कितीही चर्चा झाल्या तरी गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडत नाही त्यामागे ही कारणं आहेत

देशपातळीवर सध्या काँग्रेस पक्ष खूपच वाईट परिस्थितीतून जातोय, असं प्रकर्षाने दिसतंय. म्हणजे एकेकाळी भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आमदारांची संख्या असणाऱ्या काँग्रेसकडे आता भाजपच्या निम्याहून ‘कमी’ आमदारांची संख्या आहे. राजस्थान आणि छत्तीसगढ हे दोन राज्य आहेत जिथे पूर्णतः काँग्रेस शासन आहे. तर झारखंड, मेघालय, तामिळनाडूत काँग्रेस इतर पक्षांसोबत युती करत स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे. 

गेल्या २ वर्षांत अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तर अजूनही अनेक बडे नेते पक्ष सोडू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

यामध्ये काँग्रेसचे सगळ्यात पावरफुल नेता ‘गुलाम नबी आझाद’ यांचं नाव आघाडीवर आहे. 

याआधी  सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पदावर काम करण्यासाठी विचारणा केली होती. तेव्हा आझाद यांनी साफ नकार दिला होता. “पक्षाला सध्या तरुण नेत्यांकडे नेतृत्व देण्याची गरज आहे” असं आझाद म्हणाले होते. 

तर त्यानंतर राहुल गांधींची जेव्हा नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीची तपासणी सुरु झाली तेव्हा काँग्रेसने पुकारलेल्या ‘सत्याग्रह’ आंदोलनात देखील गुलाम नबी आझाद दिसले नाहीत. 

यापुढे जाऊन गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद त्यांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले जात आहे यामुळे नाराज होते आणि त्यामुळेच  त्यांनी नवीन जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

नुकत्याच घडलेल्या या  प्रकरणानंतर गुलाम नबी आझाद यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना ‘पुन्हा’ बळकटी मिळाली. 

‘पुन्हा’ यासाठी कारण आझाद यांच्याबद्दल असे तर्क लावणं नवीन गोष्ट नाही. गेल्यावर्षी १६ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ च्या दरम्यान आझाद यांनी सलग १० सभा घेतल्या होत्या आणि त्यात गांधी घराण्याचं नाव सुद्धा ते घेत नसल्याचं दिसलं होतं. त्यांनी काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांना सोबत घेत जी-२३ गटही काढला होता. 

यावेळी आझाद यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष काढण्याची पूर्ण तयारी केली असल्याचं, बोललं गेलं होतं. 

मात्र आझाद यांनी ना तेव्हा काँग्रेस सोडली ना अजूनही काँग्रेसमधून बाहेर पडण्याची चिन्हं ते देतायेत. शिवाय ते काँग्रेस सोडूच शकत नाही, असा तर्क काही विश्लेषकांकडून लावण्यात येतोय. या तर्काचा आधार आहे… 

गुलाम नबी आझाद यांच्यावर गांधी परिवाराचे असलेले ऋण!

तेव्हा नक्की गुलाम नबी आझाद यांच्यावर गांधी कुटुंबाने असे कोणते उपकार केले आहेत? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला…

१९७८ चं ते साल होतं. गुलाम नबी आझाद त्यांच्या अगदी तरुण वयात होते. वयाची तिशी देखील न गाठलेले आझाद तेव्हा जम्मू-काश्मीरच्या राजकारणातले छोटे खेळाडू होते. मात्र त्यांची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ होती. जी बरोबर संजय गांधी यांनी टिपली. 

संजय गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांची निवड केली आणि त्यांना जम्मू-काश्मीरच्या ‘युवक काँग्रेसचे अध्यक्ष’ म्हणून कार्यभार सोपवला. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खरी सुरुवात झाली होती. पुढे केवळ दोनच वर्षांत म्हणजे १९८० साली आझाद लोकसभेवर निवडून गेले. आझाद यांचा ज्या राज्याशी तिळमात्र संबंध नव्हता त्या महाराष्ट्र राज्यातून त्यांना सीट देण्यात आली होती. तेव्हा ते फक्त ३१ वर्षांचे होते.  

यानंतर लगेच संजय गांधी यांच्या विमानाचा अपघात झाला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

गुलाम नबी आझाद यांना तेव्हा त्यांच्या डोक्यावरील देवदूताचा वरदहस्त निघून गेल्यासारखं वाटलं होतं. मात्र आझाद होतकरू कार्यकर्ते असल्याने ‘ते काय करू शकतात’ हे जास्त काळ गांधी परिवाराच्या नजरेतून दूर राहू शकलं नाही. संजय गांधी यांच्यानंतर त्यांचे भाऊ राजीव गांधी यांनी आझाद यांची ताकद टिपली. त्यांनी आझाद यांना सोबत घेतलं आणि त्यांच्या प्रतिभेचा राजकारणात पुरेपूर उपयोग करून घेतला. 

१९८० मध्ये राजीव गांधींनी आझाद यांना अखिल भारतीय युवक काँग्रेसचं प्रमुख बनवलं. लवकरच आझाद इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात सामील झाले. गांधी कुटुंबाच्या विश्वासामुळे आझाद यांचा मार्ग इतका सुकर झाला होता की, लगेच ते राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री झाले.

सुखाने मंत्रिपदाचा आनंद घेणं सुरु होतं मात्र १९८७ साली झालेल्या एका वादामुळे आझाद यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आझाद यांची प्रतिमा याने मलिन होते की काय? असं तेव्हा अनेकांना वाटलं होतं, पण याचा काहीच परिणाम झाला नाही.

उलट राजीव गांधी यांनी आझाद यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 

केवळ ३८ वर्षांचे आझाद काँग्रेसचे सगळ्यात तरुण सरचिटणीस झाले होते. त्यांच्या वयाच्या इतर नेत्यांच्या तुलनेत ते खूप पटीने पुढे चालत होते. आझाद यांना राजीव गांधींनी सरचिटणीस पद तर दिलंच पण सोबतच त्यांना काँग्रेस मुख्यालयात एक खोली सुद्धा देण्यात आली होती, जी पूर्वी पक्षाध्यक्षांसाठी राखीव ठेवली जायची. 

या क्षणाला काँग्रेसच्या इतर नेत्यांना कळून चुकलं होतं की आझाद यांनी पक्षात कोणती उंची गाठली आहे! 

पुढे काँग्रेस पक्षाने वेगवेगळी आणि खुपसारी पदं त्यांना दिली. पक्षानं आझाद यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून घेतला. पक्षासाठी मित्र बनवण्यात, नेत्यांवर प्रभाव पाडण्यात, फक्त एक इशारा करताच गर्दीची व्यवस्था करण्यात, प्रत्येक संकटातून बाहेर पाडण्याचे मार्ग सुचवण्यात आणि पैशांचं व्यवस्थापन करण्यात आझाद यांनी महत्वाची भूमिका बजावली.

या सगळ्या कारणांमुळे काँग्रेसमध्ये आझाद यांचा द्वेष करणारे लोक देखील तयार झाले होते.

संजय गांधी गेले, राजीव गांधी गेले, इंदिरा गांधी गेल्या त्यानंतर १९९८ साली जेव्हा सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रं सांभाळली तेव्हा ‘आझाद यांचे दिवस संपले’ असं अनेकांना वाटलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आझाद यांना थोडा सुद्धा फरक पडला नाही. सोनिया गांधी यांनी त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सांभाळण्यासाठी आझाद यांना बेल्लारीला पाठवलं. 

यावरून त्यांचा देखील आझाद यांच्यावर विश्वास असल्याचं स्पष्ट झालं. 

मात्र काँग्रेसमधील गटबाजीचा राजकारणाने अखेर या विश्वासाचा बळी घेतला. काही वर्षांतच सोनियांचे मुख्य राजकीय व्यवस्थापक आणि सल्लागार म्हणून आझाद यांची जागा रिक्त झाली आणि त्याठिकाणी अहमद पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. 

आझाद आणि पटेल प्रतिस्पर्धी झाले होते. पण असं असूनही आझाद काँग्रेसपासून दूर झाले नाही किंवा त्यांनी सोनिया यांची मदत करणं सोडलं नाही. त्यांनी पटेलांशी जबरी मैत्री केली. सोनिया यांच्या अंतर्गत वर्तुळाचा एक भाग बनून ते राहिले, भलेही त्यांची नामुष्की केली जात असली तरी. 

राहुल गांधींना पक्षाची धुरा न देता प्रियंका यांना देण्यात यावी, अशी आझाद आणि पटेल यांची इच्छा होती, असं सांगितलं जातं. मात्र तेव्हाही सोनिया यांनी त्यांचं ऐकलं नाही. वेळोवेळी आझाद यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्हं काँग्रेसने उपस्थित केल्याचं दिसलं.

ते पक्षाशी असंतुष्ट होऊ लागले होते. इतर नेत्यांचीही हीच परिस्थिती बघत आझाद यांनी पक्ष हायकमांडला आपली ताकद दाखविण्यासाठी ‘जी-२३’ गट स्थापन केला, तेव्हा उघडपणे पक्षात मतभेद उफाळून येत असल्याचं दिसलं होतं. गुलाम नबी आझाद बंड करता की काय, असं वाटलं मात्र तसं झालं नाही. 

असे अनेक प्रसंग आले जेव्हा गुलाम नबी आझाद पक्ष सोडून जाऊ शकत होते, मात्र ते तसं करत नाहीत हा इतिहास आहे.

गांधी घराण्याच्या व्यापारांचे व्यवस्थापक, सल्लागार म्हणून त्यांनी इतकी वर्ष जे कार्य केलं आणि त्यातही गांधी घराण्यातील आधीच्या नेतृत्वांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, ज्यामुळे आझाद कमी वेळात यशस्वी होऊ शकले, त्याच्याच परिणामी आझाद गांधी घराण्याशी समर्पित असल्याचं (बांधले गेल्याचं) बोललं जातं. 

एकंदरीतच, आझाद काँग्रेस सोडतील हे त्यांचा इतिहास बघून वाटत नाही, असं विश्लेषक सांगतात.

मात्र आपल्या स्वभावातील तठस्थपणामुळे आझाद नेहमी काँग्रेसची आजची स्थिती काय आहे, हे दाखवून द्यायला देखील कमी पडत नाही. ते पक्ष तर सोडू शकत नाहीत म्हणून गांधी घराण्यापासून दूर राहण्याचा मार्ग त्यांनी निवडला असल्याचंही बोललं जातं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.