खरं वाटणार नाही, पण राज कपूरला रशियन चाहत्यांनी गाडीसकट डोक्यावर उचललं होतं

शो मन राजकपूर कायम सिनेमाच्या विश्वात मशगुल असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या डोक्यात कायम सिनेमाचा विचार चालू असायचा. १९६४ साली ‘संगम’ हा त्यांचा पहिला रंगीत सिनेमा प्रदर्शित झाला. त्या आधी या चित्रपटाच्या कलर प्रिंट साठी ते इंग्लंडला गेले होते. 

‘संगम’ चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचाच होता तरी, त्यांच्या डोक्यात त्यांच्या पुढच्या चित्रपटाचे विषय सुरू झाले होते. त्यांचा पुढचा महत्त्वाकांशी सिनेमा होता ‘मेरा नाम जोकर’. या सिनेमांमध्ये सर्कस ला अनन्य साधारण असे महत्त्व होते आणि त्या काळात जगभरात रशियन सर्कसचा मोठा बोल बाला होता. 

इंग्लंडमध्ये असतानाच त्यांच्या डोक्यात काय आले माहित नाही पण ते इंग्लंड हून  तडक रशियाला जायला निघाले. 

 तिथे जाऊन तिथल्या रशियन सर्कस सोबत त्यांना त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत चर्चा करायची होती. परंतू विमानात बसल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की आपल्याकडे रशियाचा व्हिसा च नाही! आता तर विमानात बसलोय. आता काय करायचे? अर्थात त्यावेळी एअरलाइन्स चे नियम आता इतके कडक  नव्हते. 

राजकपूर मास्को विमानतळावर पोहोचले. त्या वेळी रशिया युनायटेड सोशालिस्ट सोवियत रिपब्लिक होता.

विमानतळावर उतरल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांनी व्हिसा  मागितला; पण त्याच वेळी इमिग्रेशनच्या एका ऑफिसरने राज कपूरला ओळखले आणि तो पुढे आला. राज कपूर शी हस्तांदोलन करत म्हणाला , “ वेलकम राजकपूर वेलकम!” राज कपूर ने त्याला वस्तुस्थिती सांगितले. त्याने राज कपूरला बसवून घेतले आणि ,”

काही काळजी करू नका. एका मिनिटात तुमचा व्हिसा मी तयार करून देतो!” असे त्यांनी सांगितले. आणि अक्षरशः पुढच्या काही मिनिटांमध्ये राज कपूरचा व्हिसा  तयार झाला. हा राज कपूर यांच्या लोकप्रियतेचा महिमा होता. कारण त्या काळात राज कपूरच्या चित्रपटांना रशियामध्ये अफाट लोकप्रियता मिळत होती.

खरी गंमत पुढेच आहे. व्हिसा मिळाल्यानंतर राजकपूर विमानतळाच्या बाहेर आले. त्यांचा येण्याचा कुठलाही  प्लॅन नसल्यामुळे रशियन गव्हर्मेंट कडून त्यांना नेहमी पाठवण्यात येणारी गाडी देखील आली नव्हती. त्यामुळे राज कपूर ने खाजगी टॅक्सीने जायचे ठरवले. तोवर विमानतळावरील रशियन लोकांना राज कपूर तिथे आल्याचे कळाले.

ते राजकपूरच्या वेड्यासारखे  भोवती गोळा झाले व त्याच्याशी बोलू लागले. हस्तांदोलन करू लागले.

‘आवारा हूं…’ हे गाणे कोरस मध्ये म्हणू लागले. सारा एअरपोर्ट राज कपूरच्या उपस्थितीने भारावला गेला. त्यांच्यातून बाहेर पडून राज कपूर आपल्या टॅक्सीस जाऊन बसले. पण लोकांची झुंबड टॅक्सी भोवती आली. सगळ्यांना राज कपूरला पाहायचे होते, भेटायचे होते, सगळ्यांना राज कपूरशी हस्तांदोलन करायचे होते.

सर्वांना राजकपूरला डोळे भरून पाहायचे होते!

त्यामुळे सगळ्यांनी राज कपूरची टॅक्सी अक्षरशः आपल्या खांद्यावर उचलून घेऊन त्याला अभिवादन केले. इतकी प्रचंड लोकप्रियता दुसऱ्या कुठल्याही कलावंताला रशियामध्ये मिळाली नसेल! मग विमानतळावरील सिक्युरिटी तिथे आली त्यांनी राज ला टॅक्सी तून बाहेर येवून सर्वांशी संवाद साधायला सांगितला आणि मगच तृप्त भावनेने सर्वानी राज कपूरला निरोप दिला!

हि आठवण राजकपूरचे चिरंजीव ऋषीकपूर यांनी दिल्लीत ३ सप्टेंबर २०१६ रोजी  पहिल्या ब्रिक्स (BRICS – Brazil, Russia, India, China, South Africa) फिल्म फेस्टीवलच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितली होती.

  • भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.