समीर वानखेडेंच्या महाग कपड्यांमागचं कारण त्यांच्या आईचा पाठिंबाय

सध्या ना भारत हरल्याची चर्चा आहे, ना दिवाळीच्या बोनसची. सकाळी झोपेतून उठल्यावर लोकं हातात फोन घेऊन काय चेक करत असतील, तर मलिक-वानखेडे प्रकरणात नवीन काय झालं.

आता रोज नव्या अपडेट येतात आणि रोज नवे आरोप होतात. जितके आरोप तितकी उत्तरं आणि तितक्या नव्या शक्यता.

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी, ‘समीर वानखेडे रोज नवे कपडे घालून येतात. त्यांचा शर्ट ५० हजारांचा घालतात. त्यांचा पट्टा एक लाखाचा, बूट अडीच लाखांचे, घड्याळं २५-३० लाखांची असतात. ते याबाबतीत मोदींपेक्षाही पुढे गेले आहेत. एकदा घातलेले कपडे वानखेडेंच्या अंगावर पुन्हा दिसत नाहीत,’ असा आरोप केला.

वानखेडेंनी बॉलिवूडकडून वसुली केली

‘वानखेडे २०२० मध्ये आल्यानंतर, एनसीबीनं एक खटला दाखल केला. त्या खटल्यात सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण यांना बोलवण्यात आलं. या केसमध्ये अजूनही आरोपपत्र दाखल झालेलं नाही आणि आजपर्यंत ती केस बंदही झालेली नाही. याच केसमधून हजारो कोटींची वसुली झाली. वानखेडेंनी मालदीवमध्ये ही वसुली केली. कारण मालदीवचा एवढ्या लोकांचा दौरा स्वस्त नसतो. त्यासाठी लाखोंमध्ये खर्च येतो. हा खर्च कोणत्या अकाऊंटवरून झाला याचा एनसीबीनं चौकशी करावी,’ असंही मलिक म्हणाले.

वसुलीसाठी प्रायव्हेट आर्मी

वानखेडेंनी वसुलीसाठी आपली प्रायव्हेट आर्मी तयार केली आहे. असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला. ते म्हणाले, ‘या प्रायव्हेट आर्मीत किरण गोसावी, मनीष भानुशाली, फ्रेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसुजा, इलू पठाण या सर्वांचा समावेश होता. ही प्रायव्हेट आर्मी शहरात ड्रग्जचा व्यवसाय करते. छोटी प्रकरणं समोर येतात, मात्र मोठी प्रकरणं सुरूच राहतात.’

या आरोपांच्या भाऊगर्दीत मलिकांचा मुख्य सवाल होता, एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो का?

त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिलंय-

समीर यांची सर्व संपत्ती त्यांच्या आईनं त्या हयात असताना कमवलेली आहे. ही रक्कम नक्कीच ५० किंवा १०० कोटी इतकी नाही. समीर १५ वर्षांचे असल्यापासून ही संपत्ती आहे. याविषयीची सर्व कागदपत्रं सरकारी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या नियमानुसार वेळोवेळी सरकारला दिलेली आहेत. त्यामुळे ही बेनामी संपत्ती नाही, असं ट्विट क्रांती यांनी केलंय.

यात शेवटी त्यांनी नवाबांना उद्देशून म्हणलंय,

सावन के अंधे को हरियाली दिखती है

आता क्रांती यांचं म्हणणं खरं मानलं, तर वानखेडे यांचे महागडे कपडे, मालदीव दौरा हा आईमुळं त्यांच्याकडं आलेल्या संपत्तीच्या जोरावर शक्य आहे, असं आपण समजू शकतो.

पण कहाणीत आणखी एक ट्विस्ट आहे,

वानखेडे यांनी मलिक यांचे महागड्या जीवनशैलीबाबतचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात, ‘माझ्या महागड्या कपड्यांबाबतच्या गोष्टी या अफवा आहेत. मलिक यांना कमी ज्ञान आहे आणि त्यांनी या गोष्टींचा नीट शोध लावला पाहिजे. मी माझ्या कुटुंबासोबत मालदीव किंवा दुबईला गेल्याचीही अफवा आहे.’

आता नक्की कोण खरं बोलतंय हे कळायला काही मार्ग नाही गड्यांनो, पण जेव्हा आम्हाला कळणार तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की सांगणार.
ये वादा रहा.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.