नवीन स्कॉर्पियो येतेय, स्कॉर्पियोचा विषय हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील अभ्यासासाठी आहे…

सगळ्यात दणकट आणि चालवायला उत्तम अशी कोणती कार आहे, असं म्हटलं तर हमखास उत्तर असतं महिंद्रा स्कॉर्पियो. अशा या रफ अँड टफ गाडीची अजून एक नवीन जनरेशन लॉन्च होतीये. महिंद्रा आपलं नवीन जनरेशन स्कॉर्पिओ मॉडेल २७ जून २०२२ रोजी लाँच करणार आहे. कार देखोच्या रिपोर्ट्सनुसार, या नवीन फीचरवाल्या स्कॉर्पिओसाठी अन-ऑफिशिअल बुकिंग सुद्धा सुरू केलं आहे. 

ही नवीन कार  २.२ लीटर टर्बो डिझेल आणि २.० लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येत असून डिझेल आणि पेट्रोल इंजिन अशा दोन्ही पर्यायांमध्ये ती उपलब्ध असणार आहे.  तर याची किंमत जवळपास १० लाखांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. 

पण तुम्हाला महिंद्राच्या स्कॉर्पियोची अजून एक खासियत सांगू. ही गाडी चक्क हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासासाठी आहे. हो, ऐकताय ते खरंच आहे. स्कॉर्पिओची कहाणी हार्वर्ड बिझिनेस स्कूलमध्ये केस स्टडी आहे, जिथे महिंद्रा अँड महिंद्राचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांनी १९८१ मध्ये एमबीए केले होते. 

म्हणूनच आपणही महिंद्राचा हा प्रवास जाणून घेऊया.. 

एका दशकात ४ लाखांहून जास्त युनिट्सची विक्री करणाऱ्या स्कॉर्पिओची निवड हार्वर्डने का केली याची काही कारणं आहेत…

१९९० चं दशक होतं. महिंद्रा कंपनी नवनवीन गाड्या मार्केटमध्ये आणत होती. खरं तर महिंद्रा अँड महिंद्रा हा मेक-ऑर-ब्रेक व्हेंचर होता, जो त्यावेळी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी होता. पण महिंद्राला भारतात सुरुवातीपासूनच एक स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स म्हणजेच एसयूव्ही विकसित करायची होती. अशी गाडी बनवायची होती जी खेड्यापाड्यातही वापरली जाईल. जेणेकरून वर्ल्ड वाइड ही गाडी अजून प्रसिद्ध होत जाईल. 

खेड्यापाड्यात म्हंटलं तर मोठ्या कुटुंबाला आरामात बसता येईल आणि दणकट वापरता येईल, असं मॉडेल हवं होतं. मात्र त्याचं कोणतंही ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं. अशा वेळी कंपनीने इंडस्ट्रीमधल्या दोन मातब्बर लोकांना पाचारण केलं. ते होते पवन गोयंका आणि ऍलन ड्युरँटे

१९९३ चं साल होतं. गोयंका तेव्हा जनरल मोटर्ससाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे महाव्यवस्थापक म्हणून काम करत होते तर  ऍलन ड्युरँटे एम अँड एमचे माजी कार्यकारी संचालक आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्राचे अध्यक्ष होते. या दोघांनी एकत्र येताच एसयूव्ही प्रोजक्ट वर काम सुरु केलं. 

देशी वाहनाचं स्वप्न साकार करण्यासाठी सरासरी २७ वर्ष वयाच्या अवघ्या १२० इंजिनीअर्सच्या ग्रुपने उत्साहानं काम केलं. १९९७ पर्यंत प्रोजेक्ट स्कॉर्पिओ ड्रॉइंग बोर्डवर होता. १९९८ च्या मध्यापर्यंत त्याची ब्लू प्रिंट तयार झाली आणि २००२ साली स्कॉर्पिओचा जन्म झाला.

स्कॉर्पिओच्या डिझाईन आणि डेव्हलपमेंटची संपूर्ण किंमत सुमारे ५५० कोटी रुपये होती. काटकसरीने इनोव्हेशन करत बेस्ट मॉडेल तयार करणं हेच कारण आहे ज्यामुळे हे मॉडेल हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू केस स्टडीसाठी पात्र ठरलं. तर याच जोरावर स्कॉर्पिओने ऑल न्यू  मास-मार्केट व्हेहिकल डेव्हलपमेंट असा बेंचमार्क सेट केला.

स्कॉर्पिओला यशस्वी करणाऱ्या गोष्टींमध्ये डिझाईन, पॉवरट्रेन आणि किंमत तसंच  पाथब्रेकिंग मार्केटिंग कॅम्पेन यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली, असं गोयंका सांगतात. 

पाहिलं डिजाईन – एव्हीएल ऑस्ट्रिया, हॉटल व्हिटिंग, यूके आणि इतर काही सल्लागारांच्या मदतीने महिंद्राने संपूर्णपणे इन-हाऊस डिझाइन आणि विकसित केलेले स्कॉर्पिओ हे पहिले मॉडेल होतं.

दुसरं पॉवरट्रेन – स्कॉर्पिओच्या पहिल्या व्हर्जनमध्ये २.६ लिटर, १०८ बीएचपी इंजिन आणि फाईव्ह-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन होते. 

तर तिसरं किंमत – स्कॉर्पिओची किंमत होती फक्त ५.५ लाख रुपये. त्यावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या लोकप्रिय मल्टी युटिलिटी व्हेहिकलपेक्षा सुमारे ५० हजार रुपये स्कॉर्पिओ स्वस्त होती. 

चौथा मुद्दा ऍडव्हर्टाइसिंगचा. त्यांनी स्कॉर्पिओचा दणकटपणा आणि ऐसपैस जागा दाखवत गावांतील लोकांना आकर्षित करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी टेलिव्हिजन जाहिरातींचा मोठ्या प्रमाणात वापर केला. या जाहिराती इतक्या जबरी होत्या की गाडी घेऊ वाटेल इतपत लोकांची मजल जायची.

स्कॉर्पिओने अत्यंत आव्हानात्मक डोंगराळ प्रदेश, उंचावरील भाग, ऑक्सिजनची कमी पातळी असणारा भाग, उणे १० अंश आणि स्नोस्टॉर्ममधून आपली उत्कृष्ट कामगिरी आणि वाहन चालविण्याची क्षमता यशस्वीपणे दाखवून दिली. 

स्कॉर्पिओ ही पहिली गाडी होती ज्याचं कस्टमाईजेशन ग्राहक थेट कंपनीतुन करू शकत होते. परिणामी, ग्राहक त्यांच्या स्टाईलनुसार विविध प्रकारच्या कस्टमाईजेशन पर्याय निवडू शकत होते. महिंद्रा ही भारतातील एकमेव मुख्य प्रवाहातील उत्पादक  आहे जी कारखान्याच्या बाहेर आपल्या मॉडेल्ससाठी असे कस्टमाईजेशन पर्याय ऑफर करते.

२००३ मध्ये पहिल्यांदा इटलीमध्ये स्कॉर्पिओ विकली गेली. एप्रिल २००६ मध्ये, महिंद्राने स्कॉर्पिओचा पहिला फेसलिफ्ट लाँच केला, जो ऑल-न्यू स्कॉर्पिओ म्हणून बाजारात आणला गेला. दिल्लीतील ऑटो एक्स्पो २००६ मध्ये महिंद्राने सीआरडीई इंजिनसह हायब्रीड स्कॉर्पिओ आणि पिकअप ट्रकवर आधारित स्कॉर्पिओचं प्रदर्शन करून स्कॉर्पिओ मॉडेलवर त्यांच्या भविष्यातील योजनाही दाखवल्या. 

महिंद्रा स्कॉर्पिओने २००९ मध्ये अजून बदल केले. ज्यात हेडलाइट हाऊसिंग्स, बोनेट आणि बंपर डिझाईन्ससह महत्त्वाचे बदल करण्यात आले होते.  तर २००८ सालच्या एसएई वर्ल्ड काँग्रेसमध्ये त्यांच्या स्कॉर्पिओ एसयूव्हीच्या डिझेल-इलेक्ट्रिक हायब्रिड व्हर्जनची संकल्पना उघड केली. इथून पुन्हा स्कॉर्पिओने उडी घेतली. २०१४ मध्ये महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये अजून बदल करत एक नवीन डिझाइन केलेले फ्रंट आणि रिअर फॅसियस आणि एक नवीन डॅशबोर्ड यात होता. 

स्कॉर्पिओची इतकी क्रेझ होती की सिनेमात सुद्धा वापरण्यात आली. अजय देवगणचा सिंघम आणि रणवीर सिंगचा सिम्बा या दोन्ही सिनेमात या गाडीला जास्त फुटेज देण्यात आलं होतं. 

याच गाडीची आता नवीन जनरेशन आता लॉन्च होत आहे. नवीन जनरेशन म्हणजे बरंच काही चेंज होणार आहे. तेव्हा सगळेच लॉन्चकडे नजर लावून आहेत. तुम्ही स्कॉर्पिओमधून कधी प्रवास केला आहे का? तुमचा अनुभव कसा होता आणि तुमच्या स्कॉर्पिओसोबत काही भन्नाट आठवणी असतील तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा… 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.