आनंद दिघेंच कुटूंब आज कुठे आहे…? 

बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, “शिष्य” एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब.  आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही.

अस ट्विट काल निलेश राणे यांनी केलं.

साहजिकचं काही भिडूंनी आम्हाला मॅसेज करून विचारलं की आनंद दिघेंच कुटूंब कुठे आहे, ते आज काय करतं, राणे म्हणतात त्याप्रमाणे घरचं स्व आनंद दिघे यांच्या घरात शिवसेनेनं साधं नगरसेवक पद, शाखाप्रमुख पद दिलं नाही का? 

आनंद दिघेंच कौटुबिंक पार्श्वभूमी काय होती.. 

राजकारणात विशेषत: शिवसेनेच्या राजकीय शैलीत सेनेच्या पहिल्या फळीत जे नेते पोहचले ते सर्वच नेते सर्वसामान्य पार्श्वभूमीत आलेले होते. सेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे कधीकाळी रस्त्यांवर फटाके विकणे, गणपतीमध्ये गणपतीच्या मुर्ती विकणे अशी कामे करायचे, छगन भुजबळ भाजी विकायचे असे सांगितलं जातं, खुद्द नारायण राणे चेंबुर परिसरात छोटेमोठे व्यवसाय करायचे अशाच पद्धतीने अगदी सर्वसामान्य घरातून आनंद दिघे राजकारणाच्या व्यासपीठावर आले. 

आनंद दिघेंचे वडील आनंद दिघे लहान असतानाच वारले. दिघेंच्या कुटूंबात दिघेंची आई, दिघेंची बहिण व दिघेंचा भाऊ असे तीनच व्यक्ती होते. आनंद दिघे सोडले तर या कुटूंबात कोणाचाही राजकारणात इंटरेस्ट नव्हता. कुटूंबातील हे लोकं आनंद दिघे जरी ठाण्याच्या राजकारणात प्रस्थापित झाले तरी मध्यमवर्गीय व्यक्तींप्रमाणेच जगत होते. 

आनंद दिघे हयात असतानाचा त्यांना त्यांच्या सख्ख्या भावाचा मृत्यू पहावा लागला. त्याचसोबत आईचा मृत्यू देखील याच काळात झाल्याचं सांगण्यात येत. 

आनंद दिघेंच्या आईचं स्वप्न होतं आनंद दिघेंनी लग्न करावं.. 

आपल्या मुलाने राजकारण, समाजकारण करावं त्याला हरकत नाही. पण चारचौघांसारखं लग्न करावं, संसार करावं अस आनंद दिघेंच स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी स्थळं बघण्यास देखील सुरवात केली होती. पण आनंद दिघेंचा लग्न करण्यास स्पष्ट नकार होता. त्यातूनच लग्नाची गोष्ट बारगळी.. 

पुढे जेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला तरिही आनंद दिघे शांत होते. आईच्या मृत्यूनंतरही त्यांनी हा त्रास सहन केला. मात्र ठाण्याच्या एका वर्तमानपत्रात आनंद दिघेंच्या आईच्या मृत्यूची बातमी छापून आली होती. यामध्ये मुलाच्या लग्नाचं स्वप्न पहातच आई गेली अशी बातमी करण्यात आली होती. ठाण्याचे त्यांचे जुने सहकारी सांगतात ती बातमी वाचून आनंद दिघे रडले होते. 

वडिल, भाऊ पद्माकर दिघे, आई निर्मलादेवींच्या मृत्यूनंतर आनंद दिघेंच कुटूंब म्हणून त्यांची बहिण होती.. 

अरुणाताई गडकरी अस त्यांच नाव.

ठाण्याच्यात गडकरी कुटूंबात त्यांच लग्न झाल्याचं सांगण्यात येतं. याबाबत माहिती घेण्यात आली असता अरुणाताई गडकरी यांच्या कोणत्याही राजकीय अपेक्षा नव्हत्या व त्या सर्वसामान्य गृहणीचं आयुष्य जगत होत्या अस सांगण्यात येत.

नुकताच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर सिनेमाच्या प्रमोशनवेळी आनंद दिघेंच्या रक्ताच्या वारसदार असणाऱ्या अरूणाताई गडकरींना खास आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला होता. तसेच सिनेमाच्या निर्मीतीत देखील त्या पहिल्यापासून सहभागी होत्या अस सांगण्यात येतं. 

याशिवाय केदार दिघेंचा देखील आनंद दिघेंचे पुतणे असा उल्लेख केला जातो. 

मात्र आनंद दिघेंच्या सख्खा भावाचे ते मुलगे नाहीत. केदार दिघेंनी वयाच्या १९ व्या वर्षी आनंद दिघेंना अग्नी दिला होता. 

केदार दिघे हे राजकारणात होते २०१३ साली त्यांना युवा सेनेचं निरिक्षक पद देण्यात आलं होतं. तीन वर्षांपुर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेत माझ्यावर अन्याय झाला असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.