९/११ चा बदला आणि जवाहिरीला मारण्याचं अमेरिकेचं संपूर्ण ऑपरेशन असं होतं

दहशतवादी संघटनांचं नाव घेतलं तर त्यात काही नावं प्रामुख्याने पुढे येतात. तालिबान, अलकायदा,  इसिस. आठ दिवस जात नाही की यांच्या उच्छादांची बातमी कानी पडते. मात्र सध्या यातील एका संघटनेच्या नेत्याला ठार केल्याची बातमी माध्यमांमध्ये फिरतेय. 

संघटना आहे अलकायदा, घटना घडली आहे काबुलमध्ये आणि ऑपरेशन घडवून आणलं आहे अमेरिकेने आणि निशाणा बनवण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे अल-जवाहिरी. 

अलकायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात ठार मारले आहे. अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CIA) अफगानिस्तानमध्ये ही कारवाई केली आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अल जवाहिरीच्या मृत्यूची बातमी संपूर्ण जगाला दिली आहे. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळाला आहे, असं यावेळी जो बायडन म्हणालेत. 

त्यामुळे नक्की हा अल-जवाहिरी कोण होता? की ज्याला ठार करण्यासाठी अमेरिकेला ऑपरेशन करावं लागलं, हा प्रश्न पडतोय. सोबतच अमेरिकेच्या या ऑपरेशनची सध्या जगभरात चर्चा होत आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी करण्यात आलेल्या अमेरिकेच्या ऑपरेशनची सर्वाना आठवण होतेय. 

तेव्हा सविस्तर सर्व जाणून घेऊया… 

कोण होता अयमान अल जवाहिरी?

चष्म्या घातलेला, चेहऱ्यावर हलकं हसू असलेला हा चेहरा बिन लादेनच्या बाजूने नेहमी दिसायचा. अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्यातून हे लोक वाचले आहेत त्यातील अनेक लोकांना हा चेहरा आठवणीत आहे. या व्यक्तीचं नाव म्हणजे अयमान अल जवाहिरी.  

अयमान अल-जवाहिरीचा जन्म १९ जून १९५१ मध्ये एका इजिप्तमधील कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याच्यावर धार्मिक प्रभाव जास्त राहिला ज्यातून त्याने सुन्नी इस्लामी हिंसक शाखेत प्रवेश केला. याच शाखेच्या माध्यमातून इजिप्त आणि इतर अरब राष्ट्रांची सरकारं बदलून कट्टर इस्लामी राजवट आणली होती. 

अल-जवाहिरी तसा उच्चशिक्षित होता. व्यवसायाने तो डोळ्यांचा सर्जन होता. सोबतच त्याला अरबी आणि फ्रेंच भाषा देखील येत होती. व्यवसायापेक्षा तो जास्त ऍक्टिव्ह होता दहशतवादी संघटनांत.  जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहादची स्थापना केली होती. १९७० च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध करणारी ही अतिरेकी संघटना होती.  इस्लामिक राजवट कायम ठेवणं हा त्यांचा हेतू होता.

अल-जवाहिरीने मध्य आशिया आणि मध्यपूर्वेच्या देशांत अनेक दौरे केले होते. त्या दरम्यान त्याने त्या देशांत सोव्हिएत अक्यूपायर्स यांच्या विरूद्ध अफगाणांचं युद्ध पाहिलं होतं. १९८१ मध्ये इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी राष्ट्राध्यक्ष अन्वर सादात यांची हत्या केली होती. त्यानंतर त्यांनी शेकडो अतिरेक्यांना   इजिप्तच्या तुरुंगात डांबलं होतं आणि त्यांना टॉर्चर केलं होतं. 

या शेकडो अतिरेक्यांमध्ये अल-जवाहिरी देखील एक होता. या अनुभवाने त्याला आणखी कट्टर दहशतवादी बनवलं असं सांगितलं जातं. 

१९८० च्याच दशकात त्याचा संबंध ओसामा बिन लादेनशी आला. 

अल-जवाहिरीची ओसामा बिन लादेनची सौदी अरेबियात भेट झाली  होती. ओसामा बिन लादेन १९८५ मध्ये पेशावर, पाकिस्तानमध्ये अल कायदाला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता. यावेळी अल जवाहिरीही पेशावरमध्ये होता आणि इथूनच या दोनीही दहशतवाद्यांचं नातं घट्ट होऊ लागलं.

सात वर्षांनी लादेनने अल कायदाची स्थापना केली तेव्हा अल जवाहिरी तिथे उपस्थित होता. त्याने स्वत:चा इजिप्शियन अतिरेकी गट अल कायदामध्ये विलीन केला. तेव्हापासून अल-कायदा इजिप्तमध्ये भूमिगत कामं करू लागलं. जगभरात हल्ले करण्याची तयारी त्यांनी सुरु केली.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतीक असलेल्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ च्या जुळ्या इमारतींवर अल् कायदाच्या दहशतवाद्यांनी आत्मघातकी विमानांच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेचं मोठं नुकसान झालं.

यामध्ये ओसामा बिन लादेनसोबत मुख्य काम केलं होतं ते अल जवाहिरीने. 

९/११ नंतर हल्ल्यांनंतर अल कायदा संघटनेत थोडी अफरातफर झाली होती. आसात अल जवाहिरीने अफगाण-पाकिस्तान सीमावर्ती प्रदेशात अल-कायदाचं नेतृत्व पुन्हा निर्माण केलं आणि इराक, आशिया, येमेन आणि त्याही पलीकडे शाखांवर नियंत्रण मिळवत तो सर्वोच्च नेता बनला. 

जवळच्या आणि दूरच्या शत्रूंना लक्ष्य करण्याच्या उद्देश्याने अल-कायदाने ९/११ नंतर बाली, मोम्बासा, रियाध, जकार्ता, इस्तंबूल, माद्रिद, लंडन अशा अनेक ठिकाणी हल्ले केले. २००५ मध्ये लंडनमध्ये ५२ लोक ठार झाले होते त्या हल्ल्यांमध्ये अल-कायदाचं नाव समोर आलं होतं. 

हा हल्ला मात्र अल कायच्या अंतर्गत पाश्चिमात्य देशांमध्ये झालेल्या विनाशकारी हल्ल्यांपैकी शेवटचा मानला जातो कारण त्यानंतर अमेरिकेने दहशतवादविरोधी हल्ले वाढवले. ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र यांच्याआधारे अल-कायदाशी संबंधित अनेक लढाऊ दहशतवाद्यांना ठार मारलं जाऊ लागलं. त्यामुळे  त्यांचं नेटवर्क तुटत गेलं. 

२०११ मध्ये ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ठार केल्यानंतर अल जवाहिरीला अल कायद्याचा म्होरक्या बनवण्यात आलं होतं. त्यालाही आता अमेरिकेने ठार केलं आहे. 

कसं राबवलं ऑपरेशन?

एका अमेरिकन अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, २००१ पासून अल जवाहिरी लपून होता कारण अमेरिकन सैन्य त्याच्यामागे लागलं होतं. अनेक वर्षांपासून अमेरिकेला जवाहिरीच्या नेटवर्कबद्दल माहिती मिळत होती आणि एजन्सी त्यावर लक्ष ठेवून होती.

२०२० मध्ये अफगाणिस्तानसोबत अमेरिकेने करार केला होता की ते कोणत्याही दहशतवाद्याला आश्रय देणार नाही. याच करारामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली होती. मात्र त्यानंतर तिथे अल कायदाचे अस्तित्व वाढण्याची चिन्ह अमेरिकेला जाणवली. त्यांनी अजून सूक्ष्म लक्ष ठेवायला सुरुवात केली. 

२०२१ मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानचं सरकार स्थापन झाल्यानंतर अल जवाहिरी तिथे गेला असल्याची भनक अमेरिकन गुप्तचर संस्थेला लागली होती. जवाहिरी त्याच्या कुटुंबासहित काबूलमधील एका सुरक्षित घरात राहत असल्याचं त्यांना समजलं. यानंतर कित्येक दिवस त्या भागाचा बारकाईने अभ्यास करण्यात आला प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं. 

या घरामध्ये जवाहिरीचे वास्तव्य असल्याची खात्री पटली त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी ही माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना दिली. राष्ट्राध्यक्षांनी ऑपरेशनला होकार दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली. 

अधिकाऱ्यांनी त्या घराची पाहणी केली आणि तिथे किती लोक राहतात? घराची रचना कशी आहे? याची माहिती घेतली. इतरांना कमीत कमी हानी पोहोचवून ऑपरेशन कसं केलं जाऊ शकतं याचाही शोध घेण्यात आला असं या अधिकाऱ्याने सांगितलं. परत तपशीलवार माहिती राष्ट्राध्यक्षांना दिली. 

१ जुलै २०२२ ला बायडेन यांनी प्रमुख सल्लागार आणि मंत्रिमंडळ सदस्यांसह ऑपरेशन राबवण्याबाबत चर्चा करायला बैठका बोलावल्या. या बैठकीत CIA चे संचालक विल्यम बर्न्स यांचा देखील समावेश होता. बायडेन यांनी CIA च्या अधिकाऱ्यांना तपशीलवार प्रश्न विचारले. गुप्तचर यंत्रणेने तयार केलेल्या घराच्या मॉडेलचं बारकाईने परीक्षण करण्यात आलं. ऑपरेशन कितपत सफल होऊ शकत याची सखोल चर्चा करण्यात आली होती.

२५ जुलै रोजी बायडेन यांनी त्यांच्या प्रमुख मंत्रिमंडळ सदस्यांना आणि सल्लागारांना अंतिम ब्रीफिंग घेण्यासाठी बैठक बोलावली. जवाहिरीची हत्या झाल्यानंतर त्याचा अमेरिकेवर आणि तालिबान-अमेरिका  संबंधांवर कसा परिणाम होईल? यावर चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर बायडेन यांनी या ऑपरेशनला अंतिम मंजुरी दिली. 

३१ जुलैच्या रात्री ऑपरेशनची सुरुवात झाली. सीआयएला तपासादरम्यान माहिती मिळाली होती की, अल जवाहिरी दररोज सकाळी बाल्कनी काही तासांसाठी थांबतो. याचवेळी त्याच्यावर हल्ला करण्याचं अमेरिकन गुप्तचर संघटनेनं ठरवलं. 

ड्रोन हल्ल्याच्या मार्फत ऑपरेशन पूर्ण करायचं होतं. यासाठी अमेरिकेने मॅकॅब्रे हेलफायर R9X या मिसाईला निवडलं. असं मानलं जातं की, हे क्षेपणास्त्र सहा रेझरसारख्या ब्लेडने सुसज्ज आहे, जे त्याच्या टार्गेटच्या तुकडे करतं, स्फोट करत नाही. 

याला ‘निन्जा बॉम्ब’ असंही म्हटलं जातं.

अमेरिकेने आजवर अनेक अतिरेक्यांना मारण्यासाठी या  क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. मार्च २०१७ मध्ये पहिल्यांदा R9X जगासमोर आलं होतं जेव्हा अल-कायदाचा ज्येष्ठ नेता अबू अल-खयर अल-मसरी सीरियामध्ये कारमधून प्रवास करत असताना ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता.

जेव्हा अबू अल-खयरचे फोटो समोर आले होते तेव्हा कारच्या छताला एक मोठं छिद्र दिसलं होतं आणि  गाडीचा पुढचा आणि मागील भाग पूर्णपणे शाबूत दिसत होता. म्हणजे या मिसाईलने इतर नुकसान न करता केवळ टार्गेटला मारलं होतं. 

अल जवाहिरीच्या प्रकरणातही अमेरिकेला केवळ त्याला ठार करायचं होतं, इतर कुणालाही हानी होणार नाही अशी ताकीद राष्ट्राध्यक्षांनी दिली होती. म्हणून R9X ला निवडलं गेलं. 

३१ जुलैला नेहमीच्या सवयीनुसार जेव्हा अल जवाहिरी त्याच्या बाल्कनीत आला तेव्हा सकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी  अमेरिकेच्या सैन्याने जवाहिरीच्या घरावर दोन मिसाईल डागल्या आणि जवाहिरीचा खात्मा केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या हल्ल्यानंतर अल जवाहिरी ठार झाला आहे याची पुष्टी करण्यासाठी २ दिवस लागले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुष्टी झाल्यानंतर जो बायडन यांनी ही बातमी जगजाहीर केली आहे.

या ऑपरेशनमुळे अल कायदाला मोठा धक्का बसला आहे आणि यामुळे या गटाची काम करण्याची क्षमता कमी होईल, असं अधिकारी सांगत आहेत. 

तर या हल्ल्यामुळे अमेरिकेने त्यांचा बदला पूर्ण केल्याचं देखील बोललं जातंय. अमेरिकेच्या या ऑपरेशनने परत त्यांची ताकद जगाला दाखवून दिली आहे. अल कायदाच्या दोन्ही म्होरक्यांना अमेरिकेने ठार केलं असल्याने कोणताही दहशतवादी गट अमेरिकेशी वैर घेण्याआधी विचार करेल, असं बोललं जातंय.

सोबतच अमेरिकेचं जागतिक स्तरावर देखील प्रस्थ मजबूत होण्याला या ऑपरेशनची मदत होणार आहे, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.