खाजगी आयुष्यात चर्चेत असणाऱ्या तृणमूलच्या खासदार आता पक्ष कारवाईमुळे चर्चेत आल्यात

ममता दीदींचा तृणमूल पक्ष सध्या देशभरात चर्चित आहे, तो आपल्या तिसऱ्या आघाडीच्या बनण्याच्या प्रयत्नामुळं. म्हणजे ममता दीदी आणि आणि पक्षाचे दिग्गज नेते देशभरात भाजप विरोधी नेत्यांना भेटून या आघाडीसाठी प्रयत्न करतायेत. त्यामुळे पक्ष रोजचं बातम्यांमध्ये झळकत असतो.

दरम्यान आता ममता दीदींचा टीएमसी चर्चेत आलाय तो आपल्या पक्षांतर्गत कारवाईमुळं. आणि कारवाई साधी नाही तर आपला बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम बंगालमधल्या दोन प्रसिद्ध चेहऱ्यांवर होणार आहे. असे चेहरे जे मनोरंजन आणि राजकारण अश्या दोन्ही क्षेत्रात लाईमलाईट असतात.

हे दोन चेहरे म्हणजे अर्थातचं तृणमूल काँग्रेसच्या जादवपूर मतदार संघाच्या खासदार मिमी चक्रवर्ती आणि बसीरहाट मतदारसंघाच्या खासदार नुसरत जहाँ. या दोन्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपापल्या जागा जिंकून खासदार झाल्या होत्या. पण या  खासदारांची वेगळी ओळख म्हणजे त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यामुळे ते नेहमीच चर्चची असतात.

पण आता चर्चा आहे ती त्यांच्या पक्ष कारवाईची. तृणमूल काँग्रेस (TMC) च्या शीर्ष नेत्यांनी शुक्रवारी रात्री सांगितले की, TMC ने त्यांच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

झालं असं कि,  हिवाळी अधिवेशनात गोधळ घातल्या कारणामुळं राज्यसभेच्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आलं. या निलंबनाविरोधात १०० पेक्षा जास्त विरोधी खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. यापैकी दोन खासदार टीएमसीमधले आहे.

कोलकाता येथील एका वरिष्ठ टीएमसी नेत्याने सांगितले की,  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि डायमंड हार्बरचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांनी देखील संसदेत गांधींच्या पुतळ्याजवळील आंदोलनात सामील होण्यासाठी  आपले वेळापत्रक बदलले. त्यांनी खासदारांसोबतही बैठका घेतल्या. या बैठकीत पक्षातले सगळेच खासदार हजार होते, फक्त या दोन्ही खासदार गैरहजर राहिल्या. त्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज आहे.

दोन दिवसांपूर्वी टीएमसीच्या संसदीय समितीच्या बैठकीत मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी नेतृत्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि १२ राज्यसभा सदस्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आयोजित धरणे सोडून दिले. नोटीसमध्ये या खासदारांना अभिषेक बॅनर्जी यांच्या बैठकीला हजर न राहिल्या प्रकरणी खडसावले आहे.

दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत पक्षाचा इतर राज्यात विस्तार करण्याच्या इराद्यावर चर्चा करण्यात आली.

यासोबतच पक्षाने आपल्या ‘जागो बांग्ला’ या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले की,

काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षाचा झेंडा पुढे नेण्यात अपयशी ठरली आहे. काँग्रेसने भाजपचा विजयरथ रोखणे अपेक्षित होते, तो केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र, उदासीन वृत्ती, लढाईत थकून जाणं, पक्षांतर्गत भांडण आणि गटबाजीमुळे पक्ष पार संपण्याच्या मार्गावर आहे. पण वेळ कोणाचीच वाट पाहत नाही, कुणीतरी पुढे यायला हवे. टीएमसी ही जबाबदारी उचलेल. हीच खरी काँग्रेस आहे.

आता पक्षानं या दोन्ही खासदारांना नोटीस बजावली खरी, पण पक्षाच्या या नोटीसचं उत्तर या खासदार काय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच पक्ष मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

हे ही वाचं  भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.