ममता बॅनर्जींच्या विजयाची वाट भाजपनेच सोपी केली होती…

आज पश्चिम बंगालमध्ये भवानीपूर पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तब्बल ५८ हजार मतांनी विजय मिळवला आहे. मे मध्ये लागलेल्या निकालात नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांनी ममतांचा १ हजार ९५६ मतांनी पराभव केला होता, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी निवडणूक जिंकणे आवश्यक होते. त्यानुसार आता त्यांनी निवडणूक जिंकली आहे.

पण जेव्हा हि निवडणूक जाहीर झाली होती तेव्हा अपेक्षा होती कि मागच्या वेळी प्रमाणेच भाजप यंदा देखील ममता दीदींच्या विरोधात आक्रमक प्रचार यंत्रणा राबवून त्यांचा विजयाचा मार्ग कठीण करेल, पण तसं झालेलं दिसून आलं नाही. उलट अगदी उमेदवाराच्या निवडीपासूनच भाजपने ममता दीदींच्या विजयचा मार्ग सोपा केला.

१. ममता दीदींच्या तुलनेत कमी ताकदीचा उमेदवार

२०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भवानीपूरमध्ये भाजपला फक्त ५ हजार ०७८ मते मिळाली होती. त्यानंतर २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इथं २६ हजार २९९ मत मिळाली. आणि २०२१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हा आकडा तब्बल ४४ हजार ७८६ मतांपर्यंत वाढला. त्यावेळी भाजपला ३५.१६ टक्के मत मिळाली होती.

अशा स्थितीत यावेळी भाजपने भवानीपूरमध्ये पूर्ण ताकद लावली असती तर कदाचित ममता बॅनर्जी यांना विजयासाठी आणखी संघर्ष करावा लागला असता.

पण भाजपने सुरुवातीला उमेदवारच अत्यंत कमी ताकदीचा दिला. ज्या प्रियांका ममतांच्या विरोधात होत्या त्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ५८,२५७ मतांनी पराभूत झाल्या होत्या. प्रियांका यांना २०१५ मध्ये कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांचा तृणमूलच्या स्वपन समदरने पराभव केला होता.

एकूणच काय तर एकही निवडणूक न जिंकलेल्या उमेदवाराला थेट राज्याच्या मुख्यमंत्रांविरोधात मैदानात उतरवलं होतं. इथंच समजून येत कि भाजपने किती सहजरित्या ममतांना विजयाची वाट मोकळी करून दिली.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यानुसार, प्रियांका भाजपसाठी पहिली पसंती नव्हती. या निवडणुकीला देखील नंदीग्रामसारखा रंग देता यावा म्हणून पक्षाला एक मोठा चेहरा द्यायचा होता, पण सर्व मोठ्या नेत्यांनी ममतांच्या विरोधात जाण्यास नकार दिला. आणि शेवटी प्रियांका याचं नाव अंतिम झालं.

२. मोदी – शहा प्रचारापासून लांब

या निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तब्बल ८० नेत्यांची फौज उतरवली होती. यात केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, स्मृती ईरानी यांच्यापासून राज्यातील दिलीप घोष यांच्यासारख्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता. पण भाजपमध्ये जे लोकप्रिय चेहरे समजले जातात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मात्र प्रचारापासून लांब राहिले.

याउलट बंगालमध्ये तृणमूल प्रचंड बहुमताने सत्तेवर असल्यानं, आणि स्वतः ममता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर असल्याने, कोणीही आपल्याला पराभूत करू शकणार नाही अशा भ्रमात त्या राहिल्या नाहीत. ममतांपासून तृणमूलचे सर्व नेते गावोगावी, भवानीपूरच्या गल्ली -गल्लीमध्ये प्रचार करत होते.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी सहजपणे निवडणूक जिंकेन असा विचार करून कोणीही घरी बसू नये. माझ्यासाठी एक-एक मत आवश्यक आहे. पाऊस असो वा वादळ, घरी राहू नका, नक्की मत द्यायला या. जर मी निवडणूक हरलो, तर मी मुख्यमंत्री राहू शकणार नाही. बंगालचा मुख्यमंत्री दुसरा कोणीतरी होईल.

त्यामुळे भाजपने आपले लोकप्रिय चेहरे प्रचारात आणले नाहीत, पण ममतांनी मात्र स्वतः झोकून देत प्रचार केला. परिणामी ममतांना आज मतदारसंघातील प्रत्येक बूथवर मतांची आघाडी मिळाली आहे.

३. मुस्लिम बहुल भवानीपूरमध्ये मारवाडी उमेदवार

कितीही नाही म्हंटले तरी निवडणुकांमध्ये जातीचा प्रभाव असतो हे मान्य करावचं लागतं. आणि  भवानीपूरमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. इथं मुस्लिम मतदारांची संख्या ४५ हजारांहून अधिक आहे. ज्याची टक्केवारी एकूण मतदारांच्या सुमारे २० टक्के आहे.

सोबत इथं बंगाली आणि बिगर बंगाली मतदारांची संख्या मोठी आहे. इथं ९० हजार बंगाली मतदार आणि ५० हजार बिगर बंगाली मतदार आहेत. यात गुजराती आणि मारवाडी समाजातील मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. पण तरीही हा मतदारसंघ मुस्लिम बहुल समजला जातो, आणि अशा ठिकाणी भाजपने मारवाडी मतदाराला रिंगणात उतरवले.

सोबतच ममता बॅनर्जी यांनी देखील असे कोणतेही विधान केलेले नाही ज्यामुळे भाजपला ध्रुवीकरण करण्याची संधी मिळू शकेल. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज ममता बॅनर्जी यांनी भाजपला मात देत भवानीपूरच मैदान मारलं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.