कसाब पासून ते आर्यन खान पर्यंत अनेकांना ठेवलेल्या हायप्रोफाईल आर्थर रोड जेलचा इतिहास.

दोन ऑक्टोबर रोजी एनसीबीने एका क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा डाव उधळून लावला. या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खानचा लेक आर्यन खान देखील होता. सध्या आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलंय.

कसाब पासून ते संजय दत्त, छगन भुजबळ, इंद्राणी मुखर्जी ते आर्यन खान पर्यंत अनेकांना ठेवलेलं आर्थर रोड जेल हे हायप्रोफाईल जेल म्हणून ओळखलं जातं.

हायप्रोफाईल याच्यासाठी की, बॉली सेलेब्स असो वा राजकारणी कोणी गुन्हा केला की त्यांना या जेलमध्येच आणलं जातं. म्हणून या जेलला प्रसिद्धीचं वलय लाभलंय. मग अशा प्रसिद्ध जेलचा इतिहास बघावाच लागतो.

भारतात बरीच कारागृह ही इंग्रजांच्या काळात बांधली गेली आहेत. त्यातलंच एक आर्थर रोड जेल आहे. ब्रिटिशांनी १९२५-२६ मध्ये या कारागृहाची निर्मिती केली. आता याला आर्थर रोड हेच नाव का मिळाल ? तर १८४२ च्या काळात मुंबईचे गव्हर्नर असलेल्या सर जॉर्ज आर्थर यांच्या नावे जो रस्ता आहे तिथंच हे जेल असल्यामुळं त्याला आर्थर रोड जेल असं नाव देण्यात आलंय.

१९७० च्या दशकात या रोडला साने गुरुजी मार्गा असं नाव देण्यात आलं असलं तरी या जेलचं नाव अजून ही आर्थर रोड असंच आहे.

तस बघायला गेलं तर या जेलचं अधिकृत नाव मुंबई सेंट्रल जेल आहे. मात्र, आर्थर रोड जेल हे नाव पॉप्युलर कल्चर मध्ये पोलिसांच्या सर्कल मध्ये आणि न्यायालयीन कागदपत्रांमध्ये ही मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं.

भारतीय कारागृह समितीने १९१९ -२० मध्ये एक अहवाल प्रकशित केला होता. हा अहवाल स्वातंत्र्यपूर्व भारतातील कारागृहांवरील सर्वात प्राचीन उपलब्ध कागदपत्रांपैकी एक आहे. त्यात  मुंबई शहरातल्या दोन कारागृहांचा उल्लेख आहे. हि दोन्ही कारागृह बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होते. त्यातलं एक म्हणजे बॉम्बे कॉमन जेल आणि दुसरं सुधारगृह, जे भायखळा येथे होत.

बॉम्बे कॉमन कारागृह म्हणजे आजच आर्थर रोड जेल.

त्या अहवालात नमूद करण्यात आलं होत की, त्यावेळची सर्वाधिक गर्दी ही मुंबई प्रेसिडेन्सीच्या कारागृहांमध्ये व्हायची. त्यात बॉम्बे कॉमन कारागृहाचे वर्णन खूप जुन्या आणि वापरासाठी अयोग्य इमारती असं करण्यात आलं होत. ज्या इमारती अजूनही दीर्घकाळ वापरात आहे. त्यानंतर आर्थर रोड कारागृहासारखी आणखी कारागृहे बांधण्यात आली. १९७२ मध्ये आर्थर रोडला सेंट्रल जेल म्हणून घोषित करण्यात आलं.

कारागृह अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,

आर्थर रोड तुरुंग सहा एकरांवर पसरलेले आहे. त्यामध्ये २० बॅरॅक आणि त्यांच्या आत सेल्स आहेत. कारागृहाची सध्याची क्षमता ८०४ कैद्यांची आहे. परंतु कैद्यांची संख्या कधीकधी ३,०००च्या वर जाते, ज्यामुळे हे जेल देशातलं सगळ्यात गर्दी असणारं जेल म्हणून ओळखलं जातं.

या जेलमध्ये हाय सिक्युरिटी बॅरॅक पण आहेत. याला अंडा सेल म्हंटल जात. अंड्याच्या आकाराच्या या अंडा सेल्स आहेत. या अंडा सेल्समध्ये मुस्तफा डोसा, अबू सालेम, अरुण गवळी सारखे गुंड, १९९३ च्या बॉम्ब बॉम्बस्फोटातला अभिनेता संजय दत्त सारखे प्रसिद्ध कैदी होते.

अजमल कसाबसाठी तर आर्थर जेलने सुरक्षेच्या कारणास्तव टनेलच तयार केला होता.

२००८ च्या दहशतवादी हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाब सुद्धा याच जेलमध्ये होता. त्याला न्यायालयीन सुनावणीला सेफली घेऊन जात यावं यासाठी, आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने खास २० फुटांचा बॉम्ब प्रूफ टनेल त्याच्या सेल पासून ते न्यायालयापर्यंत तयार करवून घेतला होता.

त्यानंतर अजमल कसाबला येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं. आणि त्याच्यासाठी तयार केलेला सेल आणि टनेल झैबुद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्यासाठी वापरण्यात आला. हा अबू जुंदाल सुद्धा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी होता.

या तुरुंगात कैद्यांचा जीवन कसं असतं ?

ज्यावेळी हे जेल बांधण्यात आलं तेव्हा हा मुंबई शहराच्या बाहेरील भाग होता. पण नंतर मुंबईत इतकी वर्दळ वाढली की, हे जेल शहराच्या आणि वर्दळीच्या मध्यभागी आलं. अलीकडेच, तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या नियोजन प्राधिकरणाला पत्र लिहून जेल बाहेरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मोनोरेल ट्रॅकवरुन  कारागृहाचा परिसर ट्रेनमधून दिसू शकतो असं नमूद केलय.

हे जेल चर्चेत असत ते कैद्यांच्या गर्दीमुळेच. मुंबई शहर दिवाणी आणि जिल्हा सत्र न्यायालयाच्या जवळ हे जेल असल्याने अंडरट्रायल्स कैद्यांना ठेवण्यासाठी या जेलला प्राधान्य दिलं जातं. अंडरट्रायल्सला गेलेले कैदी अनेकदा आतल्या भ्रष्टाचाराची तक्रार करतात.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे, काही टोळ्यांचे नेते फोन इथं फोन वापरू शकतात आणि लाखो रुपये देऊन पाहिजे तसं आयुष्य जगतात. या जेलने अनेक टोळी युद्धे देखील पाहिली आहेत. २०१० मध्ये गुंड अबू सालेमवर १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील त्याच्या सहआरोपी मुस्तफा डोसा याने हल्ला केला होता. सालेमचा चेहरा धारदार चमच्याने कापला गेला. घटनेनंतर दोघांना वेगळ्या कारागृहात पाठवण्यात आले.

२००६ मध्ये दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन टोळीतील प्रतिस्पर्धी गटांमध्ये झालेल्या भांडणानंतर एका कैद्याचा मृत्यू झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी तुरुंग प्रशासन कारागृहाच्या स्वतंत्र भागात विरोधी गट ठेवतात. आर्थर रोड जेलचा कैदयांचा भार हलका करण्यासाठी मानखुर्दच्या पूर्व उपनगरात आणखी एक कारागृह बांधण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.

आजपर्यंत इथं अनेक मोठमोठ्या व्यक्ती राहून गेल्यात. मग यात संजय दत्त, शायनी आहुजा, सुरज पांचोली, सलमान खान, इंदर कुमार, राज कुंद्रा होते. तस बघायला गेलं तर ही लिस्ट खूप मोठी आहे. आणि या लिस्ट मध्ये आता आर्यन खान ऍड झालाय. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.