उद्धव ठाकरेंनी खरंच राणेंचं कॉलेज एका फोनवर मंजूर केलं होतं ?

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं काल उद्घाटन झालं. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विमानतळाचं अखेर शेवटी लोकार्पण झालंय. पण हा कार्यक्रम राणे आणि शिवसेना यांच्यातल्या वादाची नांदी ठरण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण खुद्द नारायण राणे यांनीच लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला होता.

कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरू आहे असा आरोप राणे यांनी मराठी न्यूज चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीत केला होता, शिवसेनेच्या हप्तेखोर नेत्यांची नावं आपण कार्यक्रमात उघड करणार असल्याचं राणेंनी म्हटलं होतं. त्यामुळं नारायण राणे खरंच कुणाची नावं जाहीर करणार का? अशी उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती.

अपेक्षे प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात कलगीतुरा रंगला. आजचा दिवस आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर टीका केली, तर सेना नेत्यांची छायाचित्रे दाखवत, याच लोकांनी येथे रस्त्याचे कामही अडवले होते, असा आरोप राणे यांनी केला.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह काही वर्षांपूर्वी आपण या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो, असे सांगत, राणे यांनी त्या वेळी विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांची छायाचित्रे दाखवली आणि याच लोकांनी येथे रस्त्याचे कामही अडवले होते, असा आरोप नाव न घेता शिवसेनेवर आरोप केला.

राणेंच्या आरोपांना प्रत्यत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका गोष्टीचेस स्मरण करून दिले. ते आपल्या भाषणात म्हणले कि,

 ” राणे यांना आठवत नसेल; पण तुमच्या महाविद्यालयाच्या वेळी तुम्ही फोन केला होता; तेव्हा दुसऱ्या क्षणाला मी फाईलवर सही केली होती. कारण हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या, जनतेच्या भल्यासाठी होते.”

उद्धव ठाकरे यांनी एवढ्या महत्वाच्या उदघाटन सोहळ्यात असं मध्येच नारायण राणे यांना ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसंगाची आठवण करून दिली त्या मागे उद्धव ठाकरे यांचा काय हेतू असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच !

तर उद्धव ठाकरे यांनी भाषणात ह्या गोष्टीचा उल्लेख करण्यामागे काही महिन्यांआधी घडलेल्या घटना जबाबदार आहेत.

चला तर मग जाणून घेऊया  फेब्रुवारी महिन्यामध्ये याच वैद्यकीय महाविद्यालयावरून  राणे आणि शिवसेना यांच्या मध्ये रंगलेला कलगीतुरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे नारायण राणे यांच्या ट्रस्ट ने वैद्यकीय महाविद्यालय उभारले होते. वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार होते. उदघाटन सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला होता. त्याच दरम्यान सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या मध्ये आरोपांच्या फैरी झडत होत्या.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना एकदा, दोनदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता असा खुलासा विनायक राऊत यांनी केला होता.

राऊत म्हणाले,

“महाविद्यालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आला तेव्हा तातडीने त्यांनी मंजुरी दिली. जे रखडलं होतं ते यांच्या कंगालपणामुळे रखडलं होतं. नारायण राणे यांनी एकदा नव्हे तर तीन वेळा फोन केला होता. म्हणून मोठ्या मनाने चौकशी करून उद्धव ठाकरे यांनी काय काम आहे अशी विचारणा केली.”

पत्रकारांनी विनायक राऊत यांच्या या टीकेवर विचारले असता नारायण राणे म्हणाले होते कि,

“मेडिकल कॉलेजला परवानगी हा पूर्णत: केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यासाठी फोन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी याबाबत केलेला दावा राणे यांनी फेटाळला होता.

पण उदघाटनाच्या आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मेडिकल कॉलेजसाठी राज्य सरकारच्याही काही परवानग्या आवश्यक असतात. हे करताना कोणत्या प्रकारची आडकाठी आली का?, असे विचारले असता राणे यांनी अशी कोणतीही आडकाठी आली नसल्याचे सांगितले.

केंद्र असेल वा राज्य सरकार असेल मेडिकल कॉलेजबाबत मला कुणीही आडकाठी केली नाही. उद्धव ठाकरे यांचं मला चांगलं सहकार्य मिळालं. मेडिकल कॉलेजची फाइल परवानगीसाठी राज्य सरकारकडे आली तेव्हा मी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन केला. तुमच्याकडे माझ्या कॉलेजची फाइल आली आहे. त्यावर सही करा, अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व फाइलवर सही केली. त्यासाठी मी त्यांचे आभारही मानले, असे राणे म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांशी फोन वर संवाद न झाल्याचा सांगणारे राणे काही दिवसातच मुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयाच्या मंजुरी साठी सहकार्य केल्याचे कबुल केले होते.

कालच्या भाषणात याच मुद्द्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. बहुप्रतीक्षित चिपी विमानतळाचे उदघाटन तर झाले पण आता राणे ठाकरे वादाचा पुढचा अंक कोणता रंग पकडतो हे या निमित्ताने पाहणे महत्वाचे ठरेल.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.