व्हायरल व्हिडियोमध्ये राहुल गांधींसोबत क्लबमध्ये असलेली महिला चिनी राजदूत नाही, तर…

काल माध्यमांमध्ये दोन लोक खूप जास्त चर्चेचा विषय ठरले… एक म्हणजे राज ठाकरे तर दुसरे राहुल गांधी. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणं आणि नंतर त्यांना अटक होणार का? या चर्चा होत्या तर राहुल गांधींसंदर्भात नाईट क्लब आणि तिथली त्यांच्यासोबतच्या मुलगी, हा विषय होता. 

राज ठाकरेंचं वारं तर काही दिवस चालणारच आहे, मात्र राहुल गांधी यांचं वारं लगेच थांबलंय कारण ज्या गोष्टीमुळे ते आलं होतं ती गोष्टच साफ चूक निघाली आहे. 

सविस्तर जाणून घेऊ…

राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ काल ३ मे ला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये ते नाईट क्लबला असल्याचं दिसतंय. राहुल गांधी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळमध्ये गेले होते. वृत्तानुसार, सुम्मिमा उदास असं त्यांच्या मैत्रिणीचं नाव असून ती दिल्लीच्या सीएनएन इंटरनॅशनलमध्ये वार्ताहर आहे. म्यानमारमधील नेपाळचे माजी दूत भीम उदास यांची ती मुलगी आहे.

याच मैत्रिणीच्या लग्न समारंभाचा भाग म्हणून नाईट क्लबमध्ये पार्टी करतानाचा हा व्हिडीओ आहे. 

भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ३ मेला सकाळी हा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.

सुरुवात झाली जेव्हा भाजपचे लोक टीका करत होते की, राहुल गांधी कशाप्रकारे नाईट क्लबमध्ये मज्जा करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे लोक डिफेन्ड करत होते की हा त्यांचा वयक्तिक आयुष्याचा भाग आहे आणि लग्नाला जाणं यात काही गैर नाही. मग तिथे गेल्यावर त्यांनी एन्जॉय करणं यातही गैर नाही.

तर काही नेटिझन्सने यावेळी मोदी यांचे फोटो पोस्ट केले जेव्हा देशात पुलवामा हल्ला झाला होता आणि मोदी बाहेर देशात फोटोशूट करण्यात मग्न होते. त्यांना का नाही प्रश्न विचारले जात? असं वेगवेगळं चित्र समोर येत होतं.

मात्र काही वेळानंतर या गोष्टीला जास्त हवा मिळाली ती एक मुद्यानं…

राहुल गांधी या पार्टीमध्ये ज्या महिलेशी बोलताना दिसत आहेत, ती नेपाळमधील चीनची राजदूत ‘होउ यांकी’ आहे.

बस्स… या दाव्यानंतर राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकवर सपासप शेअर केला जाऊ लागला.

तुम्ही ही बघा…

राहुल गांधी नाइट क्लबमध्ये एका चीनच्या राजदूताला कसे भेटू शकतात, अशा पोस्टवर अनेकांनी चिंता व्यक्त केली. राहुल गांधींना भयंकर ट्रोल केलं जाऊ लागलं…

मात्र, या दाव्याच्या तपासात तो खोटा असल्याचं आढळून आलं आहे.

राहुल गांधींसोबत व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेबाबत करण्यात येत असलेल्या दाव्याबाबत सत्यता जाणून घेतली, तेव्हा समोर आलं की…

व्हिडिओतील महिला चीनची राजदूत होउ यांकी नाही, तर ही महिला नववधू सुम्मिमाची मैत्रिण आहे, जिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी नेपाळला गेले आहेत. 

ज्या क्लबमध्ये राहुल गांधी त्यांच्या मित्रांसोबत गेले होते, त्या क्लबशी इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने संपर्क साधला होता…

नेपाळच्या काठमांडूतील ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स’ असं या क्लबचं नाव आहे. पबचे मुख्य कार्यकारी अधिकारी राबिन श्रेष्ठा यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीतील घटना सांगितली.  

“गांधींनी २ मे रोजी पाच किंवा सहा लोकांसह पबला भेट दिली. ते दीड तास इथे होते. ही त्यांची वैयक्तिक भेट होती. चिनी दूतावासातील कोणीतरी त्यांच्या सोबत नव्हते, त्यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत चीनचे कोणतेही राजदूत उपस्थित नव्हते”

या गोष्टीला पब संचालकांनी दुजोरा दिला आणि अजून माहिती सांगण्यास नकार दिला. कारण राहुल गांधी त्यांचे कस्टमर आहेत, आणि ग्राहकांची अशी वयक्तिक माहिती देणं नियमात बसत नाही. 

तर काठमांडू पोस्टमधील ज्येष्ठ पत्रकार अनिल गिरी यांनी देखील “ती महिला वधूच्या बाजूने असून तिची मैत्रीण आहे” हाच दावा केला आहे.

अशाप्रकारे ज्या गोष्टीने वातावरण पेटलं, ती गोष्टच चूक निघाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उगाच उहापोह केल्याचा हा प्रकार असल्याचं समजतंय.

दावा तर खोटा निघाला मात्र तरी एक प्रश्न राहतो…

ज्या व्यक्तीच्या सोबत असल्याच्या दाव्याने इतका राडा झाला ती व्यक्ती होउ यांकी (Hou Yanqi) आहे तरी कोण?

 ज्या महिलेबद्दल बोललं गेलं, त्या होउ यांकी (Hou Yanqi) या महिलेला भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखलं जातं.

असं मानलं जातं की, के.पी.शर्मा ओली यांचे सरकार नेपाळमध्ये असताना यांकी इथे भारतविरोधी मोहीम राबवत होती. त्याचबरोबर २०२० मध्ये ओली सरकार वाचवण्यासाठीही यांकींनी बरेच प्रयत्न केले  होते.

नेपाळचा नवा नकाशा बनवण्यातही यांकी यांचा हा होता. या नकाशात कालापाणी, लिम्पियाधूरा, लिपूलेख या भूखंडांना नेपाळच्या सीमेमध्ये दाखवण्यात आलं होतं, ज्या भागावर सध्या भारताचा अधिकार आहे. ओली आणि तत्कालीन संसदेला देखील यांकी यांनी यासाठी तयार केलं होतं. 

२०२० मध्ये नेपाळची भारताविरुद्धची मोठी चाल म्हणून या नकाशाकडे पाहिलं गेलं.

२०२० मध्ये नेपाळमधील काही वृत्तपत्रांनीही त्यांच्या संपादकीयमध्ये राजदूत होउ यांकी आणि चीन यांनी नेपाळच्या देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याबद्दल टीका केली होती. केवळ माध्यमांनीच हा मुद्दा उपस्थित केला नव्हता तर विरोधी पक्षनेते, परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनीही यावर प्रश्न विचारले होते. 

होउ यांकी यांच्या अशाच भारतविरोधी धोरणामुळे राहुल गांधींसोबत त्यांचं असणं, वादग्रस्त ठरलं. मात्र हे दावे साफ खोटे निघाले.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.