एके हंगल पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करायला गेलेत, हे बाळासाहेबांना कळलं आणि…

ए. के. हंगल यांचं नाव उच्चारताच डोळ्यासमोर सर्वप्रथम आठवतात ते त्यांनी साकारलेले रहीम चाचा. तसं ‘शोले’ सिनेमातल्या सगळ्या व्यक्तिरेखा लक्षात राहणाऱ्या. यापैकी ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ म्हणत वावरणारे रहीम चाचा सुद्धा सिनेमात विशेष भाव खाऊन जातात.

ए. के. हंगल यांच्याकडे पाहिल्यावर नेहमी असं वाटतं की आजोबा असावेत तर असे. हिंदी सिनेमात अनेक सिनेमांमध्ये भूमिका करून उत्तम कलाकार म्हणून त्यांची भारतीय सिनेसृष्टीत ओळख होती. पण ए. के. हंगल यांनी आयुष्यात केलेल्या एका गोष्टीमुळे त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रागाला सामोरे जावं लागलं.

नेमकं काय घडलं होतं प्रकरण ? हे जाणून घेण्याआधी ए. के. हंगल यांच्या जीवनाकडे एक नजर.

सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावर येथे १९१४ साली त्यांचा जन्म एका काश्मिरी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्याचं पूर्ण नाव अवतार किशन हंगल. लहानपणापासूनच अभिनयाकडे त्यांचा ओढा होता. म्हणून नाटकांमध्ये ते काम करू लागले.

१९२९ ते १९४७ या काळात भारतात स्वातंत्र्य चळवळ जोर धरू लागली होती. या लढ्यात ए. के. हंगल यांचाही सहभाग होता. त्यांच्या वडिलांनी नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचं कुटुंब कराची येथे स्थायिक झालं.

ए के हंगल कम्युनिस्ट पार्टीचे काम करत होते. शहीद ए आझम भगतसिंग यांच्या फाशीच्या वेळचा पाकिस्तानमधला माहोल त्यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

मुझे स्पष्ट तौर पर याद है वो दिन जब भगत सिंह को गिरफ्तार किया गया था. जिस दिन उन्हें फांसी पर लटका दिया गया था. तब पठान रोए थे और लोग उनका नाम पुकारते हुए सड़कों पर निकल आए थे.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. आणि पाकिस्तान निर्माण झालं.

कम्युनिस्ट विचारांमुळे ए. के. हंगल यांना कराची येथील एका कारागृहात तुरुंगवास भोगावा लागला. ३ वर्षांनंतर १९४९ साली जेलमधून सुटल्यावर ते भारतात येऊन दिल्लीत स्थायिक झाले. तिथे काही काळ टेलरिंगच काम केलं. पण फार काळ मन रमलं नाही. ते मुंबईला सिनेमात काम मिळतं का पाहण्यासाठी आले.

अभिनयाची पार्श्वभूमी होतीच. त्यामुळे १९४९ ते १९६५ अशी जवळपास १६ वर्ष ए. के. हंगल यांनी विविध नाटकांमधून काम केले.

वयाच्या ५२ व्या वर्षी १९६६ साली बासू भट्टाचार्य यांच्या ‘तिसरी कसम’ सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

सध्याच्या काळात बॉलिवुडमध्ये पन्नाशी ओलांडलेल्या अनेक कलाकारांना अजूनही सिनेमात हीरो म्हणून झळकायचे असते. पण तेव्हाचा काळ असा नव्हता. त्यामुळे ए. के. हंगल यांना वयोमानानुसार बाबा, काका, आजोबा अशा भूमिका मिळाल्या. त्यांनी या भूमिका उत्तमपणे साकारल्या सुद्धा. आणि हीच त्यांची ओळख झाली.

रील लाईफ मध्ये आणि रियल लाईफ मध्ये देखील त्यांची इमेज एका सज्जन माणसाची होती.

सिनेमात मशहूर असलेल्या ए. के. हंगल यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या क्रोधाचा सामना करावा लागला होता.

ही गोष्ट १९९३ ची. पाकिस्तान स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी ए. के. हंगल पाकिस्तानात गेले होते.

हा दिन पाकिस्तान येथील कौन्सिल जनरल ऑफिस येथे झाला होता. यावेळी ए. के. हंगल संपूर्ण वेळ तिथे हजर होते. ए. के. हंगल यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात भाग घेतला आहे, हे बाळासाहेब ठाकरे यांना कळालं. याचा परिणाम असा झाला की, बाळासाहेबांनी ए. के. हंगल यांच्या कामांवर बंदी आणली.

तो काळ मुंबईत सुरू असलेले जातीय दंगली आणि पुढे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा होता.

पुढील दोन वर्ष सिनेसृष्टीतील सर्व फिल्ममेकर्सनी ए. के. हंगल यांच्याबरोबर कोणत्याही सिनेमाचा करार केला नाही. थिएटर मालकांनी देखील त्यांच्या सिनेमावर अघोषित बंदी आणली.

बाळासाहेबांना कलाकरांबद्दल आदर होता. त्यांची अनेक कलाकारांशी मैत्री होती. पण आपल्या मातीतला कलाकार पाकिस्तानात जाऊन त्यांच्या सोहळ्यात सहभागी होतो, हे बाळासाहेबांना मान्य नव्हतं. याच गोष्टीमुळे त्यांनी त्यांचा खास दोस्त अभिनेता दिलीप कुमारशी सुद्धा मैत्री तोडली होती. 

एकेकाळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सामील झालेल्या हंगल यांनी मात्र ही गोष्ट खूप मनाला लावून घेतली होती,

“मैं अपना सब कुछ पीछे छोड़कर कराची से भारत आया था लेकिन फिर भी मुझे पाकिस्तानी घोषित कर दिया गया.”

दोन वर्षानंतर ए. के. हंगल यांना पुन्हा सिनेमात कामं मिळू लागली.

पण पाकिस्तानात गेल्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या विरोधाला सामोरं जाणं, त्यांच्या सदैव लक्षात असेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.