कराराच्या वेळी इंदिराजींना सावध करायला अटलजी शिमल्याला गेले होते !

१९७१ सालच्या बांगलादेशच्या निर्मितीनंतरच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेला ‘शिमला करार’ हा भारताच्या राजकीय इतिहासात युद्धातील विजयानंतर तहामध्ये झालेल्या पराभवाचं उत्तम उदाहरण समजला जातो. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यादरम्यान हा करार झाला होता.

काय होता शिमला करार..?

१९७१ सालच्या युद्धानंतर भारत-पाक संबंध अतिशय बिघडले होते. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्राधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांच्यासमोर शांततेची बोलणी करण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता.

शांततेच्या बोलणीपेक्षा भुट्टो यांच्या दृष्टीने  भारताने युद्धात बंदी बनवलेल्या ९३००० पाकिस्तानी सैनिकांना सोडवणं आणि युद्धात भारताने जिंकलेला  पाकिस्तानचा भूप्रदेश परत मिळवणं अधिक महत्वाचं होतं. त्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव होता.

२ जुलै १९७२ रोजीच्या मध्यरात्री शिमला येथे दोन्ही देशांमध्ये हा करार पार पडला आणि भारताने पाकिस्तानच्या सैनिकांची सुटका केली तसेच त्यांचा जिंकलेला भूप्रदेश त्यांना परत केला.

भविष्यात दोन्ही देशांमधील कुठल्याही समस्येसंबंधीची बोलणी ही फक्त द्विपक्षीय पातळीवरच होईल आणि तिसऱ्या कुठल्याच पक्षाचा त्यात समावेश असणार नाही, असंही या करारात मान्य करण्यात आलं.

अटलजी गेले होते इंदिराजींना भेटायला

भारताने या कराराच्यावेळी पाकिस्तान आणि भुट्टो यांच्याप्रती कसलीही सहानुभूती बाळगून पाकिस्तानला सूट देऊ नये, हे सांगण्यासाठी जनसंघाचे तत्कालीन अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी आणि स्वातंत्र्य पार्टीचे पिलू मोदी इंदिराजींना भेटायला शिमला येथे गेले होते.

यापूर्वी १९९५ सालच्या युद्धात देखील भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर ताश्कंद येथे झालेल्या करारात भारताने पाकिस्तानचा जिंकलेला असा भूप्रदेश परत केला, ज्या वाटेने पाकिस्तानी घुसखोर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणतात, असा आरोप करत लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळातील महावीर त्यागी यांनी राजीनामा दिला होता.

ताश्कंद करारात झालेली चूक शिमला करारात परत होऊ नये, हेच इंदिराजींना समजावून सांगण्याचा अटलजींचा प्रयत्न होता, पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यासाठी त्यांनी शिमल्यात पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि सैन्याचं बलिदान वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान इंदिरा गांधींना केलं होतं.

शिमला करार झाल्यानंतर भारतातील विरोधी पक्षांनी या करारासाठी सरकारवर कडवट टीका केली होती. अटलजींनी प्रतिक्रिया दिली की, “भारत सरकारने पाकिस्तानसमोर शरणागती पत्करली. दोन्ही देशांमधील चालू वादांवर कुठलाही तोडगा निघालेला नसतानाही हा करार स्वीकारण्यात आल्याने काश्मीरसारखा मुद्दा भविष्यात देखील ज्वलंत राहील”

शिमला करार पाकिस्तानचा विजय होता…?

चर्चांच्या अनेक फेऱ्या होऊन देखील हा करार होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान भुट्टो इंदिरा गांधींना भेटायला गेले होते. आपण खाली हाताने पाकिस्तानात परतू इच्छित नाही, त्यासाठी हा करार व्हावा यासाठी भुट्टो इंदिराजींना विनंती करत होते.

भुत्तोंनी इंदिरा गांधींना अनेक आश्वासने दिली होती. पण ही सगळी आश्वासनं तोंडी स्वरुपाची होती. कुठेही लिखित स्वरुपात काहीच नव्हतं. त्यामुळे भूत्तोंवर विश्वास ठेऊन इंदिरा गांधी करार तर केला पण करारातून आपल्याला हवं ते मिळाल्यानंतर आपली सगळी आश्वासनं भुट्टो मात्र विसरून गेले.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.