लोक म्हणत होते, बालाजी तांबे हे पवार आणि बाळासाहेबांच्यामध्ये डील करत आहेत. पण…

आयुर्वेदाचार्य व योगतज्ञ बालाजी तांबे यांचं आज निधन झालं. एका पर्वाचा अंत झाला. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच होतं. आयुर्वेद आणि अध्यात्म यावर त्यांनी केलेल्या लेखनाचा विविध भाषांमध्ये अनुवाद झाला.  कार्ला येथे त्यांनी आयुर्वेदोपचार व योगसाधनेसाठी उभारलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजची ख्याती देशोदेशीच्या फॉलोवर्स मध्ये पसरली होती. 

त्यांच्या या आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये कित्येकदा वेगवेगळे राजकारणी देखील येऊन राहायचे. यात प्रमुख नाव होत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार.

तांबे यांचे वडील वासुदेवशास्त्री तांबे यांच्याकडून त्यांना आयुर्वेदाचा वारसा लाभला. बडोदा येथे असताना त्यांच्या शेजारी काही वैद्य राहायचे. त्यांच्याकडून बालाजी तांबे यांनी नाडीचं मार्गदर्शन आणि औषधीकरण या दोन गोष्टी शिकता आल्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून बालाजी तांबे यांनी अध्यात्मिक अभ्यासाला सुरवात केली होती. वडिलांच्या आग्रहाखातर त्यांनी आयुर्वेद विशारद हि पदवी मिळवली. मात्र कोणी तरी त्यांना उपजीविकेसाठी इंजिनियर होण्याचा सल्ला दिला.

सिव्हिल इंजिनियरिंग घ्यायचं होत पण शिक्षकांच्या सल्ल्यामुळे मेकॅनिकल इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं. मात्र इंजिनियरिंगची डिग्री आणि आयुर्वेद विशारद ही पदवी एकत्रच मिळवली. 

बाजारात वस्तू विकण्यापासून ते इंटेरियर फर्निचरपर्यंतची सगळी कामे केली. कॉन्ट्रॅक्टवर मजूर पुरवण्याचा व्यवसाय देखील केला. यातूनच काही कारखानदारांशी त्यांची ओळख झाली. आपल्या व्यवसायाच्या सोबत तांबे भविष्य देखील सांगायचे. पुण्यात किर्लोस्करांचं ब्ल्यू डायमंड हे हॉटेल चांगलं चालत नव्हतं.त्यांच्या कंपनीतील जनरल मॅनेजर बालाजी तांबेंच्या ओळखीचे होते. त्यांनी हॉटेलमध्ये राहणाऱ्यांचं भविष्य पाहण्यासंबंधी विचारणा केली.

बालाजी तांबे ज्योतिषाचं काम करत असताना किर्लोस्करांचं ब्ल्यू डायमंड हॉटेल बंद पडलं होतं. त्यांच्या कंपनीतील जनरल मॅनेजर बालाजी तांबेंच्या ओळखीचे होते. त्यांनी हॉटेलमध्ये राहणाऱ्यांचं भविष्य पाहण्यासंबंधी विचारणा केली. तांबेनी त्याला होकार दिला.

प्रत्येक रुममध्ये कार्ड ठेवल्यामुळे तेथील अनेकजण सल्ला घ्यायचे. यामुळे बालाजी तांबेंची काही पर्यटकांशी ओळख झाली. अनेक परदेशी नागरिक देखील बालाजी तांबे यांच्या आयुर्वेद व योगातील ज्ञानावरून प्रभावित झाले. पुढे हि जागा कमी पडू लागल्यावर तांबे यांनी दोन बंगले घेऊन तिथे प्रॅक्टिस  सुरु केली. येथे त्यांना परदेशात देखील  करण्याचे आमंत्रण मिळू लागले.

पुढे तांबे यांनी एक सुसज्ज आश्रम उभा करायचं ठरवलं. पैशांच्या कमतरतेमुळे लोणावळ्यापर्यन्त पोहचले. बायकोचे दागिने गहाण  ठेवून त्या पैशांमधून हे आत्मसंतुलन व्हिलेज उभा केलं. ते सालं होतं १९८२. सुरुवातीला येणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी एमटीडीसीचे बंगले भाड्याने घेतले होते. कशाबशा मिळेल त्या सुविधांमध्ये त्यांनी आपला आश्रम सुरु केला.

अगदी याच काळापासून बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आश्रमात यायचे. बालाजी तांबे सांगतात,

” बाळासाहेब ठाकरे सुरुवातीपासून आश्रमात येत होते. एका तंबूत आम्ही जेवल्याचीही आठवण आहे.”

बाळासाहेब ठाकरे त्यांची पत्नी मीनाताईंच्या सह पंधरा पंधरा दिवस आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये मुक्काम करायचे.योगोपचार व इतर गोष्टींसाठी त्यांचा तांबे यांच्यावर विश्वस्त होता. सुरवातीच्या काळात जेव्हा आश्रमाच्या भोवती प्रचंड कचरा गोळा झाला होता तेव्हा बाळासाहेबांनी याबद्दल तांबेंच्याकडे विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की एमटीडीसीचे कर्मचारी देखभाल करत नाहीत. 

तेव्हा बाळासाहेबांनी या कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवून घेतले. बालाजी तांबेना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं,

बाळासाहेब तुमची इथे पण युनियन आहे का?

तर बाळासाहेबांनी हसून नकार दिला. त्यांनी स्वतः काठी  हातात घेतली आणि या कर्मचाऱ्यांना उद्या पर्यंत हा सगळं परिसर स्वच्छ करण्याची धमकी दिली. बाळासाहेबांचा दरारा एवढा प्रचंड होता की दुसऱ्या दिवशी सर्व कचरा गायब होऊन तो परिसर लख्ख झाला.

बाळासाहेबांच्या प्रमाणे बालाजी तांबे यांचे शरद पवारांशी देखील मैत्रीचे संबंध होता. फक्त उपचारासाठीच नाही तर बऱ्याचदा शरद पवार आश्रमात येऊन औषध निर्मितीची प्रोसेस व इतर गोष्टी समजावून घ्यायचे. त्यांची मैत्री ही कौटुंबिक जिव्हाळ्यापर्यंत उतरली होती. 

एकदा मात्र गंमत घडली. चक्क  बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही दिग्गज नेते योगायोगाने एकाच काळात आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये आले.

तो काळ मोठ्या राजकीय घडामोडीचा होता. अशातच पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे एकत्र तांबे यांच्या आश्रमात आले याची बातमी दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये छापून आली आणि संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. हे मोठे नेते या आश्रमात सहज जाणार नाहीत यामागे काही तरी राजकीय गणिते असणार असल्याचं बोललं जाऊ लागलं.

सत्तेची समीकरणे बदलली जाणार आणि पवार-ठाकरे यांच्या नव्या युतीमागे बालाजी तांबे मोठी भूमिका बजावत आहेत अशी शक्यता राजकीय पंडितांनी मांडली.

पवार यांचा चकवा सर्वज्ञात होता. बालाजी तांबेंच्या आश्रमात नेमकं काय घडतंय याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली होती. अगदी दिल्लीमधून सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष होत. काही उत्साही पत्रकार मनसातून व्हिलेजच्या बाहेर ठाण मांडून बसले होते.  

एका पेपरने तर असं छापलं होतं की, 

“बालाजी तांबेंनी आश्रमाभोवती एवढं जंगल वाढवून ठेवलं आहे की आत काय होतं, हे काहीच कळत नाही.”

पण लवकरच कळलं की ठाकरे आणि पवार भेट हा निव्वळ योगायोग होता. आयुर्वेदोपचार सोडल्यास यामागे कोणतेही राजकारण नव्हते. बालाजी तांबे हा सगळा गंमतीशीर घटनाक्रम नेहमी रंगवून सांगायचे. राजकारणीच नाही तर धीरूभाई अंबानी यांच्या सारख्या उद्योगपतींशी त्यांचा संबंध आला मात्र त्यांनी आयुर्वेदोपचार, योगाभ्यास, संशोधन यावरच एकाग्रतेने लक्ष केंद्रित केले. 

युर्वेदातल्या या भीष्माचार्याचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.