एवढी कट्टर दुष्मनी असूनही, भारत चीनसोबत व्यापार करतो यामागंही कारण आहे

नवनवं व्हॉट्सअप आलं होतं, फॅमिली ग्रुपवर शुभ सकाळ, शुभ दुपार या निबंधांसोबतच एक इमेज फिरायची. बारक्या पोरानं ओरिजिनल या शब्दाचा विरुद्धार्थ लिहिला होता, चायना माल. आता कितीही पांचट वाटत असलं, तरी या जोकवर आपण ख्या ख्या करुन लई हसलोय हे पण खरं. तेव्हा चायना फोन, चायनाचा स्पीकर, चायनाची लाईट या असल्या गोष्टी एकदम हिट होत्या. अर्थात हे सगळं कमी किंमतीत मिळायचं म्हणून आणि क्वालिटीचं म्हणाल, तर चले तो चांद तक, नही तो शाम तक.

पुढं स्वस्तात मस्त ही स्कीम भारतातले व्यापारीही वापरु लागले, पण तरीही चायना मालचा नाद प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होताच. या चायना मालावरुन राडा झाला तो चीन सीमाभागांमध्ये कुरापती करायला लागल्यावर. सरकारनं चायनीज ऍप्सवर बंदी टाकत पहिला फटाका फोडला, त्यानंतर बॅन चायना मोहीम देशातल्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चालवली. आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धांमधूनही चायनीज ब्रॅण्ड्सला कल्टी देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपूर्वीच इस्रो आणि चायनीज कंपनी ओप्पो यांच्यात करार झाल्याची बातमी आपण पाहिली. त्यावरुन टीकाही झाली. सध्या मात्र आणखीन एक माहिती समोर आली आहे, ज्यावरुन लक्षात येतंय की, बॅन चायना मोहिमेचा दोन देशांमधल्या व्यवहारावर अजिबात परिणाम झालेला नाही.

 २०२१ या वर्षात या दोन्ही देशांमध्ये १२५ अरब डॉलर्सचा व्यवहार झालाय, पण यात भारताच्या वाट्याला नुकसानच आलंय. भारतानं जितका माल चीनमधून आयात केला, त्यापेक्षा कितीतरी कमी माल चीनमध्ये निर्यात केला. साहजिकच भारताला जवळपास ५४ टक्के लॉस सहन करावा लागलाय.

आता आपण एवढं मेक इन इंडिया करतोय, बॅन चायना म्हणतोय… मग तरी असा विषय का होतोय?

यामागचं मुख्य कारण म्हणजे भारतातले व्यापारी आयातीसाठी चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. भारत चीनमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं मोठ्या प्रमाणावर आयात करतं. त्यानंतर नंबर लागतो, तो प्लॅस्टिक, फर्टिलायझर्स, केमिकल्स, मशिन्स यांचा. आपण मार्केटमध्ये गेल्यावर जे किरकोळ सामान, फुलांच्या माळा, लाईटच्या माळा असलं काय काय घेताना मेड ईन चायना आहे का हे बघत बसतो खरं, पण त्या सगळ्या मटेरीयलचा या आयातीत फक्त दोन टक्के समावेश असतो.

भारत एवढा स्ट्रॉंग बनलाय, तरी व्यापाऱ्यांना चीनमधून सामान आयात करण्याची गरज का पडतेय? याचं उत्तर आहे स्वस्ताई. भारत सरकारनं कोविड काळ आणि बॅन चायना मोहिमेच्या पार्श्वभूमीवर चीनऐवजी सिंगापूर किंवा तैवानमधून कच्चा माल आयात करा असा सल्ला दिला होता. मात्र चीनमधून मिळणारा कच्चा माल आणि इतर देशांमधून मिळणारा कच्चा माल यांच्या किंमतीत बरीच तफावत आहे. साहजिकच कच्च्या मालासाठी जास्त किंमत मोजणं व्यापाऱ्यांना परवडणारं नाही.

कारची लाईट चीनमध्ये १२०० रुपायाला मिळते, तर तैवानमध्ये याची किंमत जाते साधारण ३००० रुपयांपर्यंत. फक्त लाईटच नाही, तर इतर गोष्टीही चीनमध्ये बऱ्याच स्वस्त मिळतायत. औषधं, मोबाईल्स या गरजेच्या गोष्टी बनवण्यासाठी लागणारा कच्चा मालही चीनमधूनच येतो. त्यामुळे चीनमधून आयात न करणं किंवा आयातीवर निर्बंध टाकणं शहाणपणाचं ठरणार नाही, यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचं नुकसान होईल, असं तज्ञांचं मत आहे.

यावर उपाय म्हणून चीनमध्ये निर्यात वाढवणं गरजेचं आहे. भारत चीनमध्ये मसाले, तांदूळ, लोखंड, मासे, काळी मिरची अशा गोष्टी निर्यात करतो. त्यामुळे आयात न थांबवता भारताने निर्यातीवर भर दिला, तर नुकसान भरुन येऊ शकतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.