औंरगाबादेत एकच चर्चा, काय करणार मराठा मोर्चा.

औरंगाबादची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर कवाच नसती. कचऱ्याचे डोंगर उभे असले तरी त्या डोंगरावर जाती धर्माचे झेंडे लावून निवडणूक लढवायला पक्ष तयार असतेत. रस्त्यावर लाखो खड्डे असूद्या. त्या खड्ड्यात पडून कंबर मोडलेला माणूस दवाखान्यात बेडवर पडल्या पडल्या म्हणणार, कितीबी ताण. येणार बाण. कमळावाले यवढे वर्षं झाले बाणासोबत नांदत आलेत. पण खाजगीत बोलतानी कमळावाले काय म्हणणार? ‘ बाणामुळे फक्त खड्डे झाले हो शहरात.’ पण बाणाला खोचलेलं कमळ तसंच राहतं. मागच्या विधानसभेला अमितभाई शहानी कमळ उखडलं बाणातून. प्रदीप जैस्वाल आन तनवाणी राहिले एकमेकाच्या अपोझिट. आली ना एम आय एम. इम्तियाज जलील आमदार झाले. बाण पुन्हा कमळात घुसून गेलं ह्या टायमाला.

मराठी माणसांनी औरंगाबाद निझामाच्या तावडीतून मुक्त करायला जीवाची बाजी लावली. आन विधानसभेत उमेदवार कोण होते? जैस्वाल विरुद्ध तनवाणी विरुद्ध जलील. 

औरंगाबादमध्ये शिवसेनेची एवढी वर्षं सत्ताय. पण औरंगाबादचं साधं संभाजीनगर करता आलं नाही. राज्यात दहा वर्षं सत्ता भोगली तरी. बाकी बीजेपीवाले फेसबुकवर विकास होत नाही म्हनतेत आन पालिकेत युतीचे टेंडर बनतेत. पब्लिक कोमात आन नेते जोमात. सगळे मजेत होते. सरकारवर नाराजी आस्ती. खैरे त पंचवीस वर्षं झाले कुठं ना कुठं निवडून येतेत. आजून पडलेच नाहीत. त्यांच्या काळात बनलेले पूल पडायला आले पण खैरे पडले नाही. माणूस एकदम चिवट. ह्या टायमाला पण निवडून येणार आशी सगळे खात्री देत होते. खैरे आन कॉंग्रेसची काय गट्टीय काय माहित? खैरेंच्या विरोधात रामकृष्णबाबा पाटील सोडले त कॉंग्रेसनी कधी तगडा माणूस दिला नाही.

ह्या टायमाला त अशोक चव्हाण यांचं खैरे प्रेम एवढ उतू आलं की त्यांनी स्वतःच्या नांदेडपेक्षा औरंगाबादची निवडणूक सेफ करून टाकली. उमेदवार दिले सुभाष झांबड. बरं झांबड कशाला तर अब्दुल सत्तार म्हणले म्हणून. अब्दुल सत्तार सांगणार आन अशोक चव्हाण ऐकणार आशी औरंगाबादला सत्तारानी इमेज बनवून ठेवली होती. कशामुळ काय माहित? पण इतर पक्षात आमदार प्रदेशाध्यक्षाच्या ऐकण्यात आसतेत. औरंगाबादला प्रदेशाध्यक्ष आमदाराच्या ऐकण्यात आस्तेत आसा मेसेज कॉंग्रेसनी दिला.

पण औरंगाबादला मोंढ्यात व्यापाऱ्यांची आईन टायमाला बोलाचाली फिस्कटत आस्ती तशी कॉंग्रेसची बोलाचाली फिस्कटली. सत्तार आधी झांबड यांना तिकीट द्या म्हणून मागं लागले व्हते. अचानक म्हणाय लागले झांबडला तिकीट कामून दिलं? आता हायका? चव्हाण साहेब हैराण. आधीच नांदेडमध्ये ते बायकोला उभं करा म्हणीत होते त पक्षानी सांगितलं चव्हाण तुम्हीच उभे रहा. त्यात पुन्हा सत्तार आजून डोक्याला शॉट द्यायला लागले.

आता काही लोक म्हनतेत सत्तारसाहेब आन चव्हाणसाहेब कधीच भांडू शकत नाही. येगळा डाव आसल. आपल्याला माहित नाही. आपुन दुष्काळी भागातले माणसं. आपुन ड्रीप मधी जात नाही आन डीपमधीबी जात नाही. फक्त फार्महाउसला बैठक घेऊन मिटल आसं भांडण दोघानी चव्हाट्यावर आणायची गरज नव्हती. सत्तार इम्तियाज जलील यांना पाठींबा देणार आसा त्यांच्या बोलण्यातून अंदाज होता. पण त्यांनी आईन टायमाला हर्षवर्धन जाधव यांना पाठींबा दिला. सगळे हैराण झाले. पण आम्ही काही हैराण झालो नाही. हैराण करणारी गोष्ट तुम्हाला सांगतो. ह्या सत्तारभाऊचा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभेत येतच नाही. त्यो येतो जालन्यात. आता तुम्ही म्हणतान सत्तारभाऊ जालन्यातून कामून उभे रहात नाहीत मंग? रावसाहेब दानवे यांच्या इरोधात. तुम्हीबी राव. काहीबी इचारता. दोस्तीची काही किंमतच नाही तुम्हाला.

बरं हर्षवर्धन जाधव कोण? रावसाहेब दानवे यांचे जावई. आता सत्तार भाऊच्या राजकीय भूमिकेवर जास्त डिटेल इचारू नका. थोडक्यात विषय ध्यानात आलाच आसल.

औरंगाबादची निवडणूक आशा प्रकारे खैरे साहेबाला यकदम सोपी झाली होती. सुपारी मारुती आन भद्रा मारुती प्रसन्न झाले होते. त्यात हनुमान जयंतीबी आली नेमकी ह्याच महिन्यात. पण हनुमानाची ओळख जरी आदर्श भक्त म्हणून असली तरी भले भले भक्त आता खैरे साहेबाला कटाळून गेलेत. चांगले चांगले भक्त म्हनतेत दर टायमाला आमच्या सप्त्याची, मंदिराची, जत्रेची वर्गणी खैरे साहेबांनी कामून द्यायची. निदान वर्गणी द्यायला तरी आम्हाला चान्स भेटायला पायजे. पद भेटायला पायजे. तुम्हाला खोटं वाटल पण निवडून आल्याव फक्त वर्गणीच द्यायची आस्ती आसा समज झालाय काही लोकाचा. चालायचं. त भानगड आशी झाली की झांबड उभे राहिल्यामूळ खुश झालेल्या खैरेना अचानक हर्षवर्धन जाधव टफ द्यायला लागले ना राव.

लोकाला वाटलं वंचित आघाडीकडून इम्तियाज जलील उभे राहिले. टेन्शन गेलं. जलील यांच्या भीतीनी खैरेना एकगठ्ठा मतदान होणार. लोक म्हणायला लागले कॉंग्रेस, सेना, हर्षवर्धन ह्यांच्या भांडणात जलील निवडून येणार. ही भीती हमेशा सेना बीजेपीच्या कामाला येती. पण ह्या टायमाला लोचा झालाय. हर्षवर्धन जाधव यांच्यामूळ निवडणूक पुन्हा मराठा मोर्चाच्या वातावरणात गेली. आधीच औरंगाबाद मराठा मोर्चाच्या बाबतीत संवेदनशील. पहिला शिस्तबद्ध मोर्चा औरंगाबादनी काढला. त्याचा आदर्श महाराष्ट्रानी घेतला. लाखोच्या संख्येनी मोर्चे निघाले. आरक्षणाचा प्रश्न पेटला. औरंगाबादच्या गंगापूरला तरुणाने आत्महत्या केली. राज्यभर प्रश्न पेटला.

मराठा मोर्चाच्या चळवळीत औरंगाबाद अग्रेसर राहिलं. आरक्षण प्रश्नावर पहिला राजीनामा दिला हर्षवर्धन जाधव यांनी. कन्नडचे आमदार. आधी मनसे. मग शिवसेना. पण हर्षवर्धन जाधव दोन्ही पक्षात मनानी नसल्यासारखेच होते. आता त्यांनी स्वतःचा पक्ष काढलाय. ते नेमके कुठल्या बाजूचे हायेत ? कुठल्या बाजूचे असणार हायेत? ह्या प्रश्नाची उत्तरं कुणीबी देऊ शकत नाही. आजच्या घडीला ते सोताबी देतील आसं वाटत नाही. 

एक गोष्ट मात्र खरीय की हर्षवर्धन जाधव यांच्यामूळ हमेशा एकतर्फी वाटणाऱ्या औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत रंग भरलेत. निवडणूक चुरशीची केलीय. सगळीकडे मराठा मोर्चाची चर्चा आहे. कारण सेनेच्या सामना पेपर मध्ये आलेलं मुका मोर्चा हे व्यंगचित्र कुणी इसरू शकत नाही. मराठा मोर्चातल्या लोकाला झालेली मारहाण कुणी इसरू शकत नाही. गंगापूरपासून सुरु झालेलं मराठा तरूणांचं आरक्षणासाठी आत्महत्यासत्र कुणी इसरू शकत नाही. काही लोक खैरे साहेबांच्या गोड बोलण्यानी इसरणार. काही लोक सेनेच्या निष्ठेपुढ इसरणार. काही कॉंग्रेससाठी इसरणार. पण जर हर्षवर्धन जाधव आरक्षण आंदोलनाच्या काळात जे टायमिंग दाखवून राजीनामा द्यायला सगळ्यात पुढ आले होते तेच टायमिंग आताबी दाखवू शकलेत विषय हार्डय.

अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या एकाच मतदारसंघात सत्ताधारी विरुद्ध मराठा मोर्चा आशी निवडणूक होतीय.

विरोधक एकमेकाच्या तंगड्या ओढण्यात मश्गुल झालेत. सत्ताधारी विकास सोडून भलत्याच बाता मारायला लागलेत. पण महाराष्ट्रातला एक मोठा प्रश्न म्हणजे मराठा मोर्चा. मराठा आरक्षण. तो प्रश्न जिवंत ठेवायचं काम फक्त एका मतदारसंघात घडून आलंय. त्याचा फायदा हर्षवर्धन जाधव यांना किती होतो बघायला पायजे. औरंगाबादची निवडणूक मराठा मोर्चाभवती आलीय. गावोगाव मुका मोर्चा असा चेष्टेचा प्रचार करणारी सेना विरुध्ध मराठा मोर्चा हा अस्मितेचा प्रश्न हा संदेश पोचवला जातोय. पण खैरे काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. मराठ्यांना आईन टायमाला काय गाजर दाखवायचं हे त्यांनी पण ठरवलं आसलच.

इम्तियाज जलील यांच्या रूपानी महाराष्ट्रात दलित समाज मुस्लीम उमेदवाराच्या मागं किती संख्येनी उभा राहणार हे महाराष्ट्र बघणारय. ह्या निवडणुकीत एम आय एम ला वंचित आघाडीत काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा ठरणारय. सगळ्यात महत्वाची गोष्ट त राहिली. जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या मागं शिवसेना किती उभी राहती आन औरंगाबादला शिवसेनेच्या मागं बीजेपी किती उभी राहती हे सुद्धा दिसून येईल. कारण शिवसेनेसाठी जसे किरीट सोमैय्या तसे बीजेपीसाठी खैरे. खैरेंची ताकद तिकीट मिळवून दाखवायचीय. औरंगाबादला कमळ उगवलं पण खैरेंनी बीजेपीच नेतृत्व उभं होऊ दिलं नाही. ह्याबाबतीत त्यानला मानलं पायजे. लोकाचं जाउद्या सोताच्या पक्षात पण कुणी मोठं नाही त्यांच्यापेक्षा. 

खैरे बांबूसारखे हायेत. जिथं बांबू उगवतो तिथं फक्त बांबुच उगवतो. भसाभस. बाकी काही उगवत नाही. बांबू तोडला तरी उगवत राहतो. बांबूला थांबवता येत नाही सहजासहजी. 

हर्षवर्धन जाधव चमत्कार करू शकतेत आसं वाटतंय.

कारण सेनेला कॉंग्रेस संपवू शकत नाही. कॉंग्रेसनी जे सीट दिलंय त्याच्यावरून त कॉंग्रेसची फाईट द्यायची इच्छाय असं सुद्धा वाटत नाही. पण सेनेला संपवायची ताकदय बिजेपीत. आन सरकारच्या विरोधात असलेल्या रागात. राग मराठा मोर्चाचा हायेच. पुन्हा हर्षवर्धन पाटील बीजेपी प्रदेशाध्यक्षाचे जावई. जुळून आलंय. बीजेपीकडून. मराठा मोर्चाची ताकद महाराष्ट्रात बीड, सांगली पासून खूप मतदारसंघात होती. आहे. पण प्रचारात फार ठिकाणी निर्णायक दिसत नाही. औरंगाबाद अपवाद आहे. मोर्चाची चर्चा या मतदारसंघात निर्णायक ठरू शकती. आता तुम्ही म्हणणार मतदान जाती धर्माचा इचार न करता केलं पायजे. विकासाचा इचार करून केलं पायजे. तसं आसल त विकासाबद्दल बोलणारा उमेदवार शोधायला पुढचे पाच वर्षं वाट पाहाव लागल. यंदा तरी एकच चर्चा. मराठा मोर्चा.

वंचित आघाडी, कॉंग्रेस आन सेना सगळ्याला एकच टेन्शन. मराठा मोर्चा. महाराष्ट्रात सगळीकड लाखोचे मराठा मोर्चे निघाले. पण निवडणूकीत मराठा मोर्चा फक्त ह्या मतदारसंघात प्रभावी ठरताना दिसतोय. बाकी मतदार राजा काय ठरवणार ते बघू. त्यात त मजाय ना राव लोकशाहीची.  

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.