एक शून्य शून्य सीरियलमुळे बॉलिवूडला गेंडास्वामी सारखा तगडा व्हिलन मिळाला…

तिरंगा नावाचा सिनेमा आला होता आणि तो इतका चालला होता की या सिनेमातले सगळेच हिरो, व्हीलन लोकांच्या लक्षात राहिले. नाना, राजकुमार यांचे डायलॉग तर भरपूर गाजले. देशभक्तीच्या सिनेमात पहिल्यांदा इतकं वाढीव दाखवण्यात आलं होतं. हिरो लोकांच्या साहजिकच लक्षात राहतो कारण तो हिरो असतो. पोरगी मिळते, पैसा मिळतो, हवा होते पण व्हीलन क्वचितच लक्षात राहतात.

तिरंगा मधला गेंडास्वामी हा व्हीलन भल्या भल्याना धडकी भरवून गेला. हा प्रलयनाथ गेंडास्वामी साकारला होता दीपक शिर्के यांनी. अंगाने बळकट,बलदंड आणि समोर कोणताही हिरो येऊ त्याला सहज लोळवतील अशी दीपक शिर्के यांची देहयष्टी सोबतीला खर्जातला आवाज हा सगळा कॉम्बो बॉलिवूड व्हीलनसाठी परफेक्ट होता.

पण बॉलिवूडमध्ये दीपक शिर्के कसे गेले याला कारणीभूत होती ती मराठी सिरीयल एक शून्य शून्य.

दीपक शिर्के यांच्याबद्दल लोकांना बरीच उत्सुकता असते म्हणजे फक्त मराठीच नाही तर हिंदी ऑडियंस सुध्दा त्यांचा मोठा आहे. आता जरा डीटेलमध्ये जाऊ आणि दीपक शिर्के यांचा अभिनय प्रवास पाहू. मुंबई मरीन लाइन्स मध्ये दिपक शिर्केंचा जन्म झाला.

लहानपणी दीपक शिर्के यांनी आपण पोलीस अधिकारी व्हायचं ठरवलं होतं. शाळेमागे असलेल्या रंग भवन थिएटरमुळे त्यांना ॲक्टिंगचा नाद लागला. तिथं रिहर्सल करणारे कलाकार पाहून दीपक शिर्के यांच्या मनात अभिनयाबद्दल असलेली इच्छा चाळवली गेली.

तिथून पोलीस अधिकारी व्हायचं होतं ते बाजूला राहिलं आणि अभिनयाकडे दिपक शिर्के वळले. पण ॲक्टर व्हायचय की पोलीस या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आपोआप पूर्ण झाल्या.

१९७६ साली पहिलं नाटक दीपक शिर्के यांनी केलं ते होतं राज मुकुट. नाटकाचा नाद लई बाद म्हणतात ते उगीच नाही सेम तसच झालं दीपक शिर्के यांच्या बाबत. महाराष्ट्रातील एकही थेटर नसेल जिथं दीपक शिर्के यांनी परफॉर्म केलं नसेल. नाटकाच्या गराड्यात असताना पहिला सिनेमा त्यांना मिळाला तो म्हणजे धडाकेबाज. 

महेश कोठारे यांनी तर नवनवीन कन्सेप्ट आणून धुरळा उडवून दिला होता. महेश नेमाने, लक्ष्यामामा आणि बाप्पा अर्थात दिपक शिर्के या त्रिकुटाने हा धडाकेबाज सिनेमा सुपरहिट केला. बेर्डे आणि दीपक शिर्के यांची जुगलबंदी लोकांना पोटभर हसवून गेली. अनेकांना विश्वास बसणार नाही पण धडाकेबाज हा दीपक शिर्के यांचा पहिलाच सिनेमा होता.

मग आलं १९८६-८७ गोल्डन इअर. प्रोफेशनल अभिनेता म्हणून दीपक शिर्के यांची वर्णी लागली ती एक शून्य शून्य या मालिकेत. सिरीयल रिजनल जरी असली तरी पाहणारी पब्लिक मोठ्या प्रमाणात होती. या मालिकेत दिपक शिर्के यांना पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मिळाली आणि त्यांचं लहानपणीच स्वप्नही पूर्ण झालं.

गोविंद निहलानी यांच्या आक्रोश या सिनेमात दीपक शिर्के यांना काम मिळालं.

एकदा तर मुंबईच्या सावरकर रोडवर एक शून्य शून्य या मालिकेच शूटिंग सुरू होतं. यश जोहर हे तिथून जात असताना त्यांना दिपक शिर्के दिसले आणि अग्निपथ सिनेमात त्यांची वर्णी लागली.

अमिताभ बच्चन सोबत काम म्हणजे विषय खोल. अग्निपथ सिनेमात अण्णा शेट्टी कोण विसरू शकेल. रोल छोटा होता पण भारतभर प्रसिद्ध करून गेला.

पुढे मेहुल कुमार यांचा एक दिवस अचानक मेसेज आला की तिरंगा नावाचा सिनेमा बनवत आहे तुम्हाला आवडेल का काम करायला. दीपक शिर्के यांनी होकार कळवला पण नंतर त्यांना कळलं की आपल्या समोर राजकुमार आहे त्यामुळे ते थोडे घाबरले पण तिरंगा मधील काम पाहून खुद्द राजकुमार यांनी दीपक शिर्के यांचं कौतुक केलं होतं.

प्रलयनाथ गेंडास्वामी काय साकारला आहे हे सिनेमा बघूनच कळत. घोड्यावर हेल्मेट घालून आलेला सीन तर कायच्या काय आहे. पण तो दीपक शिर्के यांचा बॉडी डबल होता. २००७ साली आलेल्या एक चालीस की लास्ट लोकल यात त्यांनी केलेला गँगस्टर वाखणण्याजोगा आहे. फेरारी की सवारी मधील मामा सुद्धा दीपक शिर्के यांनी उत्तम साकारलेला आहे.

पण मग एवढे भारी काम करणारे दीपक शिर्के आता कुठे आहेत हा प्रश्न कायम असतोच. पण दिपक शिर्के यांनी आताच्या काळात बरीच कामं केली त्यात पांडू, बोला अलख निरंजन, ब्लॅक मार्केट यांचा समावेश आहे. झपाटलेला २ मध्येसुधा ते होते.

दिपक शिर्के गेंडास्वामी आणि धडाकेबाज मधील बाप्पा म्हणून कायम लक्षात राहतात. लवकरच त्यांनी एखादी वेगळी भूमिका घेऊन प्रेक्षकांना तीच नॉस्टॅल्जियावाली फिलिंग द्यावी….

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.