कलमाडींना गजाआड पाठवणारे संजय सिंह, आता आर्यन खान प्रकरणाच्या तपासाचे कॅप्टन आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातच आर्यन खान आणि क्रूझ पार्टी प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणात आधी अटक नाट्य रंगलं, मग आर्यनला जामीन मिळणार का नाही यात बराच वेळ गेला. हे सगळं सुरू असतानाच महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या.

नवाब मलिक यांनी वानखेडे यांची लाईफस्टाईल आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवरून अत्यंत गंभीर आरोप केले. वानखेडे कारवाईच्या नावाखाली वसुली करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वानखेडे यांच्या बहिणीनं मलिक यांच्या विरोधात पोलीस तक्रारही केली.

आता या प्रकरणात काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता असताना, वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून हकालपट्टी झाली आहे अशी बातमी समोर आली.

या विषयी अधिक माहिती देताना, एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, ‘समीर यांच्या झोनमधल्या एकूण ६ प्रकरणांची दिल्ली एनसीबीकडून चौकशी केली जाईल, ज्यात आर्यन खानच्या प्रकरणाचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय असून आर्यन खान आणि इतर ५ प्रकरणांचा यात समावेश असेल.’

तर समीर यांनी, ‘या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी रिट याचिका मी न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळं आर्यन खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडून चौकशी सुरू होईल. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी टीम्स ही चौकशी समन्वयानं पार पाडतील,’ अशी प्रतिक्रिया दिली.

रात्री उशिरा एनसीबीनं कुठल्याही अधिकाऱ्याला आपल्या जागेवरून हटवलं नसल्याचं आणि मुंबई आणि दिल्ली टीम्स या केसवर एकत्र काम करण्याचं सांगितलं. सोबतच ही कारवाई करताना समीर वानखेडे दिल्लीच्या एसआयटीला सहकार्य करतील असंही एनसीबीनं सांगितलं.

आता वानखेडे यांच्या जागी या तपासाचे कॅप्टन संजय कुमार सिंह असतील.

संजय कुमार सिंह आहेत तरी कोण?

संजय सिंह हे १९९६ च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी सीबीआयमध्ये काम केलं होतं, तर सध्या ते एनसीबीचे उपमहासंचालक आहेत. संजय सिंह यांनीच ओडिशामधल्या अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचं नेतृत्वही केलं होतं.

महत्त्वाचं म्हणजे २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय टीमवरही सिंह यांचीच देखरेख होती.

आता आर्यन खान ड्रग्स प्रकरणासोबतच इतर पाच केसेसचा तपास सिंह यांच्या नेतृत्वात होईल. या पाच केसेसमध्ये समीर खान प्रकरणासोबतच बॉलिवूडशी कनेक्शन असलेल्या संवेदनशील केसेसचाही समावेश असेल.

त्यामुळं आता आर्यन खान प्रकरणाला कुठलं नवं वळण लागणार का? मलिक आणि वानखेडे यांच्या वादावर पडदा पडणार की आणखी नवी माहिती समोर येणार? असे बरेच प्रश्न समोर आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.