आसाम-मिझोरामचं भांडण आता स्पेस एजन्सी सोडवणार आहे…?
आसाम-मिझोरम सीमा विवाद सुरू झाला आणि या विवादात आसामच्या ६ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला.
बरं हे प्रकरण मिटवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आणि या दोन्ही राज्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी सहमती दर्शवली आहे, आणि सरकारने या समस्येवर एक भन्नाट तांत्रिक उपाय सुचवला. काय तो उपाय ?
म्हणजे त्याचं असं कि जमिनीवर राहून या दोन्ही राज्यांच्या जमिनीचे मोजमाप आता पुरे झाले आहे, असंही खालून जमीन मापून काही भांडण मिटेना म्हणून सरकारने आता थेट आकाशातूनच मोजमाप करायचं ठरवलं आहे.
केंद्र सरकारच्या सांगण्यावरून आसाम-मेघालयच्या सीमा निश्चित करण्यासाठी NESAC उपग्रह इमेजिंगचा वापर करायचा ठरलंय. तर मग काय आहे उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञान ? ज्या तंत्रज्ञानाद्वारे हा विवाद सोडवण्याचा प्रयत्न केला जाणारे? हे काम कोण करणार आहे ? त्यांची पद्धत काय असणार आहे?
आसाम-मिझोराम वाद नक्की काय आहे ?
२६ जुलै रोजी आसाम आणि मिझोरामचे पोलीस कर्मचारी एकमेकांशी भिडले. आसामने मिझोरामवर घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला, तर मिझोरमचं म्हणन आहे कि, आसामचा मनमानी कारभार चालू आहे. हा वाद इतका वाढला कि, गोष्ट गोळीबारपर्यंत गेली.
आसामच्या ६ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. असा वाद होणं काही नवीन नाही. आसाम-मिझोराम सीमेवर राहणाऱ्या लोकांना अशा वादांची सवयच आहे. मिझोराम भारताचे राज्य झाल्यापासून हा वाद सुरू आहे. त्याचे मूळ हे मिझोरामच्या इतिहासात असलं तरी आत्ता आपण हे पाहूया कि,
स्पेस एजन्सी हा वाद कसा मिटवणार ?
कोणत्याही क्षेत्राचा नकाशा बनवण्याचा पारंपारिक मार्ग म्हणजे त्या क्षेत्राचे ग्राउंड सर्वेक्षण करणे आणि क्षेत्रांची नोंद करणे. कुंपण लावणे आणि ते कुंपणावर रेकॉर्ड लावलं जावं की कोणते क्षेत्र कोणत्या राज्यात येते. बरं हे वाटतं तितकं सोप्पं नाहीये…कारण हे सपाट मैदानावर करणे शक्य आहे, परंतु जिथे पर्वत, जंगले आणि नद्या आहेत, तिथे हे काम खूप कठीण आणि कधीकधी अशक्य झाले आहे. मात्र, आता तंत्रज्ञानामुळे हे काम सोपे झाले आहे. उपग्रहाद्वारे परिसराचा नकाशा तयार करता येतो.
उपग्रह म्हणजे मानवनिर्मित यंत्र जे पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. तुम्हाला वाटेल की उपग्रहाद्वारे ते खूप सोपे होईल. फक्त एक फोटो घ्या आणि त्यावर रेषांसह एक नकाशा बनवा, काम संपलं !
पण प्रत्यक्षात ते तितके सोपे नाही. उपग्रहातून घेतलेल्या फोटोंमध्ये तितकी स्पष्टता नसते. पण उपग्रहाद्वारे अनेक स्तरांमध्ये चित्रे घेता येतात. उदाहरणार्थ, इन्फ्रारेड प्रतिमा – हे निर्धारित करू शकतात की जमिनीवर पर्वत, जंगले आणि नद्या कुठे आहेत. रिअल-टाइम इमेजिंग- यावरून हे ओळखले जाऊ शकते की काही तासांपूर्वी जमिनीवर काय स्थिती होती, आणि आत्ता काय आहे.
खरं तर, उपग्रह सेन्सरद्वारे सर्व काम करतात. हे सेन्सर्सला जाणवते की, जमीन कुठे आणि कशी आहे.
म्हणजे कुठे पर्वत, कुठे जंगल आणि कुठे नदी वेगैरे. सूर्यप्रकाशात उपग्रह हे काम अधिक चांगले करतात. सूर्यप्रकाशाचा प्रत्येक पृष्ठभागावर वेगळा परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर ते जंगलावर पडले तर ते जमिनीवर पोहोचत नाही. त्यामुळे तिथे फार उष्णता नसते. शेतावर पडणारा सूर्यप्रकाश उष्णतेसह चमक निर्माण करतो त्यामुळे तो लग्गेच लक्षात येतो.
आणि मग सॅटेलाईट सेन्सर प्रकाशाच्या नमुन्यातून त्या ठिकाणाची ब्लू प्रिंट तयार करतात.
ते जमिनीवर सर्वकाही वेगवेगळ्या रंगांनी दाखवतात. हिरव्या रंगाच्या जंगलाप्रमाणे, पाणी खोल काळे आणि पर्वत पिवळे इ. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीसह, हे देखील ज्ञात आहे की पूर्वी एखाद्या भागात नदी होती किंवा जंगल होते. तरी होणाऱ्या बदलांचे रेकॉर्ड ठेवले जातात.
कोणत्याही विवादाच्या वेळेस हा उपग्रह इमेजिंग नकाशाचा संदर्भ दिला जाऊ शकतो. यासह, रिअल टाइम चित्रे देखील घेतली जाऊ शकतात. दोघांची जुळवाजुळव करून योग्य स्थिती निश्चित करता येते. सॅटेलाईट इमेजिंगच्या साहाय्याने, लोक एकत्र येण्याच्या आणि परिसरातील अतिक्रमणाच्या परिस्थितीवरही नजर ठेवता येते.
इतकेच नाही तर परिसरात प्रचंड गर्दी जमण्यापासून ते संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ शकते.
हा प्रश्न तुमच्या मनात उद्भवू शकतो की उपग्रहाची प्रतिमा Google वर आधीच उपलब्ध आहे, मग ती इतकी मेहनत का घेत आहे. खरं तर, राज्य सरकारांचा गुगलसारख्या खासगी कंपन्यांवर विश्वास नाही. मग प्रत्येक अपडेटसाठी त्यांच्यावर अवलंबून राहता येत नाही. अशा परिस्थितीत, आपल्या उपग्रहावर अवलंबून राहणे हा एक चांगला पर्याय सिद्ध होईल.
याबाबतीत NESAC चे कार्यकारी संचालक काय म्हणतात?
“कोणत्याही ठिकाणाची नैसर्गिक सीमा रिमोट सेन्सिंगद्वारे निश्चित केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्या नदीला दोन राज्यांमध्ये नैसर्गिक सीमा असेल, तर ती उपग्रह इमेजिंगद्वारे निश्चित केली जाऊ शकते. जरी नंतर नदीने आपला मार्ग बदलला, तरी आपण उपग्रह प्रतिमांमधून शोधू शकतो जी खरी सीमा आहे. या प्रकारच्या इमेजिंगमुळे नैसर्गिक सीमा निश्चित करणे सोपे होते. ”
आता हे पाहणे महत्वाचे आहे कि, सॅटेलाईट इमेजिंगद्वारे बनवलेला नकाशा आसाम आणि मिझोरमला कितपत मंजूर होईल की नाही यावरच सर्व काही अवलंबून आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वादावर जर तंत्रज्ञानाने तोडगा काढला, तर हा चमत्कार संपूर्ण ईशान्य भारतातील सर्व जमीन विवाद सोडवू शकतो हे मात्र नक्की.
हे हि वाच भिडू :
- कल्पना चावलांच्या अपघाती निधनासाठी आजही नासाला जबाबदार धरण्यात येते.
- इलॉन मस्क गेट्सपेक्षा श्रीमंत कुणाच्या जीवावर झाला?
- अमेरिका रशियाला मागे सारून या आफ्रिकन देशाने मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती.