ज्या समाजाला १४ वर्ष मुख्यमंत्री पद लाभलं, तोच समाज आज “राज्यसभेसाठी” झगडतोय..

राज्यभरात एकच गडबड सुरुये. राज्यसभेच्या सहा जागा. सहा पैकी ३ जागा काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रत्येकी १ तर २ जागा भाजप अशी विभागणी असल्याची चर्चा असून उरलेल्या सहाव्या जागेसाठी खडाजंगी सुरु असल्याचं दिसतंय.

संभाजीराजे छत्रपती हे या जागेसाठी प्रयत्न करत असून शिवसेना देखील आखाड्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 

मात्र यात काँग्रेसमध्ये वेगळीच हालचाल सुरु आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा पी. चिदंबरम यांना न देता ती पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांना देण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरतेय. हे तेच महाराज आहेत ज्यांनी माजी मंत्री संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करावा, यासाठी खूप प्रयत्न केलेले सगळ्यांनी बघितलंय.

ही मागणी करण्याचं कारण म्हणजे…

हे महाराज ज्या समाजातून येतात तो समाज म्हणजे गोर बंजारा समाज.

हा समाज काँग्रेसचा पारंपरिक मतदाता होता. त्यांनी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देखील दिले आहेत – वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक. मात्र काँग्रेसने त्यांच्यानंतर पुढे समाजाला प्रतिनिधीत्व दिले नाही. तेव्हा आता त्यांनी जागरूक होऊन जवळपास १२ कोटी लोकसंख्या असणाऱ्या गोर बंजारा समाजातील व्यक्तीला तिकीट देण्याची मागणी सुरू आहे. 

यासाठीच पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचं नाव सुचवण्यात येतंय. 

सगळ्यात जास्त काळ महाराष्ट्राचं नेतृत्व या समाजाने केलं आहे. काँग्रेस सत्तेच्या ६० वर्षांच्या एकूण कार्यकाळात जवळपास १४ वर्ष या समाजाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा गड राखला आहे. मात्र त्यांना आज एका जागेसाठी मगजमारी करावी लागत आहे.

तेव्हा हा गोर बंजारा समाज राजकारणातून कसा बाहेर पडत गेला? हे जाणून घेणं याठिकाणी महत्वाचं वाटतंय… 

गोर बंजारा किंवा लमाण म्हणून ओळखला जाणारा हा समाज. मुळतः तो राजस्थानचा. एकेकाळी ही व्यापारी जात होती. मीठ म्हणजे लवणाचा व्यापार करणारे म्हणून त्यांना लमाण असं त्यांचं नाव पडलं. मुघलांच्या काळात राजस्थानमधून बंजारा महाराष्ट्रात आले. बंजारा तांडा ज्या भागातून फिरायचा तिथे रस्ता तयार व्हायचा. त्यांनी शेकडो तळी, विहिरि बांधल्या. धर्मशाळा उभारल्या. किल्ले बांधले.

मात्र एकेकाळी अतिशय श्रीमंत असणाऱ्या या समाजाचा व्यापार बंद पडला इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे आल्या. जंगलात लाकूड फाटा गोळा करणं आणि इतर कामं समाज करू लागला. मात्र जंगल कायद्यामुळे गोंद चारोळी, मोळ्या विकण्यावर इंग्रजांनी बंदी घातली तेव्हा पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी तत्कालीन बंजारा समाजातील तरुण गुन्हेगारीकडे वळला.

इंग्रजांच्या अन्यायाविरोधात भागोजी नाईक यांच्या सारखे स्वातंत्र्ययोद्धे निर्माण झाले. तेव्हा नाईक घराण्याचं पाहिलं नेतृत्व पुढे आलं. तर या जातीवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसला  गेला तो याच समाजाचे वसंतराव नाईक राजकारणात आल्याने. 

वसंतराव नाईकांचा जन्म गाहुली या छोट्याशा गावात झाला, तेव्हा समाजातील पारंपरिक संस्कारांमुळे शिक्षणाचा प्रसार याठिकाणी झाला नव्हता. मात्र अनिष्ट प्रथा आणि चालीरीतींच्या धारा मोडणं हा वसंतराव नाईकांचा अंगभूत गुण होता. त्यांनी स्वतःवर काम केलं, शिक्षण घेतलं. स्वतःला  सुसंस्कृत आणि सर्वव्यापी करण्याचा प्रयत्न केला. 

स्वत:च्या समाजाची मजबूत लॉबी आणि मतदारसंघ आपल्या पाठीशी ठामपणे नसतानाही निवडणुका जिंकणारे ते असामान्य नेते होते.

त्यांनी ग्रामविकासाची शिकवण सुरु केली आणि गाहुली गाव ‘आदर्श गाव’ म्हणून नावारूपाला आणलं.  इथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली. समाजवाद आणि राजकारण ही त्यांची पहिली पसंती ठरली.  इतर विकसित प्रदेशांप्रमाणे आधुनिकतेचे वारे महाराष्ट्रात आणण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न होता. 

१९४६ मध्ये त्यांनी पुसद नगरपरिषदेचे अध्यक्षपद सांभाळलं. त्या काळातही आपल्या आजूबाजूच्या परिसरासाठी जे काही आदर्श असेल ते मिळवण्याचा तो प्रयत्न करत असे. ते थोर विचारवंत नसले तरी भटक्या जमातीतील सामान्य माणूस होते. 

स्वातंत्र्यानंतर १९५२ साली पहिल्या विधानसभा निवडणुका आल्या. काँग्रेस तर्फे जेव्हा तिकीट वाटप सुरु झालं तेव्हा कित्येक जणांनी इच्छूक म्हणून अर्ज भरला. यवतमाळ मध्ये देखील प्रचंड स्पर्धा होती. पण तिकिट मिळाले वसंतराव नाईकांना.

लालबहादूर शास्त्रींना वसंतराव नाईकांच्या कार्याबद्दल माहिती होती. त्यांनी केलेल्या शिफारशी मुळे वसंतरावांना पहिल्यांदा आमदारकीचा तिकीट मिळालं.

कोणत्याही समाजाचा व्यक्ती जेव्हा नेतृत्व करण्यासाठी उभा होतो तेव्हा हमखास त्याचा समाजही ‘आपला व्यक्ती गेलाय पुढे’ असं म्हणत तिकडे वाळतोच. त्यानुसार वसंतराव नाईक जेव्हा राजकारणात प्रवेश करताना काँग्रेसमध्ये गेले तेव्हा ते एकटे नाही गेले तर संपूर्ण गोर बंजारा समाज घेऊन गेले.  

त्यांनी पहिल्याच निवडणुकीत भरघोस मतांनी विजय देखील मिळवला. पहिल्याच टर्म मध्ये रविशंकर शुक्ला यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल राज्यमंत्री ही झाले. मध्य प्रांताच्या विधानसभेत आपल्या शेतीविषयक अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी छाप पाडली.

यशवंतराव चव्हाणांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रीपद दिले होते. पुढे दुर्दैवाने मारुतराव कन्नमवार यांचं अकाली निधन झालं. तेव्हा वसंतराव नाईकांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी राज्याची सूत्रे यशस्वीपणे हाती घेतली. 

त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्राचे खरे आधारस्तंभ म्हणून वसंतराव नाईक यांची ओळख आहे. १९६३ ते १९७५ असे जवळपास १२ वर्ष त्यांनी हे पद सांभाळलं. 

पुढे त्यांना बघूनच वसंतरावांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हा गोर बंजारा समाजाने त्यांनाही साथ दिली. सुधाकरराव नाईक हे देखील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याने गोर बंजारा समाजाची सगळी वोट बँक तेव्हाही निःपक्षपणे काँग्रेसकडे राहिली. 

पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि मग मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय कारकिर्दीचा आलेख कायम चढता राहिला. पुसद मतदारसंघाचं त्यांनी जवळपास १७ वर्ष प्रतिनिधित्व केलं.

९० च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नरसिंग राव यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांच्याकडे संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक हे राज्याचे १३ वे मुख्यमंत्री झाले. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालावधीसाठी त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं.

जलसंवर्धनात केलेली महत्त्वाची कामगिरी, गुन्हेगारांवर ठेवलेला वचक यामुळं त्यांची कारकीर्द गाजली. मात्र, त्याकाळात मुंबईत दोनवेळा दंगल उसळली. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात नाईक अपयशी ठरले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश आणि शरद पवार यांच्या सोबत झालेल्या मतभेदामुळं नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

त्यानंतर नाईक यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते वाशिममधून खासदार म्हणून निवडूनही आले. त्यांनी १९९९ मध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचवर्षी नाईक पुन्हा एकदा पुसदचे आमदार म्हणून निवडून आले.

जोपर्यंत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते तोपर्यंत काँग्रेस त्यांनी वाढवली. शिवाय पक्षासाठी गोर समाज हमखास व्होटबँक राहिला.मात्र सुधाकरराव नाईकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने ती व्होटबँक राष्ट्रवादीकडे वळली. 

तसं सुधाकरराव नाईक यांच्यानंतर नाईक परिवारातील मनोहर नाईक राजकारणात आले होते. मात्र सत्तेची महत्वकांशी फारशी नव्हती. त्यांनी स्थानिक राजकारणाशिवाय राज्याच्या राजकारणात कधीच इंटरेस्ट दाखवला नाही. त्यात सुधाकरराव नाईक यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला.  तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर नाईक यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

सुधाकरराव नाईकांनंतर काँग्रेसने पुढे समाजाला प्रतिनिधीत्व दिले नाही. नाईक कुटुंबाच्या राजकारणातून पायउतार होण्याने हा समाज राजकारणातून बाहेर फेकला गेला.

मात्र या समाजाची राजकीय महत्वकांक्षा कायम होती… 

अलीकडच्या काळात याच समाजातून संजय राठोड पुढे आले.  त्यांची सुरुवातच झाली ती शिवसेनेचे मंत्री म्हणून. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून गेले. २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारमधील महसूल राज्यमंत्री पद सांभाळलं. 

राठोड हे गोर बंजारा समाजाचे असल्याने हमखास वोट शिवसेनेकडे गेले. मात्र २०२१ मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

परत हा समाज राजकारणातून बाहेर पडण्याची चिन्हं असताना आता याच समाजाचे महंत सुनील महाराज यांनी राजकीय इच्छा व्यक्त केली आहे.

तेही त्याच पक्षाकडून ज्याची साथ या समाजाने १४ वर्षांपर्यंत दिली. ते म्हणजेच काँग्रेस. या महाराजांनी संजय राठोड यांना मंत्रिपद परत मिळावं, हा मुद्दा लावून धरला तेव्हा ते प्रकाशझोतात आले. 

मात्र शिवसेनेने याकडे दुर्लक्ष केल्याने परत त्यांनी काँग्रेसकडे वाळण्याचं ठरवल्याचं जाणवतंय. हे महाराज वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणचे आहते. हे ठिकाण गोर  बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. 

पोहरादेवी इथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. त्यांना देशभरातील १२ कोटी जनता मानते. याच महंत परंपरेतील सुनील महाराज हे सध्या बंजारा समाजातील प्रसिद्ध महंत आहे. त्यामुळे त्यांना जर काँग्रेसने तिकीट दिलं तर काँग्रेसची सध्याची स्थिती जी झाली आहे, त्यामध्ये झटक्यात १२ कोटी व्होटबँक मिळण्याची शक्यता आता. 

या समाजाने आजवर त्यांच्या लोकांना खंबीरपणे साथ दिली आहे आणि आता देखील देऊ असं म्हणत आहेत.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इथे भाजपने योगी, महंत यांना राज्य सभेवर, विधान सभेवर पाठवलं, आता तेच काँग्रेसने ही करावं, असं म्हटलं आहे. तसंच महंत सुनील महाराज यांनी अनेकदा नाना पाटोलेंची भेट घेतली असून त्यांना ह्या समाजाच्या भावना आहेत, असं माहिती राजकीय वर्तुळातून मिळालीये.

एकंदरीत गोर बंजारा समाजाचा प्रवास हा व्यापारी म्हणून सुरु झाला मात्र नाईक कुटुंब जसं राजकारणात आलं तसं या समाजामध्ये राजकीय महत्वकांक्षा दिसली आहे. मध्यंतरी चढउतार झाले मात्र परत या समाजाने प्रतिनिधी उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र नाईक यांच्यासारखं नेतृत्व त्यांना न मिळाल्याने एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण गाजवणारा हा समाज आज एका सीटसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. 

मनोहर नाईक यांच्याकडे कोणतीही राजकीय शैली आणि इच्छा नसल्याने त्यांचं नाणं जास्त खणाणू शकलं नाही हे या समाजाने बघितलं आहे. तेव्हा आता महंत सुनील महाराजांवर जर हा समाज बोली लावत आहे, ज्यांच्याकडे ‘समाजाचा इतिहास’ वगळता इतर कोणताही राजकीय अनुभव नाहीये, अशात हा समाज परत राजकारणात सक्रिय होऊ शकतो का? हे बघणं गरजेचं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.