त्या रात्री संपूर्ण ठाण्यात पोस्टर लावण्यात आले “गद्दारांना माफी नाही” : किस्सा 1989 चा

एकनाथ शिंदेंनी यशस्वी बंड केलं, सत्ता आणली आणि मुख्यमंत्री पदही. शिंदे सरकार येऊन बरीच महिने लोटली मात्र आजही शिंदे गटाच्या आमदारांवर लागलेला ‘गद्दारांचा’ शिक्का मात्र पुसता येत नाहीय. विरोधक गद्दार हे विशेषण सोडून सत्ताधारी शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये.

भुजबळ, राणे, राज ठाकरे यांच्यानंतरचं सर्वात धक्कादायक बंड समजलं जाईल ते शिंदेंचंच.  शिंदेंच हे बंड थेट पक्षनेतृत्वाच्या विरोधातलं बंड असलं तरी ते ठाकरे कुटूंबाच्या विरोधातलं बंड ठरलं.

ठाकरे कुटूंबांच्या विरोधात बंड करण्याची ताकद आज एकनाथ शिंदे यांच्यात आहे पण एक काळ होता जेव्हा ठाकरेंच्या विरोधात बंड करणाऱ्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे ठाण मांडून होते.

किस्सा आहे 1989 चा..

1989 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या होत्या. या निवडणूकीत शिवसेनेचे 30 नगरसेवक निवडून आले होते. दूसरीकडे कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर असणाऱ्या आगरी सेनेसोबत युती केली होती. बहुमत शिवसेनेकडेच होते त्यामुळे शिवसेनेचा महापौर ठाणे महानगरपालिकेत येणार अस स्पष्ट चित्र होतं..

बाळासाहेब ठाकरेंनी या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणूकीची जबाबदारी सतीश प्रधान आणि आनंद दिघेंकडे दिली होती. प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी उमेदवार होते.

मात्र महापौर पदासाठी निवडणूक झाली आणि अवघ्या एका मताने सेनेचं महापौर पद हुकलं. सेनेच्या एका नगरसेवकाने आपलं मत विरोधात टाकलं होतं. उपमहापौर पदासाठी देखील शिवसेनेला आपला उमेदवार विजयी करता आला नाही.

हातात असलेली सत्ता गेली. गुप्त मतदान पद्धती असल्याने नेमकं कोण फुटलं हे कळायला मार्ग नव्हता.

इकडे पुरेसे नगरसेवक असूनही शिवसेनेचा महापौर न झाल्याने बाळासाहेब ठाकरे प्रचंड  चिडले. त्यांनी आनंद दिघेंना बोलावून विचारणा केली..

गद्दार कोण..?

यावर आनंद दिघेंच उत्तर होतं गद्दारांना माफी नाही..

दोन दिवसात जाहीररित्या आनंद दिघेंनी हे उद्गार काढले. आनंद दिघेंचा हाच डॉयलॉग घेवून ठाण्यात ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले. एकनाथ शिंदे तेव्हा शाखाप्रमुख होते. ते देखील असे पोस्टर लावणाऱ्यामध्ये होते अस सांगण्यात येतं. या पोस्टरवर लिहण्यात आलं होतं..

गद्दाराला माफी नाही..

पण गद्दार कोण..? नेमकं कोणाचं मत फुटलं..? याचा अंदाज कोणालाच बांधता येत नव्हता. मात्र ठाणेकरांना यांचा संबंध दिसून आला तो काहीच दिवसात शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्या हत्येमुळे..

अत्यंत निर्घूणपणे खोपकर यांची हत्या करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी गद्दारांना माफी नाही या दिघेंच्या वाक्याचा संबंध थेट खोपकर यांच्या हत्येशी जोडण्यात आला. आणि प्रकरण चिघळत गेलं..

या प्रकरणात आनंद दिघे यांच्यासह 52 नगरसेवकांना अटक करण्यात आली. आनंद दिघेंना टाडा लावण्यात आला. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं. मात्र ठाण्यासह महाराष्ट्रात या घटनेतून एक मॅसेज कायमचा गेला तो म्हणजे सेनेत गद्दारी केली तर खोपकर होवू शकतो..

पुढे कोर्टात काहीच सिद्ध होवू शकलं नाही. केस चालू असतानाच आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. आणि प्रकरण इतिहासाच्या पानात हरवून गेलं..

मात्र आजही कधी मतांच्या फाटाफुटीचा विषय येतो तेव्हा खोपकरांचा विषय चर्चेत येत असतो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.