भेळपुरीचा मॅटर झाला आणि मुंबईत ब्रिटिश कुकला जीव गमवावा लागला
खाण्याच्या जगात मिसळ नंतर सर्वात मोठी भांडणे कुठली असतील तर ती आहेत भेळची. कुठली भेळ जगात भारी? कोल्हापूरकर म्हणतात राजाभाऊची भेळ, सांगलीवाल्यांची गाडी संभाच्या भेळवर अडकलेली असते. पुणेकर कल्याण भेळचे गुणगान गातात.
प्रत्येक गावाला आपलीच भेळ बेस्ट वाटत असते.
पण खरं सांगायचं तर जगात भेळपुरीची राजधानी कुठली असेल तर ती म्हणजे मुंबईची चौपाटी.
एवढंच काय तर भेळचा जन्म देखील मुंबईला झाला होता अस म्हणतात.
महानगरी मुंबई म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून असलेलं कॉस्मोपॉलीटन शहर. अठराव्या शतकानंतर औद्योगिक क्रांती झाली आणि देशभरातुन लोक जीवाची मुंबई करायला इकडे येऊ लागले.
मूळच्या मराठी सोबत इथे अनेक संस्कृती मिसळून गेल्या. अगदी भेळच झाली म्हणा ना!
मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या खाद्यप्रथा इकडे आणल्या. जस की उत्तरेतल्या कामगारांनी चाट आणले तर गुजरातवाल्यांनी फरसाना नमकीन आणले. महाराष्ट्राचा चिवडा, भडंग फेमस होतंच. कुठल्या तरी डोकेबाज माणसाने हे सगळे पदार्थ मिक्स केले, चिंचेची चटणी मिसळली
आणि तयार झाली भेळ!
कोणी म्हणत की तेव्हाच्या व्हिटी व आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर असलेल्या विठ्ठल नावाच्या हॉटेल मध्ये हा पदार्थ शोधला गेला. तर कोण म्हणतं की गुजराती भाभीनी पहिली भेळ बनवली.
कोणी का शोधेना पण अगदी थोड्याच काळात भेळ मुंबईत हिट झाली.
भेळ अगदी झटपट बनत होती. तिला बनवण्यासाठी खूप तामझाम लागत नव्हता, ना गॅस,स्टोव्ह ची आवश्यकता होती. सगळं साहित्य हाताशी ठेवायचं, गिऱ्हाईक आलं की झटपट चिवडा, फरसाणा, भडंग, चिरलेला कांदा, टोमॅटो वगैरे घालून मस्त खमंग चटपटीत भेळ तयार!
फेरीवाले भेळ घेऊन हिंडू लागले. गिरणीला जायच्या गडबडीत असणाऱ्या मुंबईकरांची क्षुधाशांती होऊ लागली.
पुढे या भेळवाल्या गाड्यांनी चौपाटीवर बस्तान बसवलं.
नव्याने उदयाला आलेली मिडलक्लास चाकरमानी पिढी रविवारच्या सुट्टीला आपल्या बायकापोरांना घेऊन चौपाटीच्या किनाऱ्यावर यायचे. तिथे आलं की हमखास भेळपुरीचा कार्यक्रम व्हायचा. चैनीची ही त्याकाळची परिसीमा होती.
भेळने अख्ख्या मुंबईवर राज्य सुरू केलं होतं.
तो काळ पारतंत्र्याचा होता. मुंबई तर ब्रिटिशांची आर्थिक राजधानी होती. त्यांनी या बंदराच्या रक्षणासाठी सेना खडी करून ठेवली होती. एकदा एक अधिकारी नव्याने इंग्लंड हुन भारतात आला होता. मुंबईत त्याची पोस्टिंग झाली.
मुंबईत आल्यावर एकदिवस राउंड मारताना चौपाटीवर तो भेळचा विशिष्ट वास त्याला आला.
त्याची भूक चाळवली. पण गडी अहंकारी होता. एवढा मोठा अधिकारी चौपाटीवर उभा राहून सर्वसामान्य भारतीयांबरोबर भेळ कसा खाणार?
तो आपल्या कॅम्पवर परत आला. आल्या आल्या त्याने आपल्या खानसाम्याला बोलावून अख्ख्या तुकडी साठी भेळ बनवण्याचे ऑर्डर दिली.
त्याचं कुकच नाव होतं विल्यम हॅरॉल्ड. मुंबईच्या सगळ्या ब्रिटिश सैन्याचा तो हेड शेफ होता.
विल्यम हॅरॉल्ड इंग्लिश जेवण जबरदस्त बनवायचा पण त्याला भेळ कस बनवतात ते माहिती नव्हतं.
भेळ साठी हावरलेल्या साहेबाला त्याने हे सांगितलं. साहेब गरम डोक्याचा होता. त्याने त्याला मनसोक्त शिव्या घातल्या आणि मग सांगितलं की
चौपाटीवर हा पदार्थ मिळतो, तिथं जा आणि त्यांच्याकडून रेसिपी विचारून परत ये.
पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून विल्यम हॅरॉल्ड चौपाटीवर आला. तिथं त्याला अनेक गाडे उभे असलेले दिसले. त्याने एका गाड्यावर जाऊन भेळपुरीचे रेसिपी विचारली.
त्या माणसाने ती रेसिपी सांगितली. विल्यम ला दिसले की दुसऱ्या एका गाड्यावर खुप गर्दी आहे, त्या गाड्यावाल्याची भेळ जास्त चांगली असेल हे ओळखून विल्यमने त्याला गाठलं.
पण गंमत म्हणजे या भेळवाल्याने त्याला संपूर्णपणे वेगळीच रेसिपी सांगितली.
विल्यम महाशय कन्फ्युज झाले. त्याने तिसऱ्याच एका भेळवाल्याला विचारलं तर त्याने सगळं सोडून तिसरीच रेसिपी सांगितली.
विल्यम हॅरॉल्ड जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याला भेळ बनवण्याची वेगवेगळी पद्धत सांगितली गेली.
टीस्पून, टेबल स्पूनच माप घेऊन इंग्लिश डिनर बनवणारा हा कुक भेळ ची रेसिपी ऐकून ऐकून भंजाळून गेला. वर प्रत्येक भेळवाला त्याला आपलीच भेळ कशी भारी हे सांगत होता.
विल्यमचं डोकं पूर्ण कामातून गेलं होतं. तो कॅम्पवर परत आला.
भुकेने कासावीस झालेल्या साहेबाने त्याला बोलावलं व एवढा लेट होण्याचं कारण विचारलं. थरथर कापत विल्यमने त्याला म्हणाला,
“मला रेसिपी मिळाली नाही. त्यामुळे आपल्याला आज भेळ मिळणार नाही.”
साहेब आडव्या डोक्याचा होता. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. एवढा मोठा कुक आणि साधं भेळ बनवता येऊ नये?
साहेबाची आणि विल्यमची वादावादी झाली.
रागाच्या भरात त्या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने विल्यम हॅरॉल्डच्या छातीत गोळ्या झाडल्या.
निरागस भेळेपायी एका इंग्लिश माणसाला प्राण गमवावे लागले.
अस म्हणतात की त्या अधिकाऱ्याचं क्रौर्य बघून इंग्रज सैन्यात बंड देखील झालं होतं. ब्रिटिश सरकारला त्याची बदली करावी लागली. साहेबाला परत आयुष्यात भेळ खायला मिळाली की नाही माहीत नाही पण लगान सिनेमात अमिताभ बच्चन म्हणतो त्याप्रमाणे,
ही भेळेची कथा इतिहासाच्या पानात कुठे हरवून गेली.
बिचाऱ्या विल्यम हॅरॉल्डच नाव चौपाटीवर बसून भेळ खात खात चघळल्या जाणाऱ्या दंतकथेपुरतं शिल्लक राहिल.
हे ही वाच भिडू.
- अशोक वैद्य, सुधाकर म्हात्रे की बाजीराव पेशवे ; वडापावचा शोध कोणी लावला ?
- मधुराज रेसिपी चॅनेलच्या माध्यमातून घरोघरी पोहचलेल्या मधुरा बाचल ची ही गोष्ट
- ताजमहल बांधणाऱ्या कामगारांसाठी आग्र्याच्या पेठ्याचा शोध लागला.