भारतातील ई-कॉमर्स वाढत असतांना ॲमेझॉन मात्र गंडत चाललंय

जगभर ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी ॲमेझॉन जेव्हा भारत आली तेव्हा अनेकांनी याला विरोध केला होता. ई-कॉमर्समुळे भारतातील किरकोळ व्यवसाय ठप्प होईल असं भाकीत वर्तवण्यात येत होतं. मात्र जून २०१३ मध्ये ॲमेझॉनने भारतात एंट्री केली आणि भारतात ई-कॉमर्समध्ये चांगला जम बसवला. 

सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, भारतात सुद्धा ॲमेझॉनला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ॲमेझॉनमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं समोर आलंय. 

नोव्हेंबर २०२२ मध्ये ॲमेझॉनने जगभरात १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०२३ पर्यंत कॉन्ट्रॅक्ट असलेली अनेक पद रद्द केली जात आहेत, तर बाकी कर्मचाऱ्यांवर नोकरी सोडण्याचा दबाव टाकला जात आहे. 

सोबतच फूड डिलिव्हरी आणि ई-लर्निंग व्यवसाय बंद केल्यानंतर आता होलसेल व्यापार सुद्धा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. 

भारताच्या म्हैसूर, हुबळी आणि बंगलोर शहरात छोटे व्यावसायिक, फार्मसी आणि डिपार्टमेंटल स्टोर्सला डिस्ट्रिब्युशन सुविधा देणारा हा व्यवसाय संपूर्ण भारतभर विस्तारण्याचा प्लॅन कंपनीने बनवला होता. मात्र २९ नोव्हेंबरला कंपनीने घोषणा केलीय की, टप्प्या टप्प्याने हा व्यवसाय देखील बंद केला जाणार आहे.

हळूहळू ॲमेझॉनकडून घेतल्या जाणाऱ्या व्यवसाय कपातीच्या निर्णयांमुळे कंपनी स्वतःचा व्यवसाय कमी का करत आहे असा प्रश्न पडतो. हे समजून घेण्यासाठी आधी २०१३ पासून आजपर्यंत ॲमेझॉनचा व्यवसाय आणि तिचे स्पर्धक कंपन्यांमध्ये कसे बदल होत गेले ते बघावं लागेल. 

इतर अमेरिकन कंपन्यांप्रमाणे ॲमेझॉनची देखील भारतात सुरुवात झाली पण कंपनीला नफ्याच्या जागी तोटाच सहन करावा लागला.

जून २०१३ मध्ये भारतात व्यवसाय सुरु करणाऱ्या ॲमेझॉनच्या ऑनलाईन विक्रीचं व्यासपीठ मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने विस्तारायला लागलं. मात्र सुरुवातीपासूनच ॲमेझॉन तोटा सहन करत आहे. पहिल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०१३-१४ मध्ये कंपनीला फक्त १६९ रुपयांचा महसूल मिळाला होता तर ३२१ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. 

२०१४-१५ च्या आर्थिक वर्षात कंपनीच्या ऑनलाईन विक्रीत ६ पटीने वाढ झाली. परंतु या विक्रीचं नफ्यात काही रूपांतरण होऊ शकलं नाही. वर्षभरात कंपनीला फक्त १,०२२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला मात्र १,७२४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. मात्र २०२२ उजाडताना अमेझॉनच्या वेगवगेळ्या सेवा आणखी विस्तारल्या आणि नुकसान कमी व्हायला लागलं होतं. 

ॲमेझॉन मार्केटप्लेस, ॲमेझॉन इंटरनेट, ॲमेझॉन होलसेल, ॲमेझॉन डाटा, ॲमेझॉन पे आणि ॲमेझॉन रिटेल या सहाही सेवांमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात बरीच वाढ झाली. २०२१ च्या तुलनेत ३१ टक्क्यांची वाढ होऊन कंपनीला ४२ हजार २६० कोटी कोटी रुपयांचा महसूल मिळाला तर ६ हजार ७३४ कोटी रुपयाचं नुकसान झालं होतं. 

हळूहळू व्यवसाय वाढत असतांना अचानक कंपनीने स्वतःच्या ३ शाखा बंद करण्याचा निर्णय का घेतला? 

तर यामागे काही मुख्य कारणं आहेत, ज्यात जागतिक मंदीची परिस्थिती, भारतात वाढलेले स्पर्धक, भारत सरकारचे नियम हे कारणीभूत मानले जात आहेत. 

जगभरासह भारतात लॉकडाऊन लागलेलं असतांना ॲमेझॉनने सुद्धा ई-लर्निंग मध्ये पाऊल ठेवलं. 

ज्यात डिसेंबर २०१९ मध्ये ॲमेझॉन अकादमीला सुरुवात करण्यात आली. परंतु भारतात आधीपासूनच असलेल्या बायजू आणि अनअकॅडमी या दोन कंपन्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाहीये. त्यामुळे सध्या सुरु आहे ती बॅच संपवून ऑगस्ट २०२३ पासून ॲमेझॉन अकादमी बंद करण्याचा निर्णय कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतला. 

त्यानंतर नंबर लागतो तो ॲमेझॉन फूडचा.

ई-लर्निंग सोबतच ॲमेझॉनने मे २०२० मध्ये बंगलोर शहरात ऑनलाईन फूड डिलिव्हरीची सेवा सुरु केली होती. परंतु भारतात स्वीगी आणि झोमॅटो या कंपन्यांची तगडी स्पर्धा असल्यामुळे ॲमेझॉनला यातही जॅम बसवता आला नाही. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीने भारतात ऑनलाईन फूड डिलिव्हरीची सुविधा सुद्धा बंद करत असल्याची घोषणा केलीय. 

परंतु ॲमेझॉन फक्त इथपर्यंतच मर्यादित नाहीयेत, कंपनीपुढे भारतात आणखी अनेक समस्या आणि स्पर्धक आहेत. 

मार्केट रिसर्च करणारी अमेरिकन संस्था एलायन्स बर्नस्टीनच्या अभ्यासानुसार, भारतातील ई-कॉमर्स बाजार ७२ अब्ज डॉलरने वाढून २०२५ पर्यंत १३३ अब्ज डॉलर म्हणजेच १० लाख ८७ हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. परंतु ही वाढ भरतील मोठ्या शहरांच्या जागी लहान शहरं आणि खेड्यांमध्ये होणार आहे. 

मात्र भारताच्या मोठ्या शहरांमध्येच ॲमेझॉनला तगड्या स्पर्धकांकडून स्पर्धेचं सामना करावा लागत आहे, यात वॉलमार्टची मालकी असलेली फ्लिपकार्ट, रिलायन्स रिटेल आणि नुकतीच सुरु झालेली मिशो यांचा समावेश आहे. 

रिलायन्स रिटेलने १५ हजारांपेक्षा अधिक रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून किराणा आणि इतर वस्तूंच्या विक्रीमध्ये स्वतःचं स्थान एकदम मजबूत केलंय. तर फ्लिपकार्टने कपड्यांच्या क्षेत्रात स्वतःची जागा निश्चित केलीय आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. तर ५ अब्ज डॉलर जिएमव्ही असलेली मिशो भारताच्या टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये झपाट्याने वाढत आहे असं एलायन्स बर्नस्टीनच्या अभ्यासात समोर आलंय.

परंतु ॲमेझॉनची समस्या निव्वळ या स्पर्धक कंपन्यापूरती देखील मर्यादित नाही.  

भारतातील नामांकित कंपनी टाटा सुद्धा ई-कॉमर्स क्षेत्रात उतरत आहे. तसेच केंद्र सरकारने ई-कॉमर्सवर लक्ष ठेवण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ही कंपनी स्थापन केली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये स्थापन झालेली कंपनी फेजनुसार विकसित होत आहे.

भारतीय कायद्यानुसार ई-कॉमर्समधील कोणतीही परदेशी कंपनी एकूण व्यापाराच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त भाग स्वतःच्या ताब्यात ठेऊ शकत नाही. त्यामुळे ॲमेझॉनच्या विस्तारावर सुद्धा आपोआप काही मर्यादा येतात. तर भारतात रिटेल व्यवसाय करतांना किराणा आणि इतर वस्तूंची विक्री ही विक्रेत्यांच्या साखळीवर आणि वस्तूंच्या पुरवठ्यावर अवलंबून असते त्यामुळे ॲमेझॉन रिलायन्स रिटेलला टक्कर देऊ शकत नाही. त्यामुळे जगातील इतर कंपन्यांमध्ये चाललेली कर्मचारी कपात आणि मंदीच्या भाकितामुळे ॲमेझॉनने सुद्धा भारतात तोट्यात जाणाऱ्या सेवा बंद केल्या असं विश्लेषक सांगतात. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.