ओवैसींच्या सक्रियतेमुळे राकेश टिकैत अस्वस्थ झालेत, कारण प्रश्न १३६ जागांचा आहे..!
उत्तरप्रदेशच राजकारण सध्या ‘अब्बाजान’ विरुद्व ‘चाचाजान’ या दोन शब्दांभोवती फिरत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना त्यांच्या वडिलांना म्हणजे मुलायम सिंह यादव यांना ‘अब्बाजान’ म्हंटलं होतं. त्यानंतर आता भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी असदुद्दीन ओवैसी यांना भाजपचे ‘चाचाजान’ म्हंटले आहे.
टिकैत म्हणाले कि ओवैसी भाजपवर टीका करतात, त्यांना अत्यंत हिन भाषेत बोलतात, मात्र तरी देखील त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होतं नाही. त्याच कारण म्हणजे हे दोन्ही पक्ष एकाच टीममध्ये आहेत.
मात्र यामुळे प्रश्न पडतो तो म्हणजे राकेश टिकैत यांनी सध्या असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे आपला मोर्चा का वळला आहे? ते का अस्वस्थ होतं आहेत?
तर सध्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेले राकेश टिकैत यांनी आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी ते राज्यभरात फिरून रॅली आणि जाहीर सभा घेत आहेत. त्यातुन ते पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाट-मुस्लिम या दोन समाजामधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र टिकैत यांच्या या प्रयत्नांमध्ये अडथळा येतोय तो म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा.
असदुद्दीन ओवैसी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी करत आहेत. याच तयारीचा भाग म्हणून त्यांनी राज्यातील १०० मुस्लिम बहुल जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. नुकताच त्यांनी अयोध्या, सुलतानपूर आणि बाराबंकी या भागाचा दौरा देखील केला.
मात्र जाणकारांच्या मते, उत्तरप्रदेशमध्ये मुस्लिम मतदार हे सपाचे पारंपारिक मतदार मानले जातात. त्यामुळेच ओवैसी सध्या राज्यात मुस्लिम समाजाला आपल्या पक्षाशी जोडण्यासाठी अखिलेश यादव यांच्यावर टीका करत आहेत. आणि ओवैसींच्या याच सगळ्या सक्रियतेमुळे सध्या राकेश टिकैत अस्वस्थ दिसून येत आहेत. कारण मुस्लिम मतांचं विभाजन हे भाजपसाठी सत्तेची समीकरण सोपं करते.
त्यामुळेच राकेश टिकैत हापुडमधील सभेत बोलताना म्हणाले कि,
भाजपचे ‘चाचाजान’ असदुद्दीन ओवैसी आता उत्तर प्रदेशमध्ये आले आहेत. पण खरंतर त्यांना भाजपनेच बोलावलं आहे. आता देशात जिथं जिथं निवडणुका असतील तिथं तिथं भाजपचे ‘चाचाजान’ पोहोचतील. ओवैसी भाजपला काहीही म्हणतील पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. कारण दोन्ही पक्ष एकाच टीममधील आहेत.
पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट-मुस्लिम समुदायाचा प्रभाव
टिकैत यांच्या अस्वस्थतेचं कारण आहे ते म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाट-मुस्लिम राजकारण आणि त्यांचा १३६ जागांवरील प्रभाव.
असं सांगितले जाते कि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये एक काळ असा होता जेव्हा जाट आणि मुस्लिम मतदार एकमेकांसोबत असायचे. पण या भागातील मुजफ्फरनगरमध्ये २०१३ साली धार्मिक दंगल झाली आणि दोन्ही समुदायांमधील वातावरण खराब झालं. त्यामुळे जाट आणि मुस्लिम मतदार विखुरले गेल्याचं दिसून आले. ज्याचा थेट फायदा भाजपला झाला होता.
२०१३ नंतर जाट मतदार भाजपचा प्रमुख मतदार झाला आणि मुस्लिम सपा, बसपा आणि काँग्रेससोबत गेल्याच दिसून आलं. परिणामी २०१४ च्या लोकसभा आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशात जाट-मुस्लिम केमिस्ट्रीचे नवीन समीकरण तयार केले. २०१९ मध्ये देखील भाजपला याचा फायदा झाला.
१३६ जागांवर जाट-मुस्लिम समुदायाचा प्रभाव :
उत्तर प्रदेशमध्ये जाट समुदायाची लोकसंख्या ४ टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये हि लोकसंख्या २० टक्क्यांपर्यंत आहे. तर मुस्लिम समुदायाची लोकसंख्या संपूर्ण उत्तरप्रदेशात २० टक्के आहे, मात्र पश्चिम उत्तर प्रदेशात हि टक्केवारी ३५ ते ५० टक्क्यांच्या घरात आहे.
त्यामुळे जाट आणि मुस्लिम समुदाय सहारनपुर, मेरठ, बिजनोर, अमरोहा, मुजफ्फरनगर, बागपत, अलीगढ-मुरादाबाद अशा प्रमुख भागांसह पश्चिम उत्तर प्रदेशातील १३६ विधानसभांच्या जागेवर परिणाम पडतात. तर या १३६ जागांपैकी ५५ जागा अशा आहेत जिथं जाट-मुस्लिम लोकसंख्या मिळून ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत.
माजी पंतप्रधान चरण सिंह हे जाट समुदायाचे सर्वात मोठे नेते म्हणून देशात ओळखले जायचे. मात्र त्यांनी राजकारणात आपली जागा बनवण्यासाठी आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ‘अजगर’ (अहिर, जाट, गुर्जर आणि राजपूत) आणि ‘मजगर’ (मुस्लिम, जाट, गुर्जर आणि राजपूत) असा फॉर्म्युला बनवला होता. याच समीकरणाच्या आधारे चरणसिंह यांनी अगदी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली होती.
आता हेच समीकरण आता पुन्हा बसवण्यासाठी दंगलीनंतर विखुरलेल्या जाट-मुस्लिम समाजाला जवळ आणण्यासाठी राकेश टिकैत यांनी भारतीय किसान यूनियनपासून दुरावलेले शेतकरी नेते गुलाम मोहम्मद जौला यांना आपल्या व्यासपीठावर परत आणलं आहे.
एकूणच काय तर सध्या टिकैत यांना लागलेली काळजी म्हणजे ‘जर ओवैसींच्या प्रभावात मुस्लिम समुदाय आपल्यापासून दुरावला तर पश्चिम उत्तरप्रदेशात भाजपचा विजय रथ रोखणे अवघड होऊन बसेल. त्यामुळेच त्यांनी ओवैसींच्या आक्रमकतेवर टीका करत भाजपची बी टीम म्हंटले आहे.
हे हि वाच भिडू
- असदुद्दीन ओवैसींनी दौऱ्याची सुरुवात अयोध्येपासून केलीय, नेमकं काय राजकारण आहे?
- शिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा केलीय, पण त्यांची ताकद किती?
- पुण्यातील त्या एका वादानं उत्तरप्रदेशातील राजकारण कायमचं बदलून टाकलं