तालिबान्यांनी सुरवातीला पुरोगामी आव आणलेला, पण आता ठासायला सुरवात केलीय..

शनिवारी ७ मे ला एक निर्णय जाहीर झाला.

अफगाणिस्तानात, ‘महिलांनी बुरखा घालूनच पब्लिक प्लेसमध्ये वावरायचं’.

निर्णय वाचून वेगळं असं काही वाटलं नाही. तालिबानांची सत्ता असलेल्या देशात अजून वेगळी अपेक्षा काय तरी केली जाऊ शकते!

यातील एक गोष्ट म्हणजे, तालिबानांनी स्वतः आधी म्हटलं होतं की, महिलांनी बुरखा घालण्याची गरज नाही. आमची अपेक्षा फक्त हिजाबची आहे. मात्र हे तालिबान सरकार आहे. भले त्यांनी काहीही म्हणू देत, ते कधीही त्यांच्या शब्दापासून पलटू शकतात याचं अजून एक उदाहरण त्यांनी यातून घातलंय.

पण इथे मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तो असा की, हा काही पहिलाच निर्बंध नाहीये जो तालिबानने महिलांवर लावला आहे. तालिबानची धोरणं नेहमीच महिलांसाठी बदलत राहिली आहे, ज्याचा खूप मनस्ताप अफगाणिस्तानच्या महिलांना सहन करावा लागत आहे.

अफगाणिस्तानसाठी २०२१ हे वर्ष संकटाचे काळे ढग घेऊन आलं. हे संकट म्हणजेच ‘तालिबान’.

तालिबानने अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि १५ ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानवर आपली सत्ता स्थापन केली. भारताने ज्या तारखेला स्वातंत्र्य मिळवलं त्याच तारखेला अफगाणिस्तानने त्यांचं स्वातंत्र्य गमावलं.

जसं तालिबानांचं राज्य आलं तशी सगळ्याच जगाला भीती वाटली ती तिथल्या महिलांच्या सुरक्षिततेची. कारण तालिबानचा इतिहास सांगतो की, त्यांच्या अधिपत्याखाली महिलांवरच सगळ्यात जास्त निर्बंध लादण्यात आले आहेत आणि महिलांचं अस्तित्व नाकारण्यातच तालिबान्यांना विजय वाटत आला आहे.

१९९६ ते २००१ या काळात जेव्हा अफगाणीस्तानवर तालिबान्यांनी पहिल्यांदा अधिकार मिळवलं होता तेव्ह पुरुषांनी आपली पँट पायाच्या घोट्याच्या वर ठेवायची, स्त्रियांना पूर्ण बुरखा घालायचा, स्त्री-पुरुषांनी एकाच छताखाली एकत्र यायचं नाही आणि अशी इतरही अनेक बंधने घालण्यात आली होती.

आता २०२१ मध्ये जेव्हा दुसऱ्यांदा अफगाणिस्तानवर त्यांनी अधिकार मिळवला तेव्हा तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, इस्लामी कायद्याच्या चौकटीत राहूनच महिलांचे हक्क निश्चित होतील, त्यांना शिक्षण आणि काम करण्याचा अधिकार असेल.

मात्र त्यानंतर महिलांवरच त्यांनी निर्बंधांची बंदूक डागल्याचं चित्र दिसतंय…

१. स्त्रियांनी कोणती कामं करावीत, यावर निर्बंध 

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर केवळ एक महिन्याने आदेश दिला की, पुरुष आणि स्त्रिया एकत्र काम करू शकत नाहीत. शिवाय जी कामे पुरुषांना करता येत नाहीत, तीच कामे स्त्रियांना करता येतील. सप्टेंबर २०२१ मध्ये तालिबानने राजधानी काबूलमध्ये बंदीचे आदेश दिले होते, जिथे मोठ्या संख्येने म्हणजेच सुमारे २७%  महिला सरकारी संस्थांमध्ये काम करत होत्या.

२. टीव्ही शोमध्ये न दिसणं

नोव्हेंबर २०२१ मध्ये अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने अभिनेत्रींसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या. त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कोणत्याही टीव्ही शो आणि सिरियल्समध्ये स्त्रिया दिसणार नाहीत…

तालिबानने यासंदर्भात ८ कलमी धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, अफगाणिस्तानमध्ये त्या सर्व टीव्ही शोवर बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये महिला पात्र दाखवले जात होते.

३. महिला पत्रकारांवर बंधन 

महिलांनी नोकरी करण्याला तालिबानचा सुरुवातीपासून विरोध आहे. अशात त्यांनी निशाणा साधला महिला पत्रकारांवर. ज्या महिला पत्रकार काम करू इच्छितात त्यांनी हेडस्कार्फ घालून काम करावं, असे आदेश दिले होते. न्यूज अँकरसाठी देखील हाच नियम होता. त्यांनी हिजाब घालणे आवश्यक आहे. 

तालिबान येण्याआधी अफगाणिस्तानमध्ये २४९० महिला पत्रकार कार्यरत होत्या, असं सर्वेमध्ये नमूद केलं आहे. तर तालिबान राजवटीत ८४ टक्के महिला पत्रकारांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानच्या ३४ पैकी १५ प्रांतांमध्ये आता एकही महिला पत्रकार काम करत नाहीये.

४. मुलींना शाळेत जाण्यावर बंदी

सत्तेत आल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून १२ वर्षांवरील मुलींना शाळेत जाण्यास मनाई करण्यात आली आली. धार्मिक अभ्यासकांच्या परिषदेच्या बैठकीत मुलींसाठी शाळा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

तर विद्यापीठांमध्ये महिला आणि पुरुषांचे विलगीकरण केलं गेलं, ज्यामुळे पोस्ट सेकंडरी संस्थांमधील महिलांच्या संधींवर नकारात्मक परिणाम सुरु झाला. 

५. महिलांनी सार्वजनिक स्नानगृह वापरायचं नाही

जानेवारीत द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, बाल्ख आणि हेरात प्रांतातील हमाममध्ये म्हणजेच सार्वजनिक स्नानगृहांमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. त्यांना फक्त घरातील बाथरूममध्ये आंघोळ करावी लागणार असून यादरम्यान त्यांना हिजाबही घालण्याचे आदेश दिले. 

अफगाणिस्तानला भौगोलिक परिस्थिती पहिली तर लक्षात येत की, या देशात थंडी आहे. तिथे अनेक कुटुंबांसाठी गरम पाण्याचा एकमेव स्त्रोत हमाम असतो. महिलांसाठी देखील तितकाच महत्वाचा हे हमाम मात्र बंद करण्यात आले. शिवाय बॉडी मसाजवरही बंधने घालण्यात आली आहेत.

६. पुरुषाशिवाय कुठेही एकटं फिरण्यास बंदी 

डिसेंबरमध्ये तालिबानच्या अधिकाऱ्यांनी महिला पुरुष पालकाशिवाय कामावर जाऊ शकत नाहीत किंवा प्रवास करू शकत नाहीत, असे आदेश  दिले. 

“४५ मैल म्हणजेच ७२ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या महिलांना कुटुंबातील जवळच्या ‘पुरुष’  सदस्याशिवाय प्रवास नाकारला जाईल,” असं सांगण्यात आलं.

त्यानुसार अफगाणिस्तानातील विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पुरुष नातेवाईकाशिवाय विमानात चढण्यासाठी महिलांना थांबविण्यास सांगितलं होतं. 

७. टॅक्सी वापरावर निर्बंध 

अफगाणिस्तानातील टॅक्सी चालकांना नवीन निर्देश दिले गेले. ज्या महिला हिजाब किंवा इस्लामिक हेडस्कार्फ घालून म्हणजेच कठोर इस्लामिक ड्रेस कोड पाळणार नाही त्या महिलांकडून भाडे घेऊ नका. त्यांना टॉक्सिने प्रवास करण्याचा हक्क नाही. 

८.  स्त्रियांनी स्वतंत्रपणे उद्यानांमध्ये जावं 

तालिबानचा हा आणखी एक विचित्र आदेश होता, जिथे स्त्रिया आणि पुरुषांनी स्वतंत्रपणे उद्यानांना भेट देण्यास सांगितलं होतं. रविवार, सोमवार आणि मंगळवारी महिलांनी उद्यानांना भेट देण्याचे आदेश दिले होते; तर पुरुष आठवड्याच्या उर्वरित चार दिवशी त्यांना भेटू शकतात. 

जर त्यांनी एकत्रित भेट दिली तर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

९. महिलांनी जिम आणि स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणं बंधनकारक 

तालिबान्यांनी याबद्दल सरळ निर्देश दिलेले नाहीत की, महिला ऍथलेट्स खेळात सहभाग घेऊ शकत नाही, मात्र त्यांच्या वागण्यातून हे निर्बंध दिसतात. 

शरीयत कायद्याच्या त्यांच्या अर्थानुसार, महिलांनी खेळणं हे पाप आहे. त्यांचा असा विश्वास आहे की लैंगिक संकेत पुरुषांना पाठविले जातात कारण शारीरिक क्रियाकलाप दरम्यान स्त्रीचे शरीर दृश्यमान असते. त्यामुळेच महिलांना जिममध्ये व्यायाम करण्याचीही परवानगी नाहीये.

अफगाण राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघातील एका महिला खेळाडूला नुकतीच अटक करण्यात आली आणि तालिबानने तिला बेदम मारहाण केली. तिच्या संपूर्ण शरीरावर भयंकर जखमा होत्या. तालिबानने तिला जगू दिले कारण त्यांना इतर महिला खेळाडूंना दाखवून द्यायचं होतं की, तुम्ही खेळात सहभाग घेतला तर काय होऊ शकतं!

१०. ड्रायव्हिंग लायसन्स नाकारणं 

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीने नुकतंच देशातील महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देणे बंद केले आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने अफगाण माध्यमांच्या वृत्ताच्या हवाल्याने दिले आहे.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्यापूर्वी काबूलसह काही प्रमुख शहरांमध्ये महिला वाहन चालवताना दिसत होत्या. मात्र आता सत्ताधाऱ्यांनी बंधनं घातल्याने महिला ड्राइव्ह करताना दिसणार नाहीयेत.

११. सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणं 

या सर्व निर्णयांनंतर आता तालिबान्यांनी परत नवीन निर्णय घेतला आहे. महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालूनच सार्वजनिक ठिकाणी यावं. 

त्याशिवाय त्यांना परवानगी नाहीये, असा निर्देश तालिबान्यांनी दिला आहे. शिवाय पुढे असं देखील सांगितलं आहे की, चेहरा झाकण्यासाठी सर्वसमावेशक निळा बुरखा वापरण्याला प्राधान्य द्यावं कारण हा रंग १९९६ ते २००१ पर्यंत तालिबानच्या पूर्वीच्या कट्टर राजवटीचे जागतिक प्रतीक बनला होता.

अशा सर्व निर्णयांमध्ये सध्या अफगाणिस्तानच्या महिला अडकल्या आहेत. त्यांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लावत कोंडी करण्याचं काम सुरु आहे. या वाढत्या निर्बंधांविरोधात, तालिबानी राजवटीविरोधात अफगाणिस्तानात महिला जानेवारी २०२२ मध्येरस्त्यावर उतरल्या होत्या. काबूल आणि विविध शहरांमध्ये महिला आंदोलन करत होत्या.

त्यांना वाचन, काम करण्याची परवानगी द्यावी, त्यांचा प्रशासनातील सहभाग वाढवायला हवा, अशी त्यांची मागणी होती.  

मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही. आणि निर्बंध लावण्याचा सिलसिला सुरूच आहे…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.