तर ७० टक्के भारतीय जवानांचे प्राण वाचले असते
भारतीय सैन्य युद्धात लढून दशकभरापेक्षा जास्त काळ लोटला असला, तरी दहशतवादी हल्ले, चकमकी आणि आपत्कालीन प्रसंगामध्ये अनेक जवानांना आपल्या प्राणांना मुकावं लागतं. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळं युद्धाची पद्धत सातत्यानं बदलत आहे. एक गोळीही प्राणांचा वेध घेऊ शकते आणि जवानांचे प्राण वाचवणं ही मुख्य जबाबदारी असूनही, सैनिकांना बॉडी आर्मर आणि हेल्मेट देण्याकडं दुर्लक्ष केलं जातंय. बॉडी आर्मर आणि हेल्मेट हे किट असतं, तर अनेक भारतीय जवानांचे प्राण वाचले असते.
बॉडी आर्मरचा इतिहास आणि भविष्य
बंदुकींचा वापर जवळपास १६ व्या शतकात होऊ लागला. त्यानंतर, बॉडी आर्मर म्हणजेच चिलखत आणि हेल्मेटही बनवलं गेलं. कालांतरानं मात्र बॉडी आर्मर आणि हेल्मेटचा वापर कमी होऊ लागला. त्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या वजनामुळं सैनिकांना जलद हालचाली करणं कठीण झालं. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी अधिक प्रभावी हेल्मेट विकसित केलं गेलं.
शरीरात चिलखत नसल्यानं रायफलची कॅलिबर ७.६२ मिमी वरून ५.५६ मिमीपर्यंत कमी झाली. गेल्या पाच दशकांत आधुनिक बॉडी आर्मरच्या वापरामुळं स्टील कोअर असलेली ७.६२ मिमी कॅलिबर असणारी बुलेट पुन्हा वापरात आली.
केव्हलर या कृत्रिम फायबरचा शोध लागल्यानं लष्करी सुरक्षा प्रणालींमध्ये तांत्रिक क्रांती झाली. केव्हलर हे १९७१ पासून व्यावसायिक उपलब्धतेसह वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचा मुख्य आधार बनलंय. आता सगळे आधुनिक बॉडी आर्मर आणि हेल्मेट केव्हलरसारख्या सिंथेटिक फायबरपासून बनवले जातात. ते धातू किंवा सिरॅमिक प्लेट्सशी जोडलेले असतात. सिंथेटिक फायबर शरीरात बुलेटचा प्रवेश रोखते आणि धातू किंवा सिरॅमिक प्लेट्स त्याचा आघात कमी करतात.
७.६२ मिमी स्टील कोअर बुलेट्सपासून जास्तीत जास्त संरक्षण देत मृत्यू कमी करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे, बॉडी आर्मर आणि हेल्मेट अधिक जड झालं. सुरुवातीला चार-साडेचार किलो वजन असणारे हे किट आता जवळपास १३ ते १४ किलो वजनाचे झाले आहेत. या वजनाचा परिणाम जवानांच्या गतिशीलतेवर आणि लढण्याच्या क्षमतेवर होतो.
सध्या जगभरातल्या लष्करांसमोर या किटचं वजन कमी करण्याचं आव्हान आहे. अल्ट्रा-हाय मॉलिक्यूलर वेट पॉलिथिलीन या हलक्या मटेरिअलचा वापर करून किटचं वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आता भारताचा मुद्दा
भारतीय सैनिक १९७४ पर्यंत दुसऱ्या महायुद्धात तयार झालेल्या हेल्मेटचा वापर करत होते. त्यानंतर, हळू हळू फायबर ग्लास असलेले हेल्मेट आले. मात्र जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हे हेल्मेट कुचकामी ठरले. त्यानंतर १९९० च्या दशकापासून यात आणखी आधुनिकता येत गेली. गेल्याच वर्षी भारतानं अत्याधुनिक हेल्मेट्सच्या खरेदीला सुरुवात केली आहे, ज्याद्वारे एके-४७ च्या स्टील कोअरपासूनही बचाव केला जाऊ शकतो.
१९९० च्या दशकात भारतीय सैन्यात बुलेटप्रूफ जॅकेट्सचा वापर होऊ लागला. त्यानंतर २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत आणखी सुधारीत जॅकेट्सही आले. मात्र यांचं वजन फार जास्त होतं. तसंच जॅकेट्स मुबलक प्रमाणात उपलब्धही नव्हती.
चांगली गोष्ट अशी आहे की, डीआरडीओ आणि खाजगी उद्योग आता अत्याधुनिक किट विकसित आणि उत्पादन करण्यास सक्षम आहेत. सुरक्षा, वजन आणि गतिशीलता यांच्यात समतोल साधण्यासाठी झालेल्या अभूतपूर्व संशोधनाचा भारतीय सशस्त्र दलं पुरेपूर फायदा घेतात. आता यासाठी आवश्यक बजेट एकत्रित करणं हे मोठं आव्हान आहे.
पूर्णपणे अत्याधुनिक किट बनवण्यासाठी प्रति किट दीड लाख खर्च येऊ शकतो. त्यामुळं संपूर्ण सैन्यासाठी साधारण १२ हजार ते २० हजार खर्च येऊ शकतो.
हे किट युद्धातल्या मृतांची संख्या अंदाजे दोन तृतीयांश कमी करू शकतात. जम्मू-काश्मीरमध्ये १९९० ते २०२१ या काळात जवळपास साडेपाच हजार जवान हुतात्मा झाले आहेत. अत्याधुनिक किट यापैकी ७० टक्के जवानांचे प्राण वाचवू शकले असते.
हे ही वाच भिडू:
- आर्मीला रॉयल एन्फिल्ड बुलेट हवी होती, नेहरूंनी अट घातली मेड इन इंडियाचं पाहिजे.
- मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब देशाला बळकट करेल
- भारतानं क्रिकेटची मॅच जिंकली अन् कारगिलमध्ये जवानांना जोश चढला