शार्क टॅंकमध्ये नाव झळकवणाऱ्या नमिता थापर आपल्या महाराष्ट्राच्या आहेत भिडू

सध्या एक असा  रिऍलिटी शो टीव्हीवर आला आहे जो प्रत्येकाचाच चर्चेचा विषय बनला आहे. म्हणजे ज्याच्या बघावं त्याच्या तोंडात या शोचं नाव आहे. ज्यांना बिसनेसमध्ये काडीमात्र इंटरेस्ट नाही असेही हा शो बघताना आणि त्याबद्दल बोलताना दिसताय. आता इतक सांगितल्यावर तुम्हालाही अंदाज आलाच असेल की कोणत्या शो बद्दल हा भिडू बोलतोय. होय, हा शो म्हणजे शार्क टॅंक इंडिया. 

या शोमध्ये भारतातील पाच प्रतिष्ठित ब्रँडचे मोठ्या पदावर असणारे व्यक्ती जज म्हणून घेण्यात आले आहेत. जे शोमध्ये आपला बिसनेस आणि आयडिया घेऊन येणाऱ्या कंटेस्टन्ट्सला इन्व्हेस्टमेंट ऑफर देतात. यातील प्रत्येकाचीच आपली एक स्टोरी आहे. पण आता ज्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे नमिता थापर.

नमिता थापर हे नाव भारतातील अग्रगण्य व्यावसायिक महिलांपैकी एक असून एमक्यूर फार्मास्युटिकल्स या भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनीच्या त्या सीईओ आहेत. यात गर्वाची बाब म्हणजे ही कंपनी आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्यात आहे!

बिसनेस वर्ल्डमध्ये खूप फेमस चेहरा असलेल्या नमिता थापर शार्क टॅंकमध्ये आल्यापासून अनेक मुलांची क्रश झालेली आहे. पण या स्टेजपर्यंत पोहोचण्याची त्यांची स्टोरीही तितकीच प्रोत्साहन देणारी आहे भिडू.

नमिता थापर यांचा जन्म पुण्याचाच, २१ मार्च १९७७ चा. त्यांचं शालेय शिक्षणही पुण्यातच झालं आणि  आयसीएआय (ICAI) मधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवली. त्यांना आधीपासूनही बिसनेस करायचा होता. त्यानुसार त्यांनी जिद्दीने अभ्यास सुरु केला आणि त्यानुसार नंतर ड्यूक युनिव्हर्सिटीच्या फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए आणि पदवीसुद्धा पूर्ण केली. 

जे करायचं ते स्वतःच्या हिंमतीवर हे त्यांचं आधीपासूनचं ब्रीदवाक्य. कधीही कुणावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही आणि स्वतःची एक ओळखही समाजात निर्माण करायची, हे ध्येय समोर ठेवून त्यांनी मार्गक्रमण सुरु केलं. यात त्यांच्या पालकांनीही नेहमी त्यांना साथ दिली. 

शिक्षणानंतर त्यांनी करिअरची सुरुवात केली ती यूएसएच्या गाईडन्ट कॉर्पोरेशन या कंपनी सोबत. या कंपनीसोबत काम करताना त्यांनी बिसनेसच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींचं नीट निरीक्षण केलं. आणि कोणत्या गोष्टींची भारतात बिसनेस करताना गरज पडेल हे समजून घेतलं. सहा वर्ष या कंपनीसोबत काम केल्यानंतर नमिता भारतातील एमक्यूर कंपनीत सीएफओ (CFO) म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्यांचं काम बघून लवकरच जास्त जबाबदाऱ्या त्यांना मिळाल्या. कामाचं क्षेत्र विस्तारलं आणि आता त्या एमक्यूर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक आहेत.

नमिता फुका स्कूल ऑफ बिझनेस इंडियाच्या प्रादेशिक सल्लागार मंडळाच्या सदस्या देखील आहेत. टीआयई (TiE) मुंबई विश्वस्त मंडळावर ट्रस्टी म्हणून काम करत आहेत. इतकंच नाही तर त्या यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनच्या सक्रिय सदस्य सुद्धा आहेत.

या कामाव्यतिरिक्त, त्या हार्वर्ड बिझनेस स्कूल, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (IIM A), ईटी (ET) वुमेन्स कॉन्फरन्स तसंच FICCI सारख्या विविध प्रतिष्ठित मंचांवर स्पीकर देखील आहे. त्यांनी ‘अनकंडिशनल युवरसेल्फ विथ नमिता’ या नावाचे युट्युब चॅनलही सुरू केलं. ज्यात त्या मुलींच्या कल्याणाविषयी बोलतात. याव्यतिरिक्त नमिता ‘इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेड’ देखील चालवतात, जी एक शैक्षणिक कंपनी असून व्यावसायिक अनुभव प्रदान करते.

अशा या नमिता थापर भारत सरकारसोबतही काम करतात.

व्यवसाय करण्यासोबतच, नमिता नीती आयोगाच्या ‘महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म’ आणि ‘डिजिटल हेल्थ टास्क फोर्स’ आणि ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ यासारख्या वेगवेगळ्या सरकारी उपक्रमांशी सुद्धा संबंधित आहे. हे कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणनिर्मितीमध्ये G2B च्या भागीदारीसाठी सुरू केले आहेत.

त्यांच्या प्रतिभेला आणि कामाला पारखत अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. ज्यातील काही ठराविक आणि विशेष पुरस्कार म्हणजे – द इकॉनॉमिक टाइम्स ‘४० अंडर फोर्टी’ पुरस्कार, बार्कलेज हुरून नेक्स्ट जनरल लीडर रिकग्निशन, इकॉनॉमिक टाइम्स २०१७ वूमन अहेड लिस्ट आणि जागतिक महिला नेतृत्व काँग्रेस सुपर अचिव्हर पुरस्कार यांचा समावेश आहे.

नमिता थापर यांची २०२१ मध्ये एकूण संपत्ती अंदाजे ६०० कोटी इतकी होती. यातून दिसून येतं की वूमन इम्पावरमेंट काय असतं ते! अशा या नमिता थापर भारतातील अनेक महिला आणि पुरुषांसाठीही आदर्श ठरत आहेत. बिसनेसची आवड नसतानाही अनेक जण नमिता थापर यांना बघून प्रोत्साहित होत आहेत आणि या क्षेत्राकडे वळण्याचा विचार करत आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.