महात्मा गांधींना अमेरिका देऊ इच्छित असलेला सर्वोच्च नागरिक सन्मान भारतासाठी खास आहे…

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी या नावाचं वलय आहे. अहिंसेचा प्रचार-प्रसार करून महात्मा गांधी जगभरात पोहचले. परदेशात सुद्धा महात्मा गांधी यांच्या नावाची किती चर्चा असते याच ताज उदाहरण म्हणजे आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या संसदेमध्ये सर्वोच्च नागरिक पदाचा सन्मान अर्थात कांग्रेसनल गोल्ड मेडल मरणोत्तर महात्मा गांधी यांना देण्यात यावा म्हणून प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

अमेरिकेमध्ये महात्मा गांधींना हा सन्मान मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अमेरिकेच्या संसद भवनाने शांती आणि अहिंसेचा पुरस्कार आणि प्रचार प्रसार करण्यासाठी महात्मा गांधींना सन्मानित करण्यासाठी दुसऱ्यांदा हा प्रस्ताव मांडला आहे जर हा प्रस्ताव यशस्वी झाला तर महात्मा गांधी अमेरिकेच्या संसदेचं सुवर्ण पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय ठरतील.

न्यूयॉर्कमधून काँग्रेसच्या सदस्य कॅरोलिन बी मॅलोनी यांनी संसदेत हा प्रस्ताव मांडला आणि यात सांगितलं कि,

महात्मा गांधींच्या ऐतिहासिक सत्याग्रह, अहिंसेचं धोरण यातून लोकांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. महात्मा गांधींचं कार्य हे कायम दुसऱ्याची सेवा करण्यासाठी प्रेरित करतं.

महात्मा गांधींच्या प्रेरणेतूनच मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी सचेत असं कार्य केलं ज्यामुळे मोठा बदल जगभरात घडला.

गांधीजींचा अहिंसेचा मार्ग हा आजवरचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. प्रगती करायची असेल तर सगळ्यांनी महात्मा गांधींच्या या रस्त्यावर चाललंच पाहिजे.

यावेळी दिलेला प्रस्ताव हा काही पहिलाच प्रस्ताव नसून २०१८ साली कॅरोलिन बी मॅलोनी यांनी अगोदरही एक प्रस्ताव मांडला होता. महात्मा गांधींना मरणोत्तर प्रतिष्ठित सर्वोच्च नागरिक पदाचा सन्मान मिळावा म्हणून हे प्रयत्न चालू असल्याचं ते सांगतात.

कॅरोलिन यांचं म्हणणं आहे कि ज्यावेळी संपूर्ण जगभरात गांधीजींची जयंती साजरी केली जाईल तेव्हा हा सन्मान मिळाला तर दुग्धशर्करा योग होईल.

महात्मा गांधीजींचं अहिंसेचं धोरण हे सगळ्यांनीच अंमलात आणलं तर विश्वशांतीसाठी ते प्रेरक ठरेल. हा पुरस्कार मिळवणारे महात्मा गांधीजी हे पहिलेच भारतीय ठरणार आहे, यागोदर जॉर्ज वॉशिंग्टन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर,मदर तेरेसा आणि रोजा पार्क्स या महान व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे.

हा सर्वोच्च नागरिकतेचा सन्मान प्रस्ताव चार अमेरिकन भारतीय आणि सोबतच सहा अमेरिकन अधिकाऱ्यांनी संसदेत मांडला त्यावेळी अनेकांनी अंदाज व्यक्त केला कि अहिंसा आणि जगभर गांधीजींबद्दल लोकांमध्ये असलेला आदर बघता काँग्रेसनल गोल्ड मेडल हे गांधीजींना देणंच योग्य ठरेल. 

दुसऱ्यांदा मांडलेला हा प्रस्ताव आणि त्यावर आता शिक्कामोर्तब होईल का प्रश्न कायम आहे. जवळपास तरी लोकांच्या प्रतिक्रिया बघता हा पुरस्कार महात्मा गांधींना मरणोत्तर म्हणून देण्यात येण्याचं नक्की आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी या नावाचं वजन आपल्याला दिसून येतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.