गुजरातमधल्या भूपत भयाणींचा नेमका मॅटर काय झालाय ?

यंदाची गुजरात विधानसभा निवडणूक ही चांगलीच चर्चेत राहिली. भाजपनं आपली पूर्ण ताकद लावली, काँग्रेसनंही २०१७ मध्ये चांगलं यश मिळवलेलं असल्यानं यंदा विजयाच्या आशेनंच प्रचार केला तर, आम आदमी पार्टीनंही चांगलाच जोर लावला होता, पण निकालाच्या दिवशी मात्र अशी चूरस अजिबातच पाहायला मिळाली नाही.

८ डिसेंबर २०२२ ला गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. भाजप पुन्हा सत्तेत आली. काँग्रेस सत्तेपासून पुन्हा दूर राहिली. पण या सगळ्यात दोन गोष्टी अधिक चर्चेत आल्या त्या म्हणजे, भाजपनं गुजरात विधानसभा निवडणुकीत आजवरचा सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा काँग्रेसचा मोडलेला विक्रम आणि फक्त ५ जागा जिंकून बाजी मारलेला आम आदमी पार्टी हा पक्ष.

पण हा निकाल लागून २ दिवस झाले नाहीत तोवरच आम आदमी पार्टीसाठी एक मोठा ट्विस्ट आलाय. निवडून आलेल्या ५ आमदारांपैकी १ आमदार आता पक्ष सोडणार असल्याचं वृत्त समोर येतंय. पक्ष सोडल्यानंतर हा आमदार भाजपसोबत जाणार असल्याचंही माध्यमांमध्ये सांगितलं जातंय.

भूपत भयाणी असं या आप आमदाराचं नाव आहे.

गुजरातमधील जुनागडमधल्या विसावदर या विधानसभा मतदार संघातून भूपत भयाणी हे निवडून आलेत. आता हे भूपत भयाणी कोण तर, ते मुळात भाजपचेच. २ वर्षांपुर्वी त्यांनी भाजप पक्ष सोडला पण आता आम आदमी पार्टीमधून निवडून आल्यानंतर आता ते पुन्हा भाजपमध्ये जाणार अश्या चर्चांना उधाण आलंय.

याशिवाय भूपत भयाणी हे एकटेच पक्ष सोडणार नाहीयेत तर, त्यांच्यासोबत आणखी एका आप आमदारालाही घेऊन जाणार असल्याची चर्चा रंगलीय.

विसावदरमध्ये होती तीन पक्षांची लढत:
या मतदारसंघात भाजपचे उमेदवार असलेले हर्षदकुमार माधवजीभाई रिबडिया हे २०१७ मध्ये काँग्रेसकडून या विसावदर मतदारसंघातले आमदार होते. याशिवाय, काँग्रेसकडून करशनभाई नारणभाई वडादोरिया यांनी निवडणूक लढली. तर, आपकडून भूपत भयाणी यांनी निवडणूक लढली. भूपत भयाणी यांनी एकूण ६६,२१० मतं मिळवली तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपच्या हर्षदकुमार रिबडिया यांनी ५९,१४७ मतं मिळवली. ७,६०३ मतांनी भूपत भयाणी यांचा विजय झाला

या बातम्यांवर भूपत भयाणी यांनी अजून काही ठरलं नसल्याची प्रतिक्रिया दिलीय.

या बाबतील माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर भयाणी यांनी “माझं अजून नक्की काही ठरलेलं नाही. मी मतदार संघातल्या लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर काय तो निर्णय घेईन.” असं उत्तर दिलंय. शिवाय त्यांनी असंही म्हटलंय की,

“माझं भाजपमध्ये अजून कोणाशी काही बोलणं झालेलं नाही. मी सध्या आम आदमी पार्टीतच आहे.”

त्यामुळे, ते खरंच आम आदमी पार्टीला रामराम देणार की नाही याबाबत नक्की अशी काही माहिती नाही. जर, त्यांनी पक्ष सोडायचा निर्णय घेतला आणि भाजपमध्ये गेले तर, भाजपला फार काही फायदा होईल असं चित्र सध्यातरी गुजरातमधली राजकीय परिस्थिती दिसतेय.

भाजपमध्ये गेल्यास भयाणी यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे

आता भूपत भयाणी हे जर आम आदमी पार्टी सोडून गेले, तर पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होणार आणि मग मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार. आता जर ते भाजपमध्ये गेले तर, भाजपमध्ये आधीपासूनच २०१७-२०२२ या काळात आमदार राहिलेले हर्षदकुमार माधवजीभाई रिबडिया हे आहेत. त्यामुळे भाजप भयाणी यांना पोटनिवडणूकीचं तिकीट देईलच असं ठामपणे सांगता येणार नाही. त्यामुळे, आम आदमी पक्षाला राम राम ठोकून भाजपमध्ये जाणं हे भयाणी यांना महाग पडू शकतं.

भूपत भयाणी हे आम आदमी पक्ष सोडतायत की नाही हे आताच सांगणं कठीण असलं तरी, ते गेले तर, प्रचाराच्या वेळी मोठं ‘यंदा गुजरातमध्ये मोठं यश मिळवणार’ असा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षासाठी हा मोठा झटका ठरेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.