म्हणून २५ वर्ष झाली तरी मराठा मंदिर मधून DDLJ उतरवण्यात आलेला नाही..

खूपदा कामानिमित्त मुंबई सेंट्रल भागात जाणं येणं होतं. ट्रॅफिक बरीच असते. पण एके ठिकाणी हमखास नजर जाते ती म्हणजे मराठा मंदिर. सर्व जण मुंबईत असणाऱ्या या सिनेमागृहाच्या नावाशी परिचित असावेत. या थेटरच्या बाहेर खूप ट्रॅफिक असतं तरीही येथे वावरणारा प्रत्येक माणूस एकदा तरी नजर वर करून मराठा मंदिर कडे बघतो. काळानुरूप थोडं जीर्ण शिर्ण झालं असलं तरीही गेली अनेक वर्ष एका सिनेमाचं पोस्टर इथे झळकत आहे.

हा सिनेमा म्हणजे,

‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’

२० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा २५ वर्षांचा झाला आहे.

तसा हा सिनेमा आला होता तेव्हा आम्ही बाळुत्यातच असल्यानं, नॉस्टॅल्जिक वगैरे असण्याचं गणित माझ्याजवळ नव्हतं. तरिही २५ वर्ष एका थिएटरमध्ये हा सिनेमा कसा काय टिकू शकतो हे गणित काही केल्या सुटत नव्हतं.

शेवटी इंडस्ट्रीतल्या काही लोकांसोबत बोललो. सिनेमा न उतरण्याची प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने कारणे देत होता.

काहीजण म्हणाले शाहरूख आणि आदित्य चोप्राने ही ठरवेलील मार्केटिंग स्ट्रेटेजी आहे. त्या काळात कोणता सिनेमा किती दिवस चालला हे गणित चालायचं. यातूनच मॅटनी शो साठी मराठा मंदीर सोबत त्यांनी हा डाव खेळला. सिनेमाचा शो कायमस्वरुपी ठेवायचा आणि त्यासाठी असणारी ४० टक्के तिकीटांचे पैसे आम्ही दरवर्षी देत राहणार असा करार होता. आत्ता खरंखोटं मराठा मंदीर आणि चोप्रांनाच माहित. कितीही झालं तरी या सगळ्या ऐकीव गोष्टी.

तरिही एक गोष्ट मात्र ढळढळीत सत्य आहे, इथेच दुसरा कोणताही सिनेमा असता तर लोकांनी वरच्या थेयरीवर विश्वास ठेवला असता पण DDLJ असल्याने या थेअरीवर विश्वास बसत नाही, 

१००० आठवडे पुर्ण झाल्यानंतर सिनेमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण लोकांच्या व चोप्रांच्या आग्रहावरून सिनेमा कंटिन्यू राहिला.

आजही हा सिनेमा मराठा मंदीरमध्ये आपला तळ ठोकून आहे. 

सर्वाधिक काळ थिएटरमध्ये असणारा सिनेमा म्हणून अशोक कुमार यांच्या किस्मत पिक्चरला होता. कलकत्त्याच्या रॉक्सी थिएटरमध्ये हा सिनेमा १८७ आठवडे होता. हा रेकॉर्ड ३२ वर्ष टिकून राहिला. पुढे हा रेकॉर्ड तोडण्याचा मान गेला तो शोले सिनेमाला. शोले मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये ५ वर्ष राहिला.  त्यानंतर आला DDLJ…

पुढचा इतिहास तर तुम्हाला माहितच आहे…

अस काय आहे मग या सिनेमात ? 

बालपणी प्रेम वैगरे गोष्टींशी सबंध नसायचा. ‘हक से सिंगल’ आयुष्यात राज आणि सिमरन आले. आणि त्या त्या वयात आवडणारी प्रत्येक मुलगी एकदा तरी सिमरन सारखी मागे वळून पलटेल, अशी खूप इच्छा असायची.

मुळात प्रेमकहाणी प्रेक्षकांना तेव्हाच आवडते जेव्हा संवादांपेक्षा हीरो – हिरोईनचे डोळे अधिक बोलतात. कारण प्रेम व्यक्त करण्याची खरी जादू ही डोळ्यांमध्ये आहे. शाहरुख इथेच बाजी जिंकतो. शाहरुख सारख्या कसलेल्या कलाकाराला मग काजोलची साथ मिळते. दोघंही अभिनयाच्या बाबतीत जबरदस्त.

त्यामुळे एकत्र आल्यावर दोघांची अफलातून केमिस्ट्री रंगते आणि ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ साकार होतो.  

तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही, या सिनेमात काम करण्यासाठी सुरुवातीला शाहरुखने नकार दिला होता. इतकंच नव्हे, तर आदित्य चोप्राला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझने प्रमुख भूमिका करावी, असं वाटतं होतं.

हे सगळं सविस्तर सांगायचं झालं तर…

आदित्य चोप्राचा ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा. त्याच्या डोक्यात कथा अशी होती की, एका भारतीय मुलीला अमेरिकेत राहणाऱ्या एका मुलावर प्रेम होतं. यामुळे आदित्यच्या डोक्यात टॉम क्रुझ हे नाव होतं. परंतु आदित्यचे बाबा आणि महान दिग्दर्शक यश चोप्रा यांनी या गोष्टीला मनाई केली. आणि त्यांनी आदित्यच्या डोक्यातला हिरोला भारतात आणून त्याचं नाव राज ठेवलं.

नाहीतर विचार करा.. आज काजोल टॉम क्रुजच्या खांद्यावर असती, आणि टॉमच्या हातात गिटार असतं. जे होतं ते चांगल्यासाठी म्हणायचं…

यानंतर आदित्यने शाहरुखला विचारलं. पण शाहरुखने हा सिनेमा करायला तयार नकार दिला. हरकत नाही म्हणत, आदित्यने सैफ अली खान आणि आमिर खानला विचारलं. परंतु या दोघांनी सुद्धा नकार दिला. आणि पुन्हा आदित्य शाहरुख जवळ आला.

शाहरुख बरोबर आदित्य सिनेमाच्या कथेबाबतीत सारखी चर्चा करायचा. या चर्चांमध्ये आदित्यला शाहरुखच्या नकारामागचं कारण कळालं. १९९३ साली शाहरुखचे ‘डर’ , ‘बाजीगर’ हे दोन सिनेमे आले होते. या दोन्ही सिनेमांमध्ये शाहरुखने साकारलेल्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांनी पसंत केल्या होत्या. त्यामुळे शाहरुखला रोमँटिक हीरो करायचा नव्हता.

यानंतर यश चोप्रा आणि आदित्यने शाहरुखला समजावलं आणि मग शाहरुख तयार झाला. या सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे. सिनेमा यशस्वी झाल्यावर एका पोस्टरवर शाहरुखने आदित्यचे आभार मानताना लिहिलं आहे की,

‘मी आज जो स्टार आहे तो फक्त तुझ्यामुळे… थँक यू आदी’.

माणूस त्या त्या वेळी कोणते निर्णय घेतो यावर त्याची पुढील वाटचाल अवलंबून असते. शाहरुखने हा सिनेमा करायचा घेतलेला निर्णय त्याच्या करीयरला कलाटणी देणारा ठरला. 

शाहरुख बद्दल सांगितलं आत्ता जरा आपल्या हिरोईन विषयी…

काजोलने साकारलेली सिमरन ही आपल्या प्रत्येकाच्या मनातली मुलगी असावी. संस्कारी, हळवी, देखणी मुलगी जी डोळ्यांनी अधिक बोलते. काजोल प्रत्यक्ष आयुष्यात किती मस्तीखोर आहे हे आपण बघितलं आहे. या सिनेमात राज सिमरनला शर्टावर असलेल्या लिपस्टीकचे निशाण दाखवून तिची मस्करी करतो. हे निशाण ओठांचे असतात.

हा सीन जास्त रंगतदार व्हावा म्हणून स्वतः काजोलने ओठांच्या आकाराचे हे लिपस्टीक वाले निशाण बनवले होते. 

काजोल काहीशी हट्टी. तिचा हा हट्ट सर्वांना अनुभवायला मिळाला. सिनेमात ‘मेरे ख्वाबो में जो आए’ या गाण्यावर काजोलची एन्ट्री होते. या गाण्यात काजोलने टॉवेल लपेटलेला असतो. या गोष्टीच्या ती आधी विरोधात होती. ‘मुली या टॉवेल लपेटून का नाचतील? आणि छोट्या कपड्यांमध्ये नाचणारी मी हिरोईन नाही.’ असं काजोलचं स्पष्ट मत होतं.

टाॅवेलचा वापर या गाण्यात केल्यावर खूप छान वाटेल, हे जेव्हा आदित्यने काजोलला खूप वेळ समजावलं तेव्हा कुठे काजोल तयार झाली. 

आदित्य चोप्राने जवळपास ३ वर्ष दिलवाले… च्या पटकथेवर काम केलं.

पण सिनेमाला नाव काय द्यायचं हा मोठा प्रश्न आदित्यच्या डोक्यात होता. अखेर अभिनेत्री किरण खेर यांनी नाव सुचवलं ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे.’ हे नाव सर्वांना प्रचंड आवडलं. सिनेमाच्या सुरुवातीला किरण खेर यांना यासाठी क्रेडिट देण्यात आलं आहे. 

या सिनेमाच्या शिरपेचात एक मोठा बहुमान प्राप्त झाला आहे. २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लंडन येथील लिसेस्टर स्क्वेअर या जागी शाहरुख आणि काजोल या दोघांचा डीडीएलजे स्पेशल पुतळा बनवला जाणार आहे.

‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ हा बॉलिवुडचा पहिला सिनेमा आहे ज्याचा लंडन येथे असा पुतळा बनवला जाणार आहे. 

बरोबर २५ वर्षांपूर्वी राज – सिमरन प्रेक्षकांच्या भेटीला आले. आणि आजही या दोघांना कोणीही विसरलेलं नाही. २५ वर्षांमध्ये कोणताही बडा सिनेमा असो, मराठा मंदिर सिनेमागृहात दररोज सकाळी ११.३० वाजता डीडीएलजे चा मॅटीनी शो असतो.

भारतीय सिनेमातील एका सिनेमाला दिलेला हा मोठा सन्मान म्हणता येईल. २५ वर्ष झाली, तरीही हा राज मात्र ‘पलट पलट’ म्हणाल्यावर मागे वळून सुंदर हसणारी, ट्रेन सुरु झाल्यावर हात पकडून ट्रेनमध्ये त्याच्यासोबत दूरवर प्रवास करणाऱ्या सिमरनच्या शोधात आहे. असो !

  •  भिडू देवेंद्र जाधव 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.