पंतप्रधानांशी नडणारे अत्रे एकाच व्यक्तीपुढे शांत व्हायचे. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आचार्य अत्रेंची वाणी म्हणजे मुलुखमैदान तोफ. त्यांच्या नावाच्या उच्चाराबरोबर आधी आठवतो तो त्यांचा खास शब्दप्रयोग-‘अशी व्यक्ती / अशी कलाकृती / अशी घटना गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही आणि पुढे दहा हजार वर्षांतही होणार नाही.’ मग आठवते ती त्यांची उंचीपुरी, काहीशी स्थूल, बलदंड अशी मूर्ती, त्यांची झुंजार लेखणी, ओजस्वी पण अनेकदा आक्रमक होणारी वाणी.

साहित्यिक म्हणून अत्रे अफाट होतेच पण एक वक्ता एक राजकारणी म्हणून देखील त्यांचा हात कधी कोणी धरू शकायचा नाही. अत्रे बोलायला लागले कि भले भले गारद व्हायचे. अत्रेंचं शत्रुत्व कोणालाही परवडायच नाही.

त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांशी थेट पंगा घेतला. आपल्या मराठा वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून कित्येकांचे जाहीर वाभाडे काढले. काकासाहेब गाडगीळ, ना सी फडके, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई यांच्याशी त्यांची झालेली भांडणं तर जगप्रसिद्ध आहेत.

नाक शिंकरलेला रुमाल फडकेंच्या समोर धरणे आणि हीच या फडक्याची किंमत असं म्हणणे हे फक्त आचार्य अत्रेचं करू जाणोत. बऱ्याचदा त्यांच्या हजरजबाबीपणाच्या  नावावर देखील अनेक किस्से खपवले जातात. अत्रेंचं व्यक्तिमत्वच इतकं अफाट होतं की आपल्याला त्या विनोदातील अतिशोयोक्ती पटून जाते.

मुख्यमंत्री पंतप्रधानांना देखील न ऐकणारा माणूस फक्त एका माणसापुढे शांत व्हायचा. ते होते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

बाबासाहेबांची आणि अत्रेंची मैत्री खूप जुनी होती. सुरवातीच्या काळात अत्रेंचे काही मुद्द्यांवरून आंबेडकरांशी वैचारिक मतभेद देखील झाले होते. मात्र पुढे जेव्हा ते बाबासाहेबांच्या संपर्कात आले त्यानंतर मात्र त्यांनी आंबेडकरांना आपलं मानलं. हा जिव्हाळा अखेरपर्यंत टिकला. अत्रेंनी एकेठिकाणी लिहून ठेवलं आहे,

‘घटनासमितीत आंबेडकरांनी अखंड भारताच्या पुरस्काराची जी तेजस्वी घोषणा केली त्यावेळी त्यांच्या प्रखर देशभक्तीचे मला दर्शन झाले, व त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटू लागला.’

त्यांची मैत्री इतकी घट्ट होती कि जेव्हा आचार्य अत्रेंनी महात्मा फुले हा सिनेमा बनवला तेव्हा त्याच्या उद्घटनावेळी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सेटवर भेट दिली होती.

आचार्य अत्रे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पंचमहाभूतांपैकी एक होते. मराठी मनांचा महाराष्ट्र जेव्हा घडला तेव्हा त्यात सिंहाचा वाटा आचार्य अत्रेंच्या वाणीचा आणि लेखणीचा होता. या लढ्याची सुरवात करण्याआधी सयुंक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे, एस.एस. जोशी, आचार्य अत्रे वगैरे मंडळी बाबासाहेबांना दिल्लीला निवासस्थानी जाऊन भेटले होते.

मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची रणभुमी होती. या रणभुमीत बौद्ध समाजाची लोकसंख्या लक्षणीय होती. दिल्लीला हादरा बसेल असे आंदोलन मुंबईत करायचे असेल तर कामगारांसह बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा या आंदोलनात उतरणे आवश्यक आहे हे स.म. समितीला ठाऊक होते. कारण शिस्तबद्ध आंबेडकरी कार्यकर्ता हा संगठीत होता शिवाय रस्त्यावरील लढाईसाठी अतिशय महत्वाचा होता.

या भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठींबा दिला होता. ते अत्रेंना व मंडळींना म्हणाले

“माझा शेकाफे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरचे खडका सारखा खंबीर पणे उभा राहील”

त्यानंतर बाबासाहेब मुंबईत परतल्यानंतर राजगृह या बाबासाहेबांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांच्या बैठका पार पडत. एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे यांच्यासह समितीमधील विविध नेतेमंडळी हजर असत.

बाबासाहेबांनी समितीला दिलेला शब्द खरा करून दाखवला. आंबेडकरी नेते, कार्यकते आणि सामान्य जनता मोठ्या प्रमाणात जीवावर उदार होऊन या आंदोलनात उतरली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्राला दिलेला पाठिंबा केवळ ते महाराष्ट्रात, मराठी कुटुंबात जन्माला आले यासाठी नव्हता तर संयुक्त महाराष्ट्राची मागणी न्यायाची होती याचसाठी होता.

एस. एम. जोशी यांच्या ‘मी एस.एम.’ या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ ऐन भरात होती. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली होती. अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी त्यांचे कार्य पोहचले होते. अशातच संयुक्त महाराष्ट्र समितीने निवडणुका लढवण्याचं ठरवलं. समितीची लोकप्रियता पाहता काँग्रेसचा पराभव करून त्यांची सत्ता येऊ देखील शकते असच सगळ्यांना वाटत होतं. जर आपले बहुमत आले तर काय या विषयावरून संयुक्त महाराष्ट्र समिती मध्ये चर्चा सुरु होती. 

एस. एम. आणि अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी काहीतरी मतभेद झाले. दोघेही तुल्यबळ नेते होते. समितीमध्ये त्यांच्या शब्दाला वजन होतं. पण त्यांच्यातच मतभेद झाल्यामुळे निवाडा कोण करणार हा प्रश्न उभा राहिला. 

अखेर हे दोघेही नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले.

एस. एम. यांचे म्हणणे सत्तेत जाऊ नये असे होते, तर अत्रे यांचे म्हणणे सत्तेत राहून लढाई करणे असे होते. अत्रे आणि बाबासाहेब एकमेकांचे अगदी जवळचे होते. आंबेडकरांचं अत्रेंवर प्रचंड प्रेम होतं तरीही त्यांनी एस. एम.जोशी यांच्या बाजूने मत दिले.

बाबासाहेब म्हणाले,

“जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल, तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये.”

बाबासाहेब म्हणाल्यावर अत्र्यांनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे एस. एम. यांना जे म्हणाले जे एस. एम. यांनी नमूद करून ठेवले आहे,

“बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची.”

बाबासाहेबाचे आणि अत्रेंचं प्रेम अगदी अखेरच्या श्वासापर्यंत कायम होतं.  त्यामुळेच आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर चौपाटीवर जमलेल्या अलोट गर्दीसमोर फक्त एकच भाषण झाले. ते अत्रे यांचे होते. त्यानंतर सलग बारा दिवस त्यांनी आंबेडकरांचे विचार व चरित्र सांगणारे अग्रलेख लिहिले, ते ‘दलितांचे बाबा’ या पुस्तकात समाविष्ट आहेत.

हे ही वाच  भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.