बच्चू कडू आणि जनता दल सेक्यूलरमध्ये वाद कशामुळे झाला?

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये कधी पक्ष आमचा तर कधी चिन्ह आमचं म्हणून वाद सतत पेटलेला पहायला मिळतो. अगदी पक्ष कार्यलय असो किंवा शाखा असो यावर देखील प्रत्येक गटाकडून दावा केला जातोय. महाराष्ट्रातले मोठे पक्षच नाही तर, छोटे पक्षही यात मागे राहताना दिसत नाहीत. असाच एक पक्ष कार्यालयाचा वाद प्रहार जनशक्ती पक्ष आणि जनता दल सेक्यूलरमध्ये पेटला आहे.

जनता दल सेक्यूलर आणि प्रहार जनता पक्ष यांच्यात वाद का पेटलाय? जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण.

राज्यातील राजकीय पक्षांना मंत्रालयाच्या परिसरात राज्य सरकारने कार्यालय उपलब्ध करून दिलेली आहेत. अशाच प्रकारे जनता दल व समाजवादी विचारधारेतील तत्कालीन पक्षाला १९६२  मध्येच १० सीडीओ बॅरॅक, एल. आय. सी मार्ग, योगक्षेम येथील जागा कार्यालयासाठी उपलब्ध करून दिलेली होती. १९६२ पासून ही जागा पक्षाच्या ताब्यात आहे. १९७७ व १९७९ पासूनचे पुरावे पक्षाकडे आजही उपलब्ध आहेत. जनता दल सेक्यूलर पक्षाचे राज्यातील तसेच मुंबईतील जे काही कामं आहेत ते या जागेतून चालवले जातात. पण, आता जनता दल सेक्यूलर या पक्षाला नोटीस न देता त्यांच्या कार्यालयाची ७०० फुट जागा बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला तर, फक्त २०० फुट जागा जनता दल सेक्यूलर या पक्षाला देण्यात आली आहे.

बच्चू कडूंनी १८ जुलैला मुख्यमंत्र्याना पत्र लिहत ही मागणी केली होती. बच्चू कडू यांचं म्हणणं होतं की, हे कार्यालय सतत बंद असतं.

त्या कार्यालयाची जागा आम्हाला देण्यात यावी. मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंची मागणी मान्य करत लगेच ती जागा प्रहार जनशक्ती पक्षाला दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यालया संदर्भात जनता दल सेक्यूलरचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होत.पण, बच्चू कडूंसाठी देशाच्या माजी पंतप्रधानांच्या एका पत्राला मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे केराची टोपली दाखविली आहे. मात्र, तरी देखील कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला देऊन टाकली आहे.

आता यासगळ्या प्रकारामुळे जनता दल सेक्यूलर पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत.

गेल्या महिन्यात बच्चू कडू यांनी १८ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली की,जनता दलाचे बंद असलेलं कार्यालय आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाला देण्यात यावं. मात्र, जनता दल सेक्यूलर पक्षाचं कार्यालय बंद आहे. असं सांगून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आहे. खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागाने हे कार्यालय कायमस्वरूपी कार्यरत असल्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देऊनही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी आदेश काढून २३ ऑगस्ट रोजी या कार्यालयाच्या नऊशे चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती पक्षाला परस्पर बहाल करून टाकली. अशी माहिती जनता दलाचे प्रभारी राज्य अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिली होती.

तसेच पक्षाचे राज्य महासचिव रवि गुल्हाने म्हणालेत की,

“ज्यांनी पक्ष फोडले, कार्यकर्ते पळवले, घरं फोडली ते आता विरोधी पक्षाचे कार्यालय सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न करू लागलेत. मात्र महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही. राज्यातील पुरोगामी जनतेने ही मनमानी संपविण्यासाठी हे कार्यालय वाचवण्याच्या लढाईत सामील व्हावे असं आवाहन गुल्हाने यांनी केले आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर या विरोधात जनता दल सेक्युलर पक्षाचे पाच माजी आमदार खासदार मंत्रालयासमोर आमरण उपोषण करतील”

असा थेट इशारा गुल्हाने  यांनी दिला आहे.

पण, आता एक प्रश्न पडतो बच्चू कडू यांनी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांची मागणी लगेच मान्य केली त्याचं कारण काय असू शकतं?

जेव्हा पासून बंड झाला तेव्हापासून बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ देत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून बच्चू कडू हे मंत्री पदाची आस लावून बसले आहेत. महामंडळ देऊन बच्चू कडूंची बोळवण  करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला.पण, बच्चू कडू त्यात समाधानी नसल्याचंच पहायला मिळत आहे. बच्चू कडूंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने या माध्यमातून केला आहे का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर बच्चू कडू सरकारला घरचा आहेर देतानाही पहायला मिळालेले आहेत. त्यामुळे बच्चू कडूंची नाराजी दूर करण्याचा हा एक प्रयत्न सुरू आहे. यावरून तर असच सध्या तरी दिसत आहे.

एका बाजूला बच्चू कडूंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जरी केला गेला असला, तरी दुसऱ्या बाजूला मात्र, जनता दल सेक्यूलर पक्षानी जर कार्यालय परत दिलं गेलं नाही. तर, माजी मंत्री, आमदार, खासदार यांना घेऊन मंत्रालयासमोर अंदोलन करण्याचा इशारा जनता दल सेक्यूलर पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. आता या सगळ्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहण महत्वाचं आसणार आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.