या “२३ नेत्यांचा” कॉंग्रेसकडे ऑप्शन आहे पण यामध्ये एक घोळ आहे..
२०१४ नंतरच्या जवळपास प्रत्येक निवडणूकांच्या निकालानंतर कॉंग्रेसचा दारुण पराभव ही हेडलाईन ठरलेली आहे. त्यानंतर कॉंग्रेस नेतृत्वात बदल होणार या बातम्या देखील सर्वसामान्य झालेल्या आहेत.
पक्षाच्या कार्यकारणीची बैठक होते व त्या बैठकीत पुन्हा एकदा राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्या नावावर शिकामोर्तब केला जातो अशी परंपरा सुरू झालेली आहे.
काल देखील उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि झारखंड या पाच राज्यात झालेल्या पराभवामुळे कॉंग्रेसच्या कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी सोनिया गांधी, राहूल गांधी व प्रियांका गांधी राजीनामा देणार असल्याचे वृत्त NDTV मार्फत देण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्ष बैठकीत सोनिया गांधी यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आल्याच सांगण्यात आलं. जोपर्यन्त कॉंग्रेसची संस्थात्मक निवडणूक होत नाही तोपर्यन्त सोनिया गांधींनीच नेतृत्व कराव अस कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.
दरम्यानच्या काळात कॉंग्रेसच्या G23 गटाने मुकूल वासनिक यांचे नाव समोर केले होते मात्र ते मागे पडले असे वृत्त देखील आले होते. तर याच G23 गटातील नेत्यांकडे कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याच्या चर्चा होत असतात. या गटात कोणकोणते नेते आहेत व त्यांच्यात नेतृत्व करण्याची कितपत क्षमता आहे ते पहावे लागते.
1) गुलाम नबी आझाद
गुलाम नबी आझाद हे पक्षाच्या सगळ्यात जेष्ठ नेत्यांपैकी एक. ७ व्या आणि ८ व्या लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर ते सातत्यानं म्हणजे अगदी २०२१ पर्यंत राज्यसभेवर निवडून येत होते.
मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची टर्म संपल्यानंतर काँग्रेसने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलेलं नाही. सध्याच्या जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांदरम्यान तामिळनाडूमधून त्यांच्या नावाची चर्चा होती पण ती केवळ चर्चाच ठरली.
2. कपिल सिब्बल
कपिल सिब्बल हे देखील काँग्रेसवर सातत्यानं टीका करताना दिसून येतात. मात्र ते देखील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यानंतर २०१६ साली पक्षानं त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. २०१९ साली त्यांच्या पारंपरिक चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून जय प्रकाश अग्रवाल यांना रिंगणात उतरवलं होतं. पण त्यांच्या पराभव झाला होता.
3. शशि थरूर
लोकांमधून सध्या निवडून येत असलेल्या जी-२३ मधील काहीच निवडक नेत्यांपैकी एक म्हणजे शशी थरूर. ते २००९ पासून थिरुवनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यानंतर २०१४ आणि २०१९ या मोदी लाटेच्या निवडणुकीत देखील थरूर विजयी झाले आहेत.
4. मनीष तिवारी
मनीष तिवारी देखील सध्या लोकसभेवर आहेत. २००९ आणि २०१९ या लोकसभेच्या निवडणूका त्यांनी जिंकल्या आहेत.
5. आनंद शर्मा
आनंद शर्मा हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते गणले जातात, पण ते देखील काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात जी-२३ चा भाग आहेत. आनंद शर्मा यांचं पक्षात वजन असलं तरी ते सातत्यानं राज्यसभेवर निवडून येत आहेत.
6. पीजे कुरियन
माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष अशी ओळख असलेले दिग्गज नेते पी. जे. कुरियन हे देखील सध्या या बंडखोर गटात आहेत. ते आधी १९८० पासून लोकसभेवर निवडून येत होते. त्यानंतर २००५ पासून ते राज्यसभेवर निवडून जात होते. मात्र २०१८ मध्ये त्यांची टर्म संपली आहे.
7. रेणुका चौधरी
माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी १९८६ पासून १९९९ पर्यंत राज्यसभेवर निवडून येत होत्या. त्यानंतर त्या लोकसभेवर गेल्या. आणि २०१२ साली त्या पुन्हा राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या.
8. मिलिंद देवरा
मुंबईच्या वर्तुळातील काँग्रेसचे दिग्गज नेते मिलीं देवरा देखील मागच्या काही काळापासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
9. मुकुल वासनिक
रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक यांचं देखील या गटात नाव घेतले जाते. सातत्यानं वासनिक महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे सक्रिय दिसून येत नाहीत. मात्र दिल्लीत त्यांचं वजन आहे. पण ते देखील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
10. जितिन प्रसाद माजी केंद्रीय मंत्री
माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितीन प्रसाद यांनी अलीकडेच काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना ४ दिवसापूर्वीच उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मात्र ते देखील २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले आहेत.
11. भूपेंदर सिंह हुड्डा
जी-२३ या यादीमधील लोकनेता अशी जर कोणी मजबूत ओळख मिळवलेला कोण नेता असेल तर ते म्हणजे भूपेंदर सिंह हुड्डा. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या विरोधी पक्ष नेते म्हणून ते जबाबदारी पार पडत आहेत.
12. राजिंदर कौर भट्टल
पंजाबच्या एकेकाळच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी पद भूषवलेले राजिंदर कौर भट्टल या देखील सध्या पक्ष नेतृत्वाविरोधात बोलत आहेत. शशी थरूर, मनिष तिवारी, भूपेंदर सिंह हूड्डा यांच्यानंतर लोकनेत्या म्हणून भट्टल यांचं नाव घ्यावं लागत.
१३. एम वीरप्पा मोइली :
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांना देखील २०१९ मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. २०१४ मध्ये देखील ते अवघ्या ७ हजार मतांनी निवडून आले होते. तेव्हा त्यांना विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला होता.
14. पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सुरुवातीला लोकांमधून निवडून येत नसल्याची टीका होतं होती. पण २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन विधानसभेच्या निवडणूका जिंकत चव्हाण यांनी आपण लोकांमधून निवडून येणारे नेते आहोत हे दाखवून दिले आहे.
15. अजय सिंह
मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री, माजी विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांना देखील २०१८ मध्ये ७ हजार मतांनी विधानसभेला पराभूत झाले आहेत.
16. राज बब्बर
अभिनेते राज बब्बर हे देखील सध्या या G23 गटात आहेत. मात्र बब्बर यांना सलग दोन निवडणुकांमध्ये मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. २०१४ मधील त्यांचा पराभव ५ लाख ६७ हजार मतांनी झाला होता. तर २०१९ मध्ये त्यांचा ४ लाख ९५ हजार अशा बऱ्याच मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.
17. अरविंदर सिंह लवली
दिल्लीचे काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली यांना देखील दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांचा पराभव झाला आहे.
18. कौल सिंह ठाकुर
कौल सिंह ठाकुर हे हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. २०१२ मध्ये ते ८ व्यांदा विधानसभेत निवडून आले होते. मात्र २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.
19. अखिलेश प्रसाद सिंह
बिहारमधील काँग्रेसचे नेते अखिलेश प्रसाद सिंह यांचा २००९ आणि २०१४ मध्ये लोकसभेला पराभव स्वीकारावा लागला आहे. सोबतच २०१५ च्या निवडणुकीमध्ये देखील पराभव झाला आहे.
20. कुलदीप शर्मा
हरियाणाचे काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष यांचा देखील २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.
21. योगानंद शास्त्री
दिल्लीचे माजी मंत्री योगानंद शास्त्री यांचा २०१३, २०१५ अशा सलग निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. तर २०२० मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होते.
22. संदीप दीक्षित
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांचा देखील २०१४ च्या निवडणुकीत पूर्व दिल्लीमधून तब्बल ३ लाख मतांनी पराभव झाला आहे.
23. विवेक तनखा
सध्या राज्यसभेचे सदस्य असलेले विवेक तनखा यांचा देखील २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. २०१६ साली पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेतले आहे.
एकूणच काय तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते अलीकडील काळात प्रत्यक्ष लोकांमधून निवडून येण्यात यशस्वी ठरले आहेत किंवा त्यांना निवडणूक जिंकता आली आहे. म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त नेत्यांचे निवडून यायचे वांदे आहेत.
हे हि वाच भिडू
- आधी चरणजीतसिंग चन्नी, आता मेवानी काँग्रेस दलित राजकारणाचा अजेंडा सेट करतीय?
- कपिल सिब्बल यांनी बोलावलेली डिनर डिप्लोमसी राहुल गांधींच्यासाठी चिंतेची बाब ठरतेय..
- दिग्विजय सिंगांनी गोव्यात ५ वर्षांपूर्वी घातलेल्या घोळाची फळ काँग्रेस आज सुद्धा भोगतीय