मराठी घरात प्रत्येक सणाला हजेरी लावणाऱ्या पुरणपोळी मागं पण मोठा इतिहास आहे..

एक सुकी, एक रस्सा भाजी, कुरडया, पापड, भजी, वरण-भात-लिंबू, कटाची आमटी, दुधाची वाटी आणि या सगळ्यासोबत गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार. मराठी घरांत कुठल्याही सणाला हाच मेनू असतो. मन भरेपर्यंत जेवायचं आणि निवांत लोळत झोपायचं हा तर अधिलिखित नियम. प्रत्येक सणाला जेवणाचं ताट असंच सजतं, यातल्या काही पदार्थाचं इनकमिंग आऊटगोईंग सुरू असतं, एक पदार्थ मात्र कायम असतो तो म्हणजे पुरणपोळी. आता आज होळीच्या निमित्तानं तुम्ही पुरणपोळी हाणलीच असेल.

सांगायचा विषय म्हणजे आपल्या आवडत्या पुरणपोळीला पण इतिहास आहे.

पुरणपोळी फक्त आपल्या महाराष्ट्रातच मिळते असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. इकडं आपण पुरणपोळी म्हणायचं का पोळी यात भांडत राहिलो आणि इतिहासाची पुस्तकं धूळ खात राहिली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरळ अशा भारताच्या जवळपास सगळ्या प्रांतात पुरणपोळी बनते. सगळीकडे मटेरियल सारखंच असतं, फक्त नाव बदलतं.

पुराणातलं पुरण
पुरणाची ही कहाणी पुराणात सुद्धा लिहिलेली आहे. बाराव्या शतकातला दक्षिण भारतीय राजा सोमेश्वरनं लिहिलेल्या संस्कृत संदर्भांत पुरणपोळीचा उल्ल्लेख आढळतो. गोविंद दासानं लिहिलेल्या भैशज्य रत्नावली आणि भावप्रकाश या दोन ग्रंथांत पुरणपोळीचा रेसिपीसकट उल्लेख आहे. गोविंद दास ‘गोड भरलेली पोळी’ असा उल्लेख करत म्हणतो, तूरडाळ, चणाडाळ आणि मूगडाळ या तीन प्रकारच्या डाळींचे पुरण करावं, ते कणकेत भरावं आणि लाटून साजूक तुपावर भाजावं. पुढं त्यानं मूगडाळ पचायला हलकी असल्यानं, तिचा औषध म्हणूनही वापर केला जाऊ शकतो असंही लिहिलं आहे.

चौदाव्या शतकात महाकवी अलसानि पेडण्णानं लिहिलेल्या मनुचरित्रातही पुरणपोळीची रेसिपी आहे.

पेशव्यांच्या स्वयंपाकघरातही
शनिवारवाड्यावर झडणाऱ्या पंक्तींमध्येही पुरणपोळ्यांचं ताट हमखास फिरत असणार. कारण पेशव्यांच्या खाद्य इतिहासात पिवळ्या रंगाचा गूळ, चण्याच्या डाळीचं पुरण आणि वेलची घालून साजूक तुपावर भाजलेल्या गव्हाच्या पुरणपोळीचा उल्लेख सापडतो.

पानिपतच्या युद्धानंतर, अनेक जण युद्धभूमीच्या भागातच स्थायिक झाले. रोड मराठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुटुंबांच्या जुन्या पिढ्या पुरणपोळी बनवायच्या. आता तिकडे पुरणपोळी बनत नसली, तरी महाराष्ट्रातलं खास पक्वान्न म्हणून पुरणपोळीची ओळख आजही कायम आहे.

पदार्थ एक, नावं अनेक

भारताच्या दक्षिण भागात जवळपास सगळीकडे पुरणपोळी बनते. तमिळनाडूमध्ये पुरणपोळीला ओप्पूटू म्हणतात. ओप्पूटूमधले काही प्रकार नारळ आणि साखर घालूनही बनवतात. केरळमध्ये पायसाबोली नावानं पुरणपोळी हिट आहे. विशेषतः संध्या आणि ओणमच्या दिवशी पायसमसोबत ओप्पूटू किंवा पायसाबोली खाल्ली जाते. कर्नाटकमध्ये नारळा उबट्टी आणि मुगडाळ उबट्टी हे दोन प्रकार केले जातात. नारळा उबट्टीत ओल्या खोबऱ्यात थोडीशी शिजलेली चणाडाळ घालून, साखर आणि वेलची घालतात याचं पुरण बनवून ते पोळीत भरतात. मुगडाळ उबट्टीत चणाडाळ आणि खोबऱ्याची जागा मूगडाळ घेते. एवढंच नाही, तर कच्छ मारवाड भागातही मूगडाळीचं पुरण वापरून पोळी बनवतात. तिथं पोळी बनवताना गव्हाऐवजी मैद्याचा वापर केला जातो.

आपल्या महाराष्ट्रातही पुरणपोळीची अनेक रूपं आहेत. नागपंचमीला अनेक घरांमध्ये तवा वापरला जात नाही, त्यावेळी पुरणाची उकडलेली दिंड केली जातात. श्रावणी शुक्रवारी पुरण घातलेल्या करंज्या केल्या जातात. नागपूरला पराठ्यासारखी जाडसर अशी पुरणपोळी केली जाते. कोकण आणि पुण्यात मऊसूत, बारीक पदर असलेली पुरणपोळी असते.

या सगळ्याला जोडणारा समान धागा म्हणजे सण आणि जिभेवरची चव!

कुठल्याही सणाला घरात थोडं का होईना गोड बनवावं असा प्रघात आहे. आपल्याकडे देवाला पुरणाचा नैवैद्यही असतोच. करायला थोडा अवघड असला तरी सगळं सामान घरातच उपलब्ध असल्यानं पुरणपोळी लोकप्रिय ठरली. दसरा हा साडेतीन शुभ महूर्तांपैकी महत्वाचा मुहूर्त असल्यानं पुरणपोळीशिवाय हा सण साजरा करण्याचा विषयच येत नाही!

आता पुरणपोळी आईस्क्रीम, पुरणपोळी कुल्फी असे अनेक प्रकार आले असले, तरी  साजूक तुपाची धार सोडलेली पुरणपोळी खाण्याची सर या जगात कशाला नाही, शंभर टक्के!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.