आमच्या उन्हाळी सुट्टीत ऍडव्हेंचरची व्याख्या ‘अप्पूघर’पाशी येऊन थांबायची
“पुणेकरांच्या चेहऱ्यावर ज्याच्या नावानेच हास्य पसरते ते म्हणजे अप्पूघर!”
गेली २० वर्षे अप्पूघर याच टॅगलाईनने आपली ओळख सांगतं. पुणे जिल्ह्यातील लाखो कुटुंबांच्या आठवणीत असणारी जागा म्हणजे अप्पूघर. शहराच्या धूरगर्दीत सारसबाग एका टोकाला हरवल्यानंतर अप्पूघरची सुरुवात झाली. त्यानंतर ही जागा लहानमोठ्या सर्वांसाठी आठवणीचं ठिकाण बनलं.
१९८९ साली पिंपरीत अप्पूघर सुरु झालं. त्याचं काम पूर्ण व्हायला जवळपास ३ वर्षे लागली. हा प्रकल्प २००२ला पूर्णत्वास गेला. पिंपरी-चिंचवडला लोकं फक्त उद्योगनगरी म्हणून ओळखायचे. किंबहुना अजूनही याची ओळख तशीच करून दिली जाते. पिंपरीत पुणे शहरासारखा विद्येचा किंवा फुका-वाङ्मयीन वादाचा डिंडिम कधीच नव्हता.
कासोटा कोणत्या बाजूने नेसावा किंवा गोल साडी घालू का नये हे वाद पुण्यात सुरु होते तेव्हा पिंपरीमध्ये महायुद्धात इजिप्तमध्ये पाठवण्यासाठी रेल्वेरूळ बनत होते. कष्टकरी कामगार जनतेचं हे शहर आपला बहुमिश्रित सांस्कृतिक वारसा मजबुतीने जपून होतं. अशा शहरात लोकांना मनोरंजनासाठी व हौसेखातर एका मोठ्या पार्कची गरज होती. पुण्यात काही बागा बनलेल्या होत्या.
पण पिंपरीत शेतकऱ्यांच्या जमिनीवर भरमसाठ बिल्डिंग आणि फॅक्टऱ्या बांधताना इथल्या जनतेच्या विरंगुळ्याचा विचार झाला नव्हता. कंपन्यांनी स्वतःची उद्याने बनवली होती पण कुटुंबाला वेळ घालवायला हक्काचं ठिकाण नव्हतं. अप्पूघरनं ती पोकळी सहजी भरून काढली.
दिल्लीच्या प्रगती मैदानात पहिलं अम्युजमेंट पार्क म्हणून अप्पूघर उघडलं ते १९८४ साली.
इंदिरा गांधींच्या हस्ते त्याचं उदघाटन करणं अपेक्षितच असतानाच त्यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधी पंत्रप्रधान बनल्यानंतर काही आठवड्यांतच याचं उदघाटन करण्यात आलं.
स्वीडनच्या नरेंद्र मलिक आणि जियान विजेश्वर यांच्यावर हि जबाबदारी सोपवण्यात आली होती. १९८२ साली भारतात एशियाड स्पर्धा भरल्या होत्या. त्याच्या स्मरणानिमित्त हे पार्क उभारण्यात आलं.
या प्रभेचा शुभंकर प्राणी होता अप्पू हत्ती. त्यामुळं या पार्कला अप्पूघर असं संबोधण्यात .
इंटरनॅशनल अम्युजमेंट लिमिटेड म्हणून त्याच्या व्यवस्थापनासाठी वेगळी कंपनीही बनवण्यात आली होती.
इंडिया गेटच्या जवळ असणाऱ्या या पार्कची प्रसिद्धी एवढी झटपट वाढली की याच्या अनेक शाखा इतरत्र उघडण्यात आल्या. याचाच भाग होता पुण्यातील हे अप्पूघर!
निगडीला दुर्गादेवी टेकडीजवळ असणारी ही बाग. त्या काळचं मोठं नावाजलेलं ऍडव्हेंचर पार्क. लोणावळा वगैरे जागी कुठेही अम्युजमेंट पार्क उभं राहण्याच्या कितीतरी आधी ही जागा अनेकांच्या आकर्षणाचा विषय होती. फक्त अप्पूघरला जाण्यासाठी पुण्यातल्या नातेवाईकांकडे येणं हा अनेकांच्या सुट्ट्यांच्या दिवसांचा मुख्य हेतू असायचा.
लहानथोरांसाठी सगळ्या वयाच्या लोकांना आपापल्या आवडीनुसार करायच्या अनेक करामती इथं दाखवल्या जायच्या. धडकगाडीपासून फिरत्या कपबशीपर्यंत ते किंकाळत्या डायनासॉरपासून अंगावर धावून येणाऱ्या ऍनाकोंडापर्यंत सगळ्या गोष्टी इथं होत्या. पुण्यात पहिल्यांदा ३D पिच्चर बघायचं ठिकाण म्हणजे अप्पूघर असायचं.
अप्पूघरची तिकिटं अजूनही जुन्या अल्बममध्ये लावून ठेवणारी कुटुंब आमच्या ओळखीत आहेत. कुटुंबातलं लग्न वगळता जेव्हा क्वचितच फॅमिली फोटो काढायची संधी मिळायची अशी एक जागा अप्पूघर होती. अनेकांच्या घरात असा फोटो दर्शनी भागात आवर्जून लावलेला असतो.
अप्पूघरला अल्पावधीतच एक कल्ट स्टेट्स भेटलं. दर वेळेला लांब जाता यायचं नाही. मोठ्या लोकांसारखे टूर काढणे किंवा उंची हॉटेलात जेवायला बजेट नसायचं. त्यावेळी अप्पूघर पुणे शहराची अनागोंदी न परवडणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाला एक दिवस बायकापोरांना फिरवण्यासाठी असलेली रविवारची हक्काची जागा बनली.
मार्केटला कांदा-भाजीचे बक्कळ पैशे झाले की मार्केटपासून घरी निघताना पोरांना अप्पुघरला न्यायाची एवढी मौज शेतकऱ्यांच्या पोरांना मिळायची. कालच जाऊन आल्यासारखी बाया वर्षानुवर्षे अप्पूघरच्या भूत बंगल्याच्या आणि पोरं मित्रमैत्रिणींना अप्पू कोलंबसच्या आठवणी सांगत असायची.
अप्पुघरला इंदिरा गांधी उद्यान म्हणूनही ओळखलं जातं. पुण्यात आजरोजी असणाऱ्या नामांकित उद्यानांत अप्पूघर बऱ्याच बाबतीत उजवं ठरेल. आजही गुरुवार – शनिवार व रविवार हे पार्क ओसंडून वाहत असते. पुण्याचं मिनीडीस्नेलँँड म्हणू की जुन्या जमान्याची मौज म्हणून अजून काही नावं पाडो, अप्पूघर आपली स्वतंत्र ओळख आणि बाज राखून आहे.
त्याची रचना करतानाच मूळात इथल्या स्थानिक जनतेचा विचार केला होता. बहुसंख्य MIDCमध्ये गुरुवारी सुट्टी असायची. तेव्हा कोणत्या राईड सुरु ठेवायच्या, त्यापासून ते परिवार एकत्र कशात बसू शकेल आणि नवीन पिढीच्या लोकांना काय आवडेल असा सगळा विचार त्याच्या रचनेत केला गेला होता.
यातल्या सगळ्या राईड इटलीवरून मागवण्यात आल्या होत्या. त्या बनवताना त्याच्याच बारीक लक्ष देऊन इथल्या जनतेचा विचार झाला होता. एखाद्या लॅचमध्ये पदर अडकू नये किंवा चढायला सोपं जावं म्हणून उंच प्लॅटफॉर्म्स बनवले गेले होते. अप्पूघरची लोकं ही आपुलकी अजूनही पाळून असतात.
२००५ मध्ये अप्पूघरच्या देखरेखीची जबाबदारी पुष्पक अम्युजमेंट या कंपनीला देण्यात आली. तेव्हापासून त्याचं रचनेत अनेक बदल झाले.
२००८ मध्ये अनेक विवादांमध्ये अडकलेले अप्पूघर दिल्लीतून बंद करण्यात आले. हरियाणामधील अप्पूघर सुद्धा असेच वादाच्या भोवऱ्यात अडकले. पण पिंपरीमधील अप्पूघर मात्र अजूनही भरभरून सुरु आहे.
हे हि वाच भिडू.
- सुपरमॅन, स्पायडरमॅनपेक्षा भारी, कंप्युटरहून तेज दिमाग असलेला चाचा चौधरी !
- मुख्यमंत्री नाही म्हणत होते पण तरी अधिकाऱ्यांनी जिद्दीने एशियाड बस महाराष्ट्रात आणलीच !
- शरद पवारांचा तो निर्णय ज्यामुळेच पिंपरी चिंचवड उद्योगनगरी म्हणून टिकू शकली.