नातवंडांच्या खुशीत अंबानी गाडी, बंगले, कपडे-लत्ते दान करण्यापेक्षा फक्त सोनंच का दान करत आहेत ?

श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने १९ डिसेंबर रोजी जुळ्या बाळांना जन्म दिला. अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात जन्माला आलेल्या या जुळ्या बाळांना घेऊन ईशा अंबानी आज भारतात परतल्या आहेत. ईशा अंबानी आणि त्यांच्या बाळांना अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी कतारच्या राजाने विशेष विमान दिलं असं सांगितलं जात आहे.

आदिया आणि कृष्णा या दोन्ही जुळ्या बाळांच्या स्वागतासाठी अंबानी आणि परिमल कुटुंबाने जोरदार तयारी केलीय. उद्या अंटिलियामध्ये एका पूजेचं आयोजन करण्यात आलं असून देशातील प्रसिद्ध मंदिरातील प्रसाद मागवण्यात आला आहे. तसेच अंटिलियामध्ये देखील वेगवगेळे शेफ प्रसाद बनवणार आहेत.

या पूजेच्या वेळेस मुकेश अंबानी तब्बल ३०० किलो सोनं दान करणार आहेत.

ही बातमी ऐकून पहिल्या क्षणी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरी, दुसऱ्याच क्षणाला डोळ्यासमोर अंबानींची संपत्ती आठवली असेल. अंबानी आहेत ते ३०० किलो सोनं म्हणजे सुटे पैसे आहेत त्यांच्यापुढे ! असं काहीसं मनात आलं असेल. मात्र नातवंडांच्या आनंदात मुकेश अंबानी गाडी, बंगले, हिरे, मोती, कपडे-लत्ते गोष्टी दान करण्याऐवजी फक्त सोनंच का दान करत आहेत ?

तर या प्रश्नाचं उत्तर हिंदू धर्मशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या आख्यायिकांमध्ये दडलेलं आहे. 

हिंदू धर्मातील १८ ही पुराणांमध्ये दानधर्म करण्याचे वेगवेगळे काळ सांगण्यात आले आहेत. तसेच वेगेवगेळ्या तिथीनुसार वेगवगेळ्या वस्तूंच्या दानाचं महत्व सांगण्यात आलं आहे. ज्याप्रकाराने दान करण्याच्या वस्तू आणि तिथी वेगवगेळ्या आहेत त्याचप्रमाणे दानातून मिळणारं फळ देखील वेगवेगळं असतं असं सांगितलं जातं.

आख्यायिकांनुसार सप्ताहाच्या सात दिवसांमध्ये दररोज दान करायच्या वस्तू वेगवगेळ्या असतात.

यात सोमवारी दूध, तांदूळ आणि साखरेचं दान करणे, मंगळवारी लाल फळ, लाल कपडे आणि हरभरे दान करणे, शुक्रवारी खीर दान करणे आणि शनिवारी काळ्या रंगाचे धान्य आणि वस्तूंचं दान करण्यात यावं असं सांगितलं जातं. तर दररोज गाईला पोळी, चणे आणि गुळ खाऊ घालण्याचे नियम सांगितले जातात.

शुक्ल यजुर्वेदातील बृहदारण्यक उपनिषिदांमध्ये सांगण्यात आलेल्या आख्यायिकेनुसार, ब्रह्मादेवाने मानवासाठी द अक्षर सांगितलं होतं. तेव्हा त्या अक्षराचा अर्थ माणसाने दान करणे असा सांगितलं होतं. यावर ब्रह्मदेवाने माणसाचं कौतुक केलं आणि शब्दाचा योग्य अर्थ समाजाला असं सांगितलं होतं. दानाबाबत सांगतांना असं म्हटलं जातं की, लाज, श्रद्धा किंवा भीतीया कोणत्याही भावनेने दान केलं तरी त्याचं फळ मिळतं.

स्कंद पुराणातील प्रभासखंडात वेगवगेळ्या गोष्टींच्या महादानाचं महत्व सांगण्यात आलं आहे.

गाय, सोनं, चांदी, रत्न, विद्या, तीळ, कन्या, हत्ती, घोडे, झोपण्यासाठी वस्तू, कपडे, जमीन, अन्न, दूध, छत्री, गरजेच्या वस्तू आणि घराचं दान करण्याबद्दल सांगितलं आहे. तर अग्निपुराणानुसार सोनं, घोडे, तिळ, हत्ती, रथ, जमीन, घर, मुलगी आणि गाईचं दान कारण्याबद्दल सांगितलं आहे. यासोबतच श्रीमद्भागवत पुराणानुसार पुरून उरलेल्या गोष्टींचं दान केलं पाहिजे असं सांगितलं जातं.

आता जसं दान करण्यात येणाऱ्या वस्तू वस्तू वेगवगेळ्या आहेत त्याप्रमाणे मिळणारं फळ देखील वेगवेगळं आहे. गरुडपुराणानुसार पाणी दान केल्यास समाधान मिळतं, अन्नदानाने अक्षय सुख मिळतं, तिळाच्या दानाने संतान प्राप्ती होते, जमीन दान केल्याने मनासारख्या गोष्टी मिळतात, घर दान केल्याने मोठं भवन मिळतं, तर चांदीचं दान केल्याने चांगलं रूप मिळतं असं सांगितलं जातं.

बाकी वस्तूंप्रमाणे सोनं दान करण्याने देखील काही फळ मिळतात.

सोन्याचं दान केल्यास माणसाला प्रदीर्घ आयुष्य मिळतं. व्यक्तीच्या जीवनात कोणतेही आजार, विकार, अपघात किंवा जीवनाशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. या समस्या टळल्यामुळे माणसाचं आयुष्य वाढतं, माणूस आयुष्यभर सुखी आणि समाधानी असतो असं सांगितलं जातं.

सोन्याला कलहनाशक देखील म्हटलं जातं, सोन्याचं दान केल्याने कुटुंबात, भावा-भावात, भावा-बहिणीमध्ये कोणत्याही कलह निर्माण होत नाही. सोन्याचं दान केल्याने कुटुंबातील अंतर्गत कलह दूर होतात आणि परिवार भांडणं आणि वादांपासून सुरक्षित राहतं असं सांगितलं जातं.

त्यामुळे अंबानी आजी-आजोबांनी जुळ्या नातवंडांमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचा कलह किंवा वाद निर्माण होऊ नये, त्यांना चांगलं, निरोगी आणि प्रदीर्घ आयुष्य लाभावं यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं दान केलं असं सांगितलं जातं.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.