सम्राट अकबराच्या लग्नाचा एक घोळ आहे, जोधाबाई म्हणे ख्रिश्चन होती

मुघल सम्राट अकबराच्या बायकोचं नाव काय होत हा सामान्य ज्ञानातला प्रश्न जर आपण एखाद्याला विचारला तर, तो सहजपणे सांगेल जोधाबाई.. अर्रर्रर्रर्र इथंच तर गंडतोय आपला विषय. सगळीच्या सगळीच जोधा अकबर पिक्चर बघून येत्यात अन अकबराची सगळी हिस्ट्री माहित असल्याच्या फुशारक्या मारत्यात. राव पिक्चर हाय त्यो…

तर अकबराच्या बायकोच नाव आहे… ‘मरियम-उल-जमानी’

इतिहासात असं कुठंही आढळत नाही की, राणी जोधाबाई मुघल बादशहा अकबराची महाराणी आणि बादशहा शहाजहानची आई होती. याउलट आशुतोष गोवारीकर यांनी जेव्हा जोधा अकबर हा चित्रपट काढला त्यावेळी राजपूत संघटनांनी जोधाबाई ही सम्राट अकबरची पत्नी नसून सून असल्याचे दावे केले होते. यानंतर बऱ्याच उर्दू इतिहासकारांनी या दाव्याची पुष्टी देखील केली होती.

बशीरुद्दीन अदीम यांनी ३ खंडांत लिहिलेल्या ‘दारुल हुकुमत देहली’ पुस्तकाच्या पहिल्या खंडात ३२९ ते ३३९ या पानांवर सलीम व जोधाबाईच्या लग्नाचे वर्णन दिले आहे, त्यात सलीम, त्याची पत्नी जोधाबाई व दुसरी पत्नी नूरजँहा यांचे तैलचित्रदेखील आहे. हे पुस्तक १९१९ मध्ये प्रसिद्ध झाले होते.  त्यात १६ व्या शतकाचा संपूर्ण इतिहास आहे. त्या पुस्तकातच मुघल बादशहा शहाजहान हा सलीम व जोधाबाई यांचा मुलगा असल्याचे म्हटले आहे.

तसेच पं. नेहरू यांचे ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’, ईश्वरी प्रसाद यांचे ‘न्यू हिस्टरी ऑफ इंडिया’, फ्रेड्रिक ऑगस्टस् यांचे ‘दी एम्पायर अकबर’, ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ (उर्दू ), त्यातही जोधाबाई ही अकबरची पत्नी असल्याचा उल्लेख आढळत नाही.

म्हणजे जोधाबाई ‘मरियम-उल-जमानी’ नव्हती तर मग ‘मरियम-उल-जमानी’ होती तरी कोण?

ही ‘मरियम-उल-जमानी’ जन्माने पोर्तगीज होती आणि तिच नाव डोना मारिया मास्करेन्हास अस होत! असं गोव्याचे एक इतिहासकार सांगतात. ८१ वर्षांचे हे इतिहासकार महाशय लुईस दे असिस कोरिआ यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ‘पोर्तुगीज इंडिया अ‍ॅण्ड मुघल रिलेशन्स १५१०-१७३५’. हे पुस्तक ब्रॉडवे पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलय.

त्यांच्या दाव्यानुसार, अकबराची बायको ही एक पोर्तुगीज स्त्री होती.

मारिया मस्करेन्हास आणि तिची लहान बहीण ज्युलियाना मस्करेन्हास सप्टेंबर १५५८ मध्ये लिस्बनमधून गोव्याकडे निघाल्या होत्या. पोतुर्गीज जहाजांचा ताफा अरबी समुद्रातून जात असताना काही समुद्री डाकूंनी ते जहाज पकडले. त्यावेळचा गुजरातचा सुलतान बहादूरशहा यांच्या सैन्याने जहाजावरील इतरांसोबत डोना मारिया आणि तिची बहिण ज्युलियानाला ताब्यात घेतल. पुढे सुलतान बहादूरशहाने या डोना मारियाला अकबरास भेटीदाखल ‘पेश’ केले.

डोना मारिया मास्करेन्हास अकबराच्या दरबारात आली तेव्हा तिला पाहताच अकबर तिच्या प्रेमात दिवाना झाला. बादशहाने डोना मारिया आणि तिची बहिण ज्युलियानाला आपल्या शाही  जनानखान्यात दाखल केल. आपल्यापैकी एका स्त्रीने अकबराच्या जनानखान्यात राहाव हे पोर्तुगीज व कॅथॉलिक मंडळींच्या पचनी पडणार नव्हत. तर दुसरीकडे, मुघलांशी पंगा घेणाऱ्या कॅथॉलिकपैकी एका स्त्रीने शहेनशहाची बेगम म्हणून मिरवाव, हे मुघलांना पटणार नव्हत. म्हणून ब्रिटिश व मुघल इतिहासकारांनी डोना मारियाला ‘जोधाबाई’ असे नाव देऊन ती राजपूत असल्याचे भासविले.

स्वत: अकबर वा जहांगीर यांच्या काळातील अकबरनामा वा समकालिन लिखाणात जोधाबाईचा उल्लेख आढळत नाही, असही आपले लेखक महाशय म्हणतात.

पुढं कोरिआ इतिहासकारांसाठी काही प्रश्न उपस्थित करतात,

  • जहांगीराने बादशहा झाल्यावर ख्रिश्चन आणि जेजुईट मिशनरींना उदारपणे आश्रय का दिला ? यावरून तो कोणा राजपूत राणीच्या नव्हे, तर पोर्तुगीज महिलेच्या उदरी जन्मला असावा, याचे संकेत मिळतात.
  • आपल्या आठवणी लिहून ठेवणाऱ्या जहांगीराने आपल्या आईचा नावाने उल्लेख करू नये हे विचित्र नाही का ?
  • त्याची आई मुस्लीम किंवा हिंदू उच्चकुलीन नव्हती तर ती एक फिरंगी होती, म्हणून जहांगीराने तिचा उल्लेख मरियम-उल-जमाननी केला असावा का?

कोरिआ पुढं म्हणतात की, कदाचित डोना मारिया मस्कारेन्हास हीच जहांगीरची आई असावी. याच स्त्रीचा मुघलकालीन लिखाणात वरचेवर मरियम-उल-झमानी असा तर कधी जोधाबाई तर कधी हरकाबाई या नावाने उल्लेख आढळतो. मात्र मुघलकालिन बखरींमध्ये मरियम-उल-झमानीचा जहांगीरची आई असा उल्लेख आढळत नाही.

कोरिआ म्हणतात की, अब्द-अल-कादिर, बदाऊनी आणि अबु-अल-फजल या मुगल बखरकारांनी जहांगीरच्या आईचा नावानिशी उल्लेख करू नये हे एक न उलगडलेले कोड आहे.

मुघल राजपुतांशी मैत्री करण्यास उत्सुक होते. स्वत:चा जन्म राजपूत राजघराण्यातील मुलीच्या पोटी झाला असता तर जहांगीराने तरी त्याचा अभिमानाने उल्लेख केला असता. पण तस ही झाल्याचे दिसत नाही.

‘रेमिनिसिसन्स ऑफ आग्रा’ चे लेखक फ्रेडरिक फॅनथोम हे म्हणतात की, आग्रा येथील मरियमच्या थडग्यावर ४ शब्द पण लिहिलेले नाहीत, अगदी कुराण मधले काही श्लोक ही नाहीत. ते पुढ सांगतात की मरियमची कबर बंदिस्त करण्याआधी त्यावर त्या व्यक्तीने क्रॉस पाहिले होते.

असे ढीग लेखक आहेत जे मरियमला मारिया म्हणतात, मारियाला जोधाबाई म्हणतात, जोधाबाईला मरियम म्हणतात. पण अजूनही कोणाला ही अकबरच्या बायकोच कोड उलगडलेलं नाही. तर आता या विषयात आपण काय करू शकत नाय… तब तक के लिये, पॉप कॉर्न खाओ बेला सियाओ..

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.