कांद्यानंतर आता कापसाच्या लिलावातही ‘लासूर पॅटर्न’ हिट ठरतोय

कापूस हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा नसला, तरी गरजेचा विषय. कापसाची चर्चा काय आपल्या हातात कपडे आल्यावर होत नाय, तर पार बियाणाच्या किमती, हवामानाचे परिणाम, कापसाचं उत्पादन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापसाला मिळणारी किंमत या सगळ्या गोष्टी कायम चर्चेत असतात.

बाजार समित्यांमध्ये कुठल्या पिकाला किती भाव मिळाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं की फायदा, अशा अनेक बातम्या आपण सातत्यानं वाचत असतो.

पेरणी, मशागत आणि नंतर काढणी अशी सगळी कामं शेतकरी अत्यंत कष्टानं करतो. मात्र आपल्या मालाचा भाव ठरवण्याची पॉवर शेतकऱ्याकडे नसते. बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांची मनमानी झाली, शेतकऱ्यांनी माल फेकून दिला अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळं, मेहनत घेऊनही शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागतं.

कापूस हे तसं अत्यंत महत्त्वाचं आणि राज्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं नगदी पीक. कापसाचं पीक जवळपास सहा महिने जमिनीत असतं. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये कापसाची पेरणी करण्यासाठीच्या वेळाही वेगवेगळ्या आहेत. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात मार्चच्या पहिल्या पंधरा दिवसात लागवड केली जाते, तर खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसाठी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरा दिवसांमध्ये, तर अहमदनगरमध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरा दिवसात कापसाची पेरणी करण्याला प्राधान्य दिलं जातं.

बाजार समित्यांमध्ये कापसाला मिळणार भाव तर कायम हेडलाईन्समध्ये असणारा विषय. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या राहिलेल्या या बाजार समित्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बाजार भावाबाबत योग्य निर्णय घेतले, तर शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होतो. हे दाखवून दिलंय ते लातूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने.

कांद्याच्या लिलावावेळीही आलेली चर्चेत

औरंगाबाद जिल्ह्यात ही बाजारपेठ दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. याआधी ही बाजार समिती कांद्याच्या लिलावावेळीही चर्चेत आली होती. कांद्याचे भाव कमी झालेले असताना, त्यांनी बाजार समितीच्या आवारातच मोकळ्या कांद्याचा लिलाव करायला घेतले. खुल्या मार्केटमुळे कांद्यालाही चांगला दर मिळाला होता. त्यांच्या या उपक्रमाची बरीच चर्चाही झाली होती.

कापसासाठीचा लासूर पॅटर्न काय आहे?

कांद्याच्या वेळी केलेला प्रयोग बाजार समितीनं आता कापसासाठीही वापरला आहे. कापसाचं पिक सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळंच समितीनं हा उपक्रम सुरू केला आहे. इथं शेतीमालाच्या दर्जानुसारच दर ठरतात आणि ते संचालक मंडळाकडूनच काढले जातात.

या कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांना नवा पर्याय दिला असून, कापसाचा खुला लिलाव सुरू केला आहे. या खुल्या लिलावात कुणी एक व्यापारी असून चालत नाही, तर एकाहून अधिक व्यापाऱ्यांचा समावेश असतो. साहजिकच स्पर्धा वाढते आणि शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळायला मदत होते.

या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी कापसाला ८ हजार ४३० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

मिळालेला प्रतिसाद पाहता, येत्या काही दिवसांत या बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढेल आणि शेतकऱ्यांना मिळणार भावही वधारेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.