२५ वर्षांपूर्वी अतिरेक्यांनी नवऱ्याला मारलं होतं, त्या आता आसामच्या अर्थमंत्री बनल्या आहेत

आसाममध्ये नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा आपलं कमळ फुलविण्यात यशस्वी ठरल. हेमंत बिस्वा सरमा यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. ज्यानंतर मंत्रीमंडळ वाटप करण्यात आले. या दरम्यान आसाममध्ये पहिल्यांदाच अर्थमंत्री पदावर एका महिलेची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्या सरकारमध्ये 5 वेळा गोलाघाटच्या आमदार असलेल्या अजंता निओग यांना वित्त विभागाचा कारभार सोपवला. मागल्या वेळी सर्बानंद सोनोवाल यांच्या सरकारमध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी हे पद सांभाळल होत.

अर्थ मंत्रालयाचा कारभार हातात घेतल्यानंतर निओग म्हणाल्या की,

मुख्यमंत्री सरमा यांनी सोमवारी शपथ घेतल्यानंतर घोषणा केली की येत्या पाच वर्षांत आसामला भारतातील पहिल्या पाच राज्यांपैकी एक बनवायचे आहे. आणि त्या ठरवलेल्या लक्ष्यानूसार काम करतील आणि योजना आखतील. त्या म्हणाल्या की, सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वात आधीच्या सरकारात सरमा अर्थमंत्री होते. त्यांनी आसामच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बरेच काही केलेय.

निओग यांनी माध्यमांना सांगितले की,

“सरमा यांनी वित्त विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आणि राज्याचा महसूल वाढविला. म्हणूनच, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कार्य पुढे नेण्याची माझी जबाबदारी आहे. ”

अर्थमंत्रीपदी निवड झाल्यानंतर निओग म्हणाल्या की, त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचे आभार मानतांना त्या म्हणाल्या की, याबद्दल त्यांचे आभारी आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हेही सांगितले की, कोविड -19 च्या या साथीचे व्यवस्थापन करणे हे त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे.

 46 वर्षीय अजंता निओग यामूळच्या दिसपूर जिल्ह्यातील आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गुवाहाटी विद्यापीठातून कायद्याची पदवी त्यांनी पूर्ण केली.

त्यांचं लग्न नागेन निओग यांच्याशी झालं होतं. नागेन हे काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. गोलाघाट या मतदारसंघातून ते निवडून यायचे. त्यांना हितेन साक्रीया यांच्या मंत्रिमंडळात स्थान देखील मिळालं होतं.

पण दुर्दैवाने ५ मे १९९६ रोजी कोक्राझार येथे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामने म्हणजेच उल्फा या अतिरेकी संघटनेने केलेल्या हल्ल्यात नगेन निओग यांची हत्या झाली. त्यांच्या सोबत पोलीस सुप्रीटेंडेंट आर.के.सिंग हे देखील मारले गेले. आसाममध्ये या अलगाववादी संघटनांचा जोर मोठा होता मात्र थेट एका मंत्र्याची हत्या होणे हि मोठी गोष्ट होती.

नगेन निओग हे आपल्या मतदारांमध्ये लोकप्रिय होते. कित्येकांना त्यांच्या मृत्यूमुळे धक्का बसला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस ला देखील पराभव पत्करावा लागला.

अखेर जनतेच्या मागणीमुळे नगेन निओग यांच्या पत्नी अजन्ता यांना राजकारणात आणण्यात आलं. वैयक्तिक दुःख बाजूला त्या गोलाघाट येथे निवडणुकीला उतरल्या. आपल्या मातीसाठी शहीद झालेल्या नेत्याच्या पत्नीसाठी तिथल्या जनतेमध्ये सहानुभूती होती. २००१ साली तिथे प्रचंड मोठे बहुमत घेऊन त्यांनी विजय मिळवला.

 माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई हे त्यांचे राजकीय गुरु ठरले. त्यांच्याच सरकारमध्ये निओन यांनी सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळले.

आसाममधून 5 वेळा आमदार

अजंता निओग यांनी गोलाघाटातूनच 5 वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. 2001 मध्ये त्यांनी प्रथमच विधानसभा लढविली आणि त्यांच्या विरोधी उमेदवाराला सुमारे 10000 मतांनी पराभूत केले होते. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी गोलाघाटातून निवडणुका जिंकल्या आहेत आणि आतापर्यंत सर्वात जास्त काळ असणाऱ्या आसामच्या महिला आमदार म्हणूनही बहुमान मिळाला आहे.

जवळपास १५ वर्षे आसामचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या तरुण गोगई यांनी २०१६ मध्ये मोदी लाटेत आपली सत्ता गमावली. भाजपचे सर्बानंद सोनोवाल मुख्यमंत्री बनले.

या नापेक्षित सत्तांतरानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला. तरुण गोगई यांच्या एककल्ली कारभाराला कंटाळून अनेक नेत्यांनी भाजपची साथ पकडली. याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अजंता निओग यांना पक्षाने काढून टाकले.

अखेर गेल्यावर्षी डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आसाममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे प्रतिस्पर्धी बिपुपन सैकिया यांना 9,325 मतांच्या फरकाने पराभूत केले.

नवे मुख्यमंत्री हिमांता सरमा यांनी त्यांना अर्थमंत्री केल्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती.

अजंता निओग यांच्या निवडीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करून हे चुकीचे असल्याचे म्हंटले आहे, कारण त्यांच्यामते त्यांना वित्त विभागात फारसा अनुभव नाही.

या टीकाकारांना प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या की, त्यांनी पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागात काम केले आहे आणि यासह त्यांनी वित्त विभागासाठी मूलभूत समज आणि ज्ञान प्राप्त केले आहे. तसेच काम करताना अधिक काही शिकेल याची त्यांना खात्री आहे.

आसाम सारख्या राज्यात अर्थमंत्रालय एका महिलेच्या हाती जाणे हि संपूर्ण देशासाठी महत्वाची घटना आहे. शिवाय हिमंता सरमा यांच्या मंत्रिमंडळात दुसरे स्थान भूषवणाऱ्या निओग यांच्याकडे आत्ताच आसामच्या भावी मुख्यमंत्री म्हणून पाहण्यात येतंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.