान देत आहेत.

छत्तीसगडमधील हा वाद तसा २०१८ पासूनचं सुरु झालेला आहे. तेव्हा राज्यात काँग्रेस सत्तेवर आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी भूपेश बघेल आणि टी.एस.सिंहदेव यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. त्यामुळे मोठे वादही निर्माण झाले होते.

दरम्यान या वादावर तोडगा काढत काँग्रेस हायकमांडने भूपेश बघेल यांची मुख्यमंत्री निवड केली. तर आरोग्य खात टी. एस. सिंहदेव यांना देण्यात आलं. सोबतच अडीच वर्षांनी नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार असं आश्वासन दिलं गेलं.

आता बघेल यांचा अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपत आलाय, मात्र अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा फॉर्मुला त्यांनी स्पष्टपणे नाकारलाय. यावरूनच छत्तीसगडमध्ये वाद पेटलाय. सिंहदेव यांनी बघेल यांना खुर्चीवरुन खाली आणण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. टी. एस. सिंहदेव म्हणजेच त्रिभुनेश्वर शरण सिंह देव. हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासू लोकांपैकी एक मानले जातात.

अलीकडेच, बघेल गट आणि सिंहदेव गटातील मतभेद जास्तचं टोकाला गेले होते, जेव्हा काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह यांनी आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्यावर आरोप केला की, त्यांना बघेल यांची हत्या करून मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे.

हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही नेत्यांसोबत पक्ष नेतृत्वासोबत भेटीगाठी देखील झाल्या आहेत. त्यावर सर्व काही सुरळीत असल्याचं सांगितले जात आहे. पण अचानक दिल्लीला पोहोचलेल्या आमदारांमुळे बघेल सध्या टेन्शनमध्ये आल्याचं दिसत आहेत. या सगळ्या मध्येचं बघेल यांना उत्तरप्रदेश निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.