इतक्या मेहनतीने ७ लाखांची खंडणी ब्रिटिशांनी गोळा केली आणि खाजा नाईकांनी ती लुटून नेली….

१७ नोव्हेंबर १८५७ चा दिवस होता.

जांभळी चौकात सामसूम होती. इतकी शांतता होती की कोणाची तरी मृत्यू झाला असावा. ब्रिटिशांनी भारतीय जनतेकडून जबरदस्ती करून खंडणी वसूल केली होती. या वसुलीच्या बदल्यात भारताच्या गोरगरीब जनतेने ब्रिटिशांना शिव्यांच्या लाखोल्या वाहायच्या सोडून दुसरं काहीच केलं नव्हतं.

एव्हढी जबर रक्कम त्या चौकातून ब्रिटिश सैनिक घेऊन जात होते.

आता कोणी विरोध करण्याच्या लायकीच राहिलं नाही म्हणून ब्रिटिश सैनिक निवांत खजिना घेऊन जात होते. पण ही सगळी एका वादळापूर्वीची शांतता होती आणि नंतर येणार होतं तुफान. असं तुफान ज्याने ब्रिटिश साम्राज्याच्या बत्त्या गुल केल्या आणि असा काही दणका ब्रिटिश लोकांना दिला की ब्रिटिशांनी याची स्वप्नातही कल्पना केली नसेल.

दुपार झाली, वाहतूक सुरूच होती तोच खाजा नाईक यांनी एंट्री केली थोडेथोडके नाही तर तब्बल ३०० भिल्ल सैनिक घेऊन. ते रापलेले आणि अंगाने बळकट असणारे जिद्दी भिल्ल बघूनच ब्रिटिश सैनिकांनी पायाखालची जमीनच सरकली.

खाजा नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे ३०० सैनिक ब्रिटिशांना झुंज देऊ लागले.

भिल्लांकडे इतकी पुरेशी शस्त्रे नव्हती पण त्यांचा औरा आणि खाजा नाईक यांची सिंहाची गर्जना ऐकून सशस्त्र असलेले ब्रिटिश सैनिक जागीच थबकले आणि त्यांनी शस्त्रे खाली टाकली. एकही सैनिक खाजा नाईक यांना विरोध करायला पुढे आला नाही.

इतकी दहशत खाजा नाईक यांची होती. खाजा नाईक यांनी आपल्या सैनिकांना आदेश दिला आणि खंडणीचा तो सगळा पैसा लुटला. या खजिन्याची किंमत होती सात लाख रुपये. तेव्हाचे सात लाख म्हणजे आत्ताचे किती करा हिशोब.

आता एवढ्यावर थांबेल ते खाजा नाईक कसले त्यांनी ती 7 लाखांची खंडणी तर लुटलीच पण जाता जाता त्यांना ब्रिटिशांचं आलिशान ऑफिस दिसलं. त्यांनी त्याला पण लुटलं आणि पार बेचिराख करून टाकलं. शिरपूर सेंधवा घाटातून इंग्रजांनी गोळा केलेली ही खंडणी आणि सोबतच मुंबई आणि दिल्लीतल्या काही व्यापारी मंडळींचा मोठा ऐवज या लुटीत खाजा नाईक यांनी गायब केला.

एवढं मोठं नुकसान ब्रिटिशांच कोणी केलेलं नव्हतं. थेट ब्रिटिश साम्राज्याला सुरुंग लावण्याच काम खाजा नाईकांनी केलं.

खाजा नाईक कोण होते ?

तर खाजा नाईक यांचं मूळ नाव होतं काजेसिंग नायक. पुढे अपभ्रंश होऊन खाजा नाईक असं झालं. सांगवी पळासणेर भागात एका पाड्यावर त्यांचा जन्म झाला. वडील गुमानसिंग ब्रिटिशांच्या संरक्षण खात्यात अधिकारी म्हणून काम करत होते. वडिलांचा प्रामाणिकपणा बघून ब्रिटिशांनी त्यांच्या मुलाला म्हणजे खाजा नाईक यांना सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरी दिली.

पण एका लुटीत लुटारुला खाजा सिंग यांनी पकडलं आणि त्याला इतका बेदम तुडवला की तो लुटारू मेला आणि या गुन्हाची शिक्षा म्हणून खाजा नाईक यांना ब्रिटिशांनी दहा वर्षांची शिक्षा सुनावली.

खाजा नाईक यांना अटक झाल्याचं कळताच भिल्ल तरुणांनी ब्रिटिशांना जेरीस आणलं. खानदेशात भिल्ल तरुणांनी ब्रिटिशांना अद्दल घडवली. मग ब्रिटिश लोकांना कळलं की खाजा नाईक यांना सोडलं तर हे प्रकरण थांबेल. 

म्हणून ५ वर्षांची शिक्षा भोगून खाजा नाईक बाहेर आले. ब्रिटिशांनी त्यांना नोकरीच आमिष दाखवल पण जेलमध्ये झालेल्या अत्यााचारा विरोधात त्यांनी बंड पुकारले. भिल्ल तरुण गोळा केले. ब्रिटिशांना मदत करणाऱ्या सावकार लोकांच्या घरांवर दरोडे टाकायला सुरुवात केली. वैतागलेल्या ब्रिटिशांनी २ हजार रुपयांचं बक्षीस खाजा नाईकांवर ठेवलं.

ऐतिहासिक आंबापाणीची लढाई काय होती ?

११ एप्रिल १८५८ चा दिवस होता. मध्यप्रदेशातील शिरपूरजवळच्या आंबापाणी जंगलात खाजा नाईक आले असल्याची बातमी ब्रिटिशांना मिळाली. ब्रिटिशांनी जंगलात हल्ला चढवला. या हल्ल्यात भिल्ल महिला सुद्धा हिरीरीने सहभाग घेणाऱ्या होत्या. महिला व पुरुष दोघांनी ब्रिटीशांची हाल केले. गोफण, तिरकमान, तलवार अशा पारंपरिक शस्त्रांनी ब्रिटिशांना त्यांनी झुंज दिली.

खाजा नाईक ब्रिटिशांना कापत कापत सुखरूप बाहेर पडले आणि ६५ भिल्ल यात मरण पावले. जे भिल्ल सैनिक सापडले त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. ४०० महिलांनी या लढ्यात सहभाग घेतला होता. हा लढा इतिहासात अमर झाला.

आपुलकी करते दगाबाजी…

१८६० पर्यंत खाजा नाईक ब्रिटिशांना छळत होते. पण कधी काळी खाजा नाईक यांचा विश्वासातला माणूस रोहिद्दिन मक्रानी दोन हजार रुपयांच्या लालसेपोटी फितूर झाला. खाजा नाईक जंगलात अंघोळीला गेले असताना मक्रानी याने नाईक यांच्या पाठीत गोळ्या झाडल्या. नाईक यांचं शिर धरणगावच्या मुख्य चौकातील लिंबाच्या झाडाला सात दिवस लटकावून ठेवण्यात आलं.

आजही अनेक लोकं अंबापाणीला नाईक यांना आदरांजली वाहण्यासाठी जातात.

खाजा नाईक यांच्या सोबत असलेले भीमा नाईक हे सुध्दा पराक्रमी होते. पण स्वकियानी केलेल्या दगाबाजीमुळे खाजा नाईक मारले गेले पण त्यांनी केलेली सात लाखांची लूट ही ब्रिटिशांविरुद्धची सगळयात मोठी लूट मानली जाते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.