दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी चायनाचा हस्तक्षेप थेट भारतापर्यंत पोहोचलाय

एक आठवड्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी काई रूओ नावाच्या एका चायनीज गुप्तहेर महिलेला अटक केली होती. नेपाळचे कागदपत्र असलेली ही चिनी महिला भारतात बौद्ध भिक्षु बनून गुप्तहेराचं काम करत होती. ती भारतात राहणाऱ्या तिबेटी नागरिकांना भेटून त्यांना चीनचे समर्थक बनवण्यासाठी प्रयत्न करत होती.

परंतु पोलिसांनी जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या महिलेवर पाळत ठेऊन तिला अटक केली. अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीमध्ये महिलेने चीनकडून भारतात राबवण्यात येत असलेल्या प्रोपगंडाची कबुली दिलीय.

त्या महिलेने सांगितलंय की,

“नवीन दलाई लामांच्या निवड प्रक्रियेत चीनला हस्तक्षेप करायचा आहे. यानंतर निवडला जाणारा दलाई लमा हा चीनचा समर्थक असावा यासाठी तिबेटी लोकांमध्ये जाऊन त्यांच ब्रेन वॉश केलं जातंय.”

एकीकडे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यानंतर पुढचे दलाई लामा कोण असणार? यावर वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. एकीकडे, दलाई लामा स्वतःच पुढच्या दलाई लामांची निवड करणार आहेत का? की मग, त्यांच्यानंतर हे धर्मगुरू पदच रद्द केलं जाणार का? या प्रश्नांचा गुंता अजून सुटलेला नाही. तर दुसरीकडे चीन मात्र पुढच्या दलाई लामांच्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्लॅन बनवत आहे. 

चीनने दलाई लामांच्या ज्या निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्लॅन बनवला आहे ती निवड प्रक्रिया अशी असते. 

आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार दलाई लामांची निवड पुनर्जन्माच्या आधारावर केली जाते. 

तिबेटी भाषेत लामांना ‘ब्ला-मा’ असं म्हटलं जातं. या तिबेटी शब्दाचा अर्थ सर्वात श्रेष्ठ व्यक्ती असा होतो. लामांची निवड पुनर्जन्माच्या आधारावर केली जाते. तिबेटी परंपरानुसार अशी मान्यता आहे की जेव्हा कधी लामांच्या पदावरील व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यानंतर ते दुसऱ्या कुठल्यातरी मनुष्यजीवाच्या रुपात पुनर्जन्म घेतात. त्यानंतर या मुलाचा शोध घेतला जातो आणि एकदा का तो सापडला की त्याला लामा म्हणून नियुक्त केलं जातं. या प्रक्रियेत कधी-कधी अनेक वर्षांचा कालावधी निघून जातो.

तिबेटचे सध्याचे दलाई लामा ‘तेनजीन ग्यात्सो’ यांच्या शोधासाठी जवळपास ४ वर्षांचा कालावधी लागला होता. १९३५ सालचा जन्म असलेले तेनजीन ग्यात्सो हे १९३७ सालापासून दलाई लामा आहेत.

दलाई लामांच्या पुनर्जन्मानंतर त्यांचा शोध या पद्धतीने घेतला जातो.

तिबेटीयन मान्यतेनुसार दलाई लामा बदलत नाहीत, ते कायमस्वरूपी एकच असतात. ते ज्या व्यक्तीच्या रुपात जन्म घेतात ती व्यक्ती फक्त बदलत जाते. लामाचा शोध घेण्याची जबाबदारी तिबेटी सरकारवर असते. दलाई लामा चिरंजीव असून ते तिबेटचे संरक्षक असतात, अशी देखील मान्यता आहे.

नवीन दलाई लामांच्या शोधाच्या प्रक्रियेची सुरुवात उच्च लामा किंवा पंचेन लामा यांना दिसणाऱ्या दृश्यावरून आणि स्वप्नांवरून होते. प्रथेनुसार आधीच्या दलाई लामांच्या मृत्युनंतर ज्यावेळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात त्यावेळी त्यांच्या चितेवरून निघणाऱ्या धुरामध्ये त्यांच्या पुनर्जन्माचे संकेत असतात.

संकेत मिळाल्यानंतर पंचेन लामा तिबेटची पवित्र नदी मानली जाणाऱ्या ला-तसोच्या किनाऱ्यावर ध्यानधारणेस बसतात.

या ध्यानधारणेदरम्यान त्यांना पुढील शोध कुठल्या दिशेने करायचा याचे संकेत मिळतात. मिळालेल्या संकेतांनुसार शोध घेतल्यावर जी मुलं सापडतात त्यांना अनेक खडतर परीक्षांना सामोरे जायला लागतं. सापडलेला मुलगाच दलाई लामा आहे ना, याची खात्री करण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांना तो यशस्वीपणे सामोरे गेल्यानंतर तिबेटी सरकार आणि जनतेला त्याविषयी माहिती दिली जाते.

दलाई लामा म्हणून नियुक्तीसाठी शोधण्यात आलेल्या मुलाला बौद्ध धर्माची शिकवण दिली जाते. बौद्ध धर्माचे आणि तिबेटचे नेतृत्व करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण देऊन त्यांना तयार करण्यात येते. विश्वशांतीसाठी अविरत काम करणं आणि जगाला मानवतेचा संदेश देऊन हे जग मनुष्य जातीसाठी अधिक चांगलं ठिकाण होईल यासाठी दलाई लामा पुढे आयुष्यभर काम करतात.

परंतु आजपर्यंत चालत आलेली पद्धत पुढे सुद्धा चालू राहील का?

कारण एकीकडे दलाई लामा यांनी उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याबद्दल अजूनही निश्चित असं काहीच सांगितलं नाहीय. त्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मत मांडले आहेत. त्यांनी मांडलेल्या मतानुसार  पुढील काही पर्याय समोर येतात.

१) जर तिबेटच्या लोकांना समोर दलाई लामा हवे असतील तर त्यांनी स्वतः दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करावी.

या पद्धतीने नवीन दलाई लामांची निवड करायची झाल्यास, यासाठी तिबेटमध्ये राहणारे ६० लाख, भारतात राहणारे २ लाख आणि जगभरात राहणाऱ्या सर्व तिबेटी लोकांचं मतदान घ्यावं लागेल. पण तिबेट आणि सर्वाधिक तिबेटी नागरिक हे चीनच्या ताब्यात आहेत. त्यामुळे निवडलेल्या दलाई लामांवर चीनची पकड घट्ट असेल.

तर दुसरीकडे भारत आणि चीनबाहेरील देशांमध्ये राहणाऱ्या तिबेटी लोकांच्या मतदानातून दलाई लामांची निवड करण्यात आली, तर ही निवड भारतात असलेल्या निर्वासित सरकारप्रमाणेच असेल. याच अधिकारानुसार दलाई लामांचं पद समाप्त करण्याचा अधिकार सुद्धा तिबेटी लोकांकडे असेल.

२) १४ व्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर हे पद खाली राहू शकतं.

एका मुलाखतीमध्ये दलाई लामा यांनी धर्मगुरू पदच समाप्त करण्याचं मत मांडलं होतं. कारण तिबेटी लोकांचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार भारतात असलेल्या तिबेटच्या निर्वासित सरकारकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे दलाई लामा हे पद आता फक्त धार्मिक राहिलेलं आहे. दलाई लामांच्या मृत्यूनंतर चीनकडून स्वतःच्या मर्जीचा दलाई लामा निवडला जाण्याची दाट शक्यता आहे.

या सोबतच निवडले जाणारे पुढचे दलाई लामा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन न करता या पदाची प्रतिष्ठा राखून ठेवतीलच याची काही शाश्वती नाही. जर पुढच्या दलाई लामांनी गैरवर्तन केलं तर या पदाची सगळी प्रतिष्ठा नष्ट होईल त्यामुळे हे पद कायमचंच संपवलं जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास भारतात असलेल्या निर्वासित तिबेट सरकारचे प्रमुख हेच तिबेटी लोकांचे प्रमुख होतील आणि दलाई लामांचे विचार केवळ पुस्तक रूपात उरतील.

३) पुन्हा पुनर्जन्म घ्यायचा की नाही याचा निर्णय दलाई लामा ९० वर्ष पूर्ण झाल्यानंतर घेणार आहेत.

दलाई लामा यांची निवड त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी घेतलेल्या पुनर्जन्मानंतर होत असते. त्यामुळे पुढे पुन्हा एकदा पुनर्जन्म घ्यायचा की नाही याचा निर्णय अजून दलाई लामांनी घेतलेला नाही. दलाई लामा सध्या ८७ वर्षांचे आहेत आणि पुनर्जन्म घ्यायचा की नाही हा निर्णय ते ९० वर्ष पूर्ण झाल्यानंतर घेणार आहेत. यामुळे ३ वर्षानंतर ते यावर काय निर्णय घेतात त्यावर पुढच्या दलाई लामांची निवड अवलंबून असेल.

४) दलाई लामा जिवंत असतांनाच स्वतःचा उत्तराधिकारी निवडून त्यांना स्वतःच्या आध्यात्मिक शक्ती देऊ शकतात.

दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांची निवड पुनर्जन्माच्या आधारावर केली जाते. परंतु आजवर चालत आलेल्या परंपरेला तोडून दलाई लामा हे जिवंतपणीच स्वतःच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करू शकतात. असं झाल्यास त्यांना जिवंतपणीच स्वतःच्या आध्यात्मिक शक्ती पुढच्या दलाई लामांना द्याव्या लागतील. परंतु यावर सुद्धा दलाई लामा यांनी मत मांडलेलं नाही.

५) जर दलाई लामांचं निधन भारतात झालं, तर त्यांचा जन्म तिबेटच्या बाहेर भारतात होऊ शकतो. 

दलाई लामा यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा विरोध करत असताना, “मी हुकूमशाही चीनमध्ये मरण्यापेक्षा लोकशाही भारतात मरणे पसंद करेन.” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

दलाई लामांचं निधन भारतात झालं तर पारंपरिक पद्धतीने भारतात जन्मलेल्या व्यक्तीची दलाई लामा म्हणून नियुती होईल. पण ही नियुक्ती करत असताना सर्व विधी ल्हासाऐवजी धर्मशाळा मध्ये कराव्या लागतील.

याच पद्धतीने दलाई लामांची निवड करण्याची वेळ आल्यास, निवडले जाणारे दलाई लामा चीनचे समर्थक असावेत यासाठी चिनी गुप्तहेर तिबेटी लोकांना चीनच्या बाजूकडे प्रभावित करत असल्याचं प्रकरण उघडकीस आलंय.

या पद्धतीनुसार दलाई लामांची निवड भारतात होईल, पण चीनमध्ये सुद्धा दुसऱ्या दलाई लामांची निवड केली जाऊ शकते.

दलाई लामा यांनी तिबेट सोडून भारतात शरण घेतल्यानंतर ल्हासामध्ये पंचेमी लामा यांची नियुक्ती केली होती. मात्र चीनने त्या पंचेमी लमा यांच अपहरण केलं आणि त्याजागी सैनिक अधिकाऱ्याच्या एका मुलाला पंचेमी लामा म्हणून नियुक्त केलं आहे. दलाई लामांच्या निधनानंतर चीन सरकार चीनमधीलच एखाद्या मुलाला पारंपरिक पद्धतीने दलाई लामा म्हणून घोषित करू शकते किंवा हे पद समाप्त करून सर्व अधिकार चीन सरकारच्या हातात जाऊ शकतात.

पण चीन सरकारकडून निवड झालेले दलाई लामा आणि भारतात निवड झालेले दलाई लामा यांमध्ये फरक असेल. चीनने निवडलेल्या दलाई लामांना जगात आदर दिला जाणार नाही असं दलाई लामा यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.