डावे असो की ममता, आजवर अलपन बंडोपाध्याय बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे फेवरेट अधिकारी राहिलेत..

मागच्या २ दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादात एक तिसरं नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. ते नाव म्हणजे, अलपन बंडोपाध्याय!

त्यांची ओळख सांगायची तर ते राज्यातील सर्वात जेष्ठ माजी सनदी अधिकारी. पण इथवरच त्यांची ओळख संपत नाही, तर इथून सुरु होते. कारण बंडोपाध्याय या एका अधिकाऱ्यासाठीचं ममतांनी थेट मोदींशी पंगा घेतला आणि अख्या दिल्लीला अंगावर घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आली आहे.

मात्र साहजिकच या एका IAS अधिकाऱ्यांसाठी ममतांनी थेट मोदींशी पंगा का घेतला असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

असं नेमकं काय विशेष होतं या अधिकाऱ्यांमध्ये?

हे सगळं कारण समजून घ्यायचं असेल तर आधी हा वाद काय होता हे समजून घेतलं पाहिजे. 

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच आलेल्या चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मे रोजी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थोड्या उशिरा आल्या, पण उपस्थित होत्या. परंतु त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी इतर कार्यक्रमास उपस्थित राहायचे सांगून त्या वादळात झालेल्या नुकसानीचा अहवाल देऊन लगेच बैठकीतून बाहेर पडल्या.

मात्र तिथं हमखास लक्ष वेधून घेतलं ते राज्याचे मुख्य सचिव बंडोपाध्याय यांनी. ते ह्या बैठकीला उपस्थितचं राहिले नाहीत. त्यानंतर यामागचे काय कारण असावं याचीही चर्चा सगळीकडे चालू होती. 

मात्र संध्याकाळ पर्यंत बंडोपाध्याय यांना केंद्र सरकारने बैठकीस उपस्थित न राहिल्याबद्दल कारणे द्या नोटीस पाठवली होती, तसेच पुढच्या ३ दिवसात म्हणजेच ३१ मे पर्यंत केंद्रात रुजू होण्याची सूचना करून त्यांची बदली करण्यात आली.

मात्र त्यानंतर रविवारी ममता बॅनर्जी यांनी ५ पानांचं एक पत्र लिहून बंडोपाध्याय यांना रिलीज करण्यासाठी केंद्राला नकार कळवला. मात्र त्यानंतर देखील राज्य सरकारला आणखी एक पत्र पाठवून पूर्वीच्या आदेशांप्रमाणे दिल्लीत हजर राहण्यास सांगण्यात आलं.

परंतु बंडोपाध्याय यांनी या पत्रानंतर लगेचच मुख्य सचिवपदाचा राजीनामा दिला, आणि निवृत्त झाल्याची घोषणा देखील केली. परंतु बंडोपाध्याय हे असंही वयोमर्यादेनुसार ३० मे रोजी निवृत्त होणार होतेच. 

मात्र हे सगळा नाट्य इथंच थांबलं नाही, ताबडतोब ममता बॅनर्जी यांनी बंडोपाध्याय यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नेमणूकही केली. या नियुक्तीनंतर ममता म्हणाल्या, त्यांच्या हिम्मतीचा आम्ही सन्मान करत आहोत, त्यांनी दबावात न झुकता, राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. भविष्यात बंगालच्या हितासाठी त्यांची सेवा गरजेची आहे. 

आता मुख्य प्रश्न असा कि एक IAS अधिकारी ममतांसाठी एवढा महत्वाचा का? 

मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या अलपन बंडोपाध्याय यांची थोडक्यात ओळख बघायची झाल्यास त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात आनंद बाझार पत्रिका अर्थात abp समूहातून एक पत्रकार म्हणून केली होती. त्यानंतर ते १९८७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना होम केडर मिळालं.

पुढच्या काही काळात ते त्यांच्या कार्यपद्धतीमुळे संपूर्ण बंगालमध्ये चर्चेत असायचे. २००० सालानंतर तर ते तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे खास मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. एवढे मर्जीतील कि भट्टाचार्य यांनी त्यांना ज्युनिअर असून देखील कोलकात्याच्या महापालिकची सूत्र सोपवली. 

त्यानंतर आता ते ममता बॅनर्जीचे यांचे देखील खास मर्जीतील अधिकारी बनले आहेत. त्यामुळेच २०१९ ते २०२१ या अवघ्या २ वर्षाच्या कालावधीत ममतांनी त्यांना लघु उद्योगाच्या सचिव पदापासून राज्याच्या मुख्य सचिव पदापर्यंत आणलं. त्या बऱ्याचदा अलपन यांच्या प्रशासकीय कामाचे कौतुक करत असतात.

यामागची काही कारण शोधल्यास कोलकात्यामध्ये निकाल लागल्यापासून असं म्हंटलं की ममता बॅनर्जी आताची जी निवडणूक जिंकू शकल्या त्यामागे दोन व्यक्ती होत्या. एक म्हणजे राजकीय रणनीतीकरण प्रशांत किशोर आणि दुसरी व्यक्ती म्हणजे राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय.

बंडोपाध्याय यांच्याच ‘द्वारे सरकार अर्थात सरकार आपल्या दारावर’ अशा योजनांमुळे ममताच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला असं मानलं जातं.

ममता बॅनर्जी यांचा बंडोपाध्याय यांच्यावर इतका विश्वास आहे कि, मागच्या २ वर्षांच्या काळामध्ये संकटग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ज्या काही समित्या गठीत केल्या गेल्या त्यातील प्रत्येक समितीमध्ये त्यांच्या समावेश होता. अगदी अम्फान वादळापासून ते कोरोना वादळापर्यंत.

एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी ज्यांना कधी काळी बंदोपाध्याय रिपोर्ट करायचे ते एका हिंदी माध्यमाशी बोलताना या सगळ्या मागचे कारण सांगतात. ते म्हणतात, 

अधिकारी का स्वभाव उन्हें सबका प्रिय बना देता है.

ते पुढे सांगतात, अलपनचा समावेश नोकरशाहीतील त्या काही विशेष लोकांच्या यादीत होतो, जे कोणतीही राजकीय व्यवस्था बदलली कि आपली निष्ठा अगदी सहज बदलतात. ते कोणत्याही सिस्टीममध्ये काम करण्यासाठी स्वतःला ऍडजस्ट करून घेतात. काही तणाव निर्माण होऊन देत नाहीत, उलट अत्यंत सोप्या पद्धतीने काम करतात.

ते कधीही आपल्या राजकीय बॉससोबत नियम आणि वैधता यावर भांडत बसत नाहीत, ते तेच काम करतात जे सरकारला अपेक्षित आहे.

राज्यातील दुसरे एक वरिष्ठ अधिकारी एका हिंदी माध्यमाशी बोलताना सांगतात,

बंडोपाध्याय आणि राजीव सिन्हा या अधिकाऱ्यांनी मागच्या काही वर्षात स्वतःला सवय लावून घेतली होती कि, कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना भाषणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाने करायची.

ममता बॅनर्जी यांना देखील पंतप्रधान मोदींसारखी प्रत्येक वेळी कोणीतरी आपलं कौतुक करणं हि गोष्ट आवडते. पण हि गोष्ट तेव्हा जास्त भावते जेव्हा हे कौतुक नोकरशाही कडून होतं असते. कारण पक्षातील नेते, कार्यकर्ते हि गोष्ट करणार हे अपेक्षितच असते.

मात्र नोकरशाहीतील अधिकारी ज्यांना तटस्थ आणि उच्च शिक्षित समजलं जातं ते जेव्हा असं कौतुक करतात तेव्हा त्याकडे अधिक गांभीर्यानं बघितलं जातं. अलपन बंडोपाध्याय हीच गोष्ट अत्यंत चांगल्या प्रकारे मॅनेज करायचे.

जेव्हा हा सगळा वाद सुरु होता तेव्हा अलपन यांच्या सोबत काम केलेले शुभेन्दू अधिकारी यांनी देखील एक प्रतिक्रीया दिली होती. ती देखील लक्ष वेधून घेणारी होती. ते म्हणतात, 

या सगळ्या वादात त्यांची काहीही चूक नाही. मी परिवहन मंत्री म्हणून त्यांच्यासोबत काम केलं आहे. ते तेच काम करतात जे त्यांना सांगितलं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.