राम मंदिराचा इतिहास सांगायला बजरंग दल देशभरात हजार संचलनं करणाराय…

आपल्या देशात राम मंदिराचा इतिहास माहीत नाही अशी प्रौढ व्यक्ती सापडणं कठीण आहे. पार १९९२ पासून सुरू झालेला राम मंदिराचा वाद आता राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आलं, तरी कुठल्या ना कारणामुळं सुरू आहेच. कित्येक निवडणुकांमध्ये राम मंदीराचं निर्माण हा चर्चेतला विषय राहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्म दरम्यान, ५ ऑगस्ट २०२० रोजी मोदींच्याच हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन आणि शिलान्यास झाला. साधारण २०२४ पर्यंत राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राम मंदिरामुळं सध्या बजरंग दल चर्चेत आलं आहे. बजरंग दल सर्वात जास्त चर्चेत असतं, ते म्हणजे त्यांच्या व्हॅलेंटाईन्स डे विरोधातल्या आंदोलनामुळं. बजरंग दलाचे कार्यकर्ते जोडप्यांचं लग्न लाऊन देतात अशी चर्चा दरवर्षी व्हॅलेंटाईन्स डे च्या आसपास होते. देशातल्या बऱ्याच विवादग्रस्त आंदोलनात बजरंग दलाचा समावेश राहिला आहे.

बजरंग दलाची सुरुवात कशी झाली?

विश्व हिंदू परिषदेची युथ विंग म्हणून बजरंग दलाची ओळख आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वेबसाईटनुसार ऑक्टोबर १९८४ मध्ये बजरंग दलाची स्थापना झाली. अयोध्येतुन शोभायात्रा निघणार होती, तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित असणाऱ्या युवकांना यात्रेचं रक्षण करण्याची जबाबदारी दिली. तेव्हा तेव्हा फक्त स्थानिक तरुणांचा बजरंग दलात समावेश होता, पुढे २०१० नंतर देशभरात या संघटनेचे कार्यकर्ते पसरले. उत्तर आणि मध्य भारतात बजरंग दलाचं प्राबल्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांप्रमाणं बजरंग दलाचे आखाडे आहेत.

सध्या बजरंग दल चर्चेत असण्यामागचं कारण काय आहे?

सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडण्यात आली होती. या वर्षी सहा तारखेपासून बजरंग दलानं शौर्य संचलनाचं आयोजन केलं आहे. त्यामागचा उद्देश काय आहे, याबाबत विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘देशातल्या लोकांना विशेषतः तरुणांना, अयोध्येत बांधलं जात असलेल्या राम मंदिराचं महत्त्व आणि इतिहास समजावा आणि जास्तीत जास्त तरुण हिंदू धर्माचं रक्षण आणि प्रसार करायला उत्स्फूर्तपणे तयार व्हावेत हा या संचलनांमागचा उद्देश आहे.’

हजार ठिकाणी करणार आयोजन

देशभरातल्या हजार ठिकाणी या संचलनांचं आयोजन होणार असल्याची माहिती, विश्व हिंदू परिषदेचे संयोजक सोहन सिंग सोळंकी यांनी दिली. ‘दरवर्षी आम्ही सहा डिसेंबरला शौर्य दिवस साजरा करतो. यावेळी आम्ही त्याचं स्वरूप बदलण्याचं ठरवलं. शौर्य संचलनातुन तरुणांना राम मंदिराचं महत्त्व समजावं आणि मंदीर बांधण्यासाठी केलेला संघर्ष लक्षात यावा हा आमचा विचार आहे.’

‘या संचलनांचं आम्हाला देशातल्या कमीत कमी हजार ठिकाणी आयोजन करायचं आहे. दिल्लीतली सात ठिकाणं आणि उत्तर प्रदेशातली डझनभराहून अधिक ठिकाणं आम्ही सध्या निवडली आहेत. येत्या १२ जानेवारीपर्यंत या ठिकाणी संचलन होईल, ज्यात १३ ते २५ वयोगटातील युवकांचा समावेश असेल. प्रत्येक संचलनात हजार लोकांचा समावेश असेल,’ असंही सोळंकी म्हणाले.

संचलनाला इतकं महत्त्व का प्राप्त झालं आहे?

सध्या उत्तर प्रदेशमध्ये आगामी निवडणुकांमुळं वातावरण तापलेलं आहे. त्यातच बजरंग दलाची शौर्य संचालनं उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं, भाजपला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल अशी चर्चा आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.